महाराष्ट्र ही अगदी प्रथमपासूनच संतांची आणि वीरांची भूमी म्हणून सर्वांना सुपरिचित आहे. अठरापगड जातीचे वास्तव्य असलेल्या या भूमीमध्ये प्रत्येक जातीमध्ये संत आणि शूरवीर जन्माला आले असून आजदेखील ते सर्वांना परम वंदनीय ठरलेले आहेत.
त्यातही वारकरी सांप्रदायाचा पाया रचलेले संत श्री ज्ञानेश्वर माऊली, संतशिरोमणी नामदेव महाराज, संत गोरोबा कुंभार, संत एकनाथ महाराज, संत चोखामेळा, संत सावता माळी, संत जनाबाई, संत समर्थ रामदास स्वामी आणि जगद्गुरू म्हणून ओळखले जाणारे आणि या वारकरी सांप्रदायाचा कळस म्हणून मानले जाणारे संत तुकाराम महाराज हे अध्यात्म मार्गातील खरेखुरे दीपस्तंभ ठरले आहेत.
या सर्वांपेक्षा एका अर्थाने भिन्न क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आणि संपूर्ण महाराष्ट्राचे सर्वार्थाने आराध्य दैवत ठरलेले छत्रपती शिवाजी महाराज हे अध्यात्म क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व नसूनदेखील ‘श्रीमंत योगी’ या अनोख्या संज्ञेस खऱ्या अर्थाने पात्र ठरलेले एक आगळेवेगळे संत ठरले असे म्हटल्यास ते मुळीच अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णन अनेक समर्पक ओव्यांच्या माध्यमातून केलेले आहे. ‘निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।।’ ही त्यापैकीच एक अत्यंत सार्थ अशी एक ओवी आहे. छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास या ओवीची सार्थकता सहजपणे लक्षात येते.
विशेष म्हणजे त्याच कालखंडातील आणखी एक संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या जीवनाचे वर्णन करतानादेखील नेमकी हीच ओवी सार्थ ठरते. कदाचित काहींना याचे आश्चर्यही वाटू शकेल. मात्र यासंबंधीचे विवेचन विचारात घेतल्यास यामध्ये कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती मुळीच नाही ही बाब लक्षात येऊ शकेल. प्रस्तुत छोटेखानी लेखाच्या माध्यमातून स्थलमर्यादेचे योग्य ते भान ठेवून नेमके याच मुद्याचे चिंतन करण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखकाने आपल्या अल्पमतीनुसार केला आहे.
शिवराय: ‘श्रीमंत योगी
समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णन करण्याकरिता ‘श्रीमंत योगी या अतिशय सार्थ आणि समर्पक अशा उपाधीचे उपयोजन केले आहे. छत्रपतींच्या जीवन चरित्राचे आणि त्यांच्या राज्यकारभाराच्या शैलीचे अध्ययन केलेल्या प्रत्येक व्यक्तीला या उपाधीची सार्थकता सहजपणे लक्षात येऊ शकते. रयतेचे दैन्य दूर करणे शक्य व्हावे याकरिता ‘श्रीमंत’ होणारा आणि या ऐश्वर्याचा अथवा श्रीमंतीचा स्वतःच्या व्यक्तिगत जीवनासाठी कोणत्याही प्रकारचा लाभ करून घेण्याऐवजी: ‘एकभुक्त’ जीवनशैली अंगिकारणारा व त्यामुळेच ‘योगी’ या संज्ञेस सर्वार्थाने पात्र ठरणारा हा राजा; म्हणूनच ‘श्रीमंत योगी’ म्हणवून घेण्यास योग्य होते. पाश्चात्त्यांनादेखील छत्रपतींच्या जीवनशैलीचे तसेच राज्यकारभाराच्या पद्धतीविषयीचे कुतुहल वाटत होते. याआधीच उल्लेख केल्याप्रमाणे शिवाजी महाराज हे ‘एकभुक्त’ होते. सर्व प्रकारचे वैभव पायाशी लोळण घेत असताना केवळ एकाचवेळी आहार घेणे हे लक्षण केवळ योग्याच्याच ठायी असू शकते.
