एक सहा वर्षाचा नातू त्याच्याच उंचीच्या व्हायोलिनशी खटपट करुन ते वाजविण्याचा प्रयत्न करताना पाहून आजीला कौतुक तर वाटलेच परंतु त्याची तिला दयाही आली. तिने स्वतःसाठी साठविलेल्या पूंजीतून त्याला अडीचशे रुपयांचं एक लहान व्हायोलिन विकत आणून दिलं.. आणि तिथपासून छोट्या प्रभाकरचं व्हायोलिनशी नातं जुळलं, ते अखेरच्या श्वासापर्यंत…
२५ डिसेंबर १९३२ रोजी प्रभाकर जोग यांचा अहमदनगर येथे जन्म झाला. पाच भाऊ, दोन बहिणी, आई, वडील, काका, आजी अशा सोळा माणसांच्या कुटुंबात त्यांचं बालपण गेलं. त्यांचे मोठे बंधू आकाशवाणीवर व्हायोलिन वादक होते. वडिलांना संगीत नाटकांची फार आवड. पुण्यात आल्यावर सायकलीवरुन रात्री बारा किलोमीटर जाऊन नाटक पाहून, पहाटे घरी परतायचे. तिच संगीताविषयीची आवड छोट्या प्रभाकरला लागली.
वडील नोकरी निमित्ताने विशाखापट्टणमला गेले. कुटुंब पुण्यातच रहात होते. १९४४ मधील महायुद्धाच्या सुमारास वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. परिणामी घरातील प्रत्येकाला पैसे कमविण्यासाठी घराबाहेर पडावे लागले. बारा वर्षांचा प्रभाकरने सव्वा रुपये व नारळ या बिदागीवर पुण्यातील वाड्यांतून कार्यक्रम केले. एव्हाना व्हायोलिन वादनाचे कौशल्य त्याने प्राप्त केलेले होते..
एसपी काॅलेजवरील मैदानावर एका स्नेहसंमेलनात सादर केलेले व्हायोलिन वादन जवळच रहाणाऱ्या सुधीर फडके यांच्या कानावर गेले. त्यांनी प्रभाकर यांना बोलावून घेतले व पुढे गीतरामायणच्या ५०० कार्यक्रमात त्यांनी बाबूजींना व्हायोलिनची साथ दिली..
संगीतकार सुधीर फडके यांच्या शिवाय स्नेहल भाटकर, श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत प्रभू, वसंत पवार, राम कदम यांच्या बरोबर ते काम करु लागले..
हिंदी संगीतकारांमध्ये रोशन, मदन मोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुल देव बर्मन यांचेकडून त्यांना बोलावणी येऊ लागली. १९५० ते १९९० पर्यंतच्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाजलेल्या असंख्य गाण्यातील व्हायोलिनचे सूर हे प्रभाकर जोगांचेच आहेत..
प्रभाकर जोग यांनी अनेक मराठी चित्रपट, ग्रामोफोन कंपन्या, आकाशवाणी व दूरदर्शनसाठी संगीताच्या सुरावटी रचलेल्या आहेत.
प्रभाकर जोग यांनी २१ मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यातील आंधळा मारतो डोळा, कैवारी, जावयाची जात, थांब लक्ष्मी कुंकू लावते, दाम करी काम, सतीची पुण्याई व सतीचं वाण हे चित्रपट मी पाहिलेले आहेत..
दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ या चित्रपटातील सर्वच गाणी गाजली होती. प्रभाकर जोग यांनी दादांच्या गीतांना सोप्या चाली लावून ती अजरामर केली आहेत. ‘दाम करी काम’ चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांच्या गीतांना जोग यांनी अविस्मरणीय चाली दिल्या. ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ चित्रपटातील ‘शुभंकरोति म्हणा मुलांनो..’ हे जयश्री गडकर यांच्या तोंडी असलेले गीत कुणीतरी विसरणं शक्य आहे का? ‘किती सांगू , सांगू मी कुणाला.. आज आनंदी आनंद झाला..’ या ‘सतीचं वाण’ चित्रपटातील गोकुळाष्टमीच्या गीतानं चित्रपटाला रौप्यमहोत्सवी यश मिळवून दिलं!!
प्रभाकर जोग यांना त्यांच्या कारकिर्दीत संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार, सन्मान मिळाले. त्यामध्ये वसुंधरा पंडित पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, सूरसिंगार पुरस्कार, चित्रकर्मी पुरस्कार व गदिमा पुरस्कार समाविष्ट आहेत.
सहा दशकांहून अधिक काळ कार्यरत असणारं व्हायोलिन आज हरपून गेलं.. वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी त्यातून निघणारे सूर आसमंतात विलीन झाले.. मी भाग्यवान, एकदा प्रभाकर जोग एका कामाच्या निमित्ताने आॅफिसवर आले होते.. अशी माणसं पुन्हा होणे नाही..
यापुढे कधीही जेव्हा व्हायोलिनचे सूर कानावर पडतील.. तेव्हा.. जोग सरांची आठवण, तीव्रतेने होईल…
संगीतकार प्रभाकर जोग यांना विनम्र श्रद्धांजली!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३१-१०-२१.
Leave a Reply