केवळ तत्कालीन मुसलमान राज्यकर्त्यांची राज्ये नष्ट करून त्याऐवजी हिंदूंचे राज्य स्थापन करावे हाच काही स्वराज्य स्थापनेमागचा शिवछत्रपतींचा एकमेव हेतू नव्हता. तर आपण स्थापित असलेले स्वराज्य हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी ठरावे, रयतेच्या हिताचे संरक्षण करणारे ठरावे, म्हणजेच त्याचे स्वरूप केवळ स्वराज्याचे न राहता ते सुराज्याचे बनावे हा हेतू प्रधान होता. ही बाब शिवचरित्राचा अभ्यास करताना प्रकर्षाने जाणवते. यादृष्टीने विचार केल्यास; सतराव्या शतकात संपूर्ण देशभरात परकीय सत्तांची जुलूम जबरदस्ती सुरू असतानाच शिवछत्रपतींचा हा सुराज्याचा प्रयोग खचितच लक्षणीय ठरतो.
आपल्या या उदात्त अशा ध्येयाच्या पूर्ततेकरिता छत्रपती शिवाजी महाराजांना ‘निश्चयाचा महामेरू बनण्याखेरीज मग अन्य कोणताही पर्यायच शिल्लक राहिलेला नव्हता. कारण जे ध्येय आपण समोर ठेवलेले आहे; ते साध्य करण्याकरिता काही निर्णय हे वेळप्रसंगी अतिशय कठोरपणे अंमलात आणावेच लागतात याची शिवरायांना पुरेपूर कल्पना होती. अशा प्रकारे निश्चयाचा महामेरू’ ठरल्याखेरीज ‘बहुत जनांसी आधारू’ ही बिरुदावली सार्थ ठरू शकत नाही, याचा या ‘श्रीमंत योगी’ असलेल्या जाणत्या राजाला निश्चितच जाणीव होती.
तुकोबांचा मनोनिग्रह
संत तुकाराम महाराज हे समर्थ रामदास स्वामी यांच्याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे समकालीन होते. जगद्गुरू या उपाधीला प्राप्त ठरलेले तुकोबा हेदेखील ‘निश्चयाचा महामेरू’ या उपाधीला सार्थ ठरविणारे महान संत होते हे त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांमधून सहजपणे लक्षात येते. वास्तविक पाहता; तुकोबा हे प्रापंचिक जीवन जगत होते. मात्र प्रपंचामध्ये असूनदेखील वैराग्यशील जीवन हे अगदी सहज स्वाभाविक प्रवृत्ती म्हणून कसे जगावे; याचा जणू वस्तुपाठच तुकोबांनी आमच्यासारख्या समस्त प्रापंचिकांना आपल्या प्रत्यक्ष आचरणाच्या माध्यमातून घालून दिला आहे. त्यासाठी आवश्यक असलेला मनोनिग्रह सहजपणे साध्य केलेले संत तुकाराम महाराज हेदेखील ‘निश्चयाचा महामेरू’ ठरले होते. याबाबतची केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची काही उदाहरणे याठिकाणी उद्धृत करणे हे खचितच उपयुक्त ठरू शकेल. एखाद्या सर्वसामान्य प्रापंचिकाप्रमाणेच आपले दैनंदिन आयुष्य व्यतीत करीत असतानाच; तुकोबांना आपल्या या संसारामध्ये आकस्मिकरीत्या असंख्य समस्यांना सामोरे जावे लागले होते. आपले वडील तसेच पहिली पत्नी आणि मुलगा तसेच मातोश्री यांच्याप्रमाणेच आपल्या परिसरातील शेकडो व्यक्तींना दुष्काळामुळे प्राण गमवावे लागले हे त्यांनी पाहिले होते. वास्तविक पाहता: अशा प्रकारच्या प्रसंगांमुळे सर्वसामान्य मनुष्याचा देवावरील विश्वास डळमळीत होऊ लागतो असाच सार्वत्रिक अनुभव आहे. संत तुकाराम महाराज यांच्यासारखे पुण्यात्मे मात्र अशा प्रकारच्या प्रसंगांचे समर्पक विश्लेषण करून; त्याद्वारे मिळत असलेले ईश्वरी संकेत शोधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतात. “जे काही करिशी । ते माझे स्वहित” असेच निर्मल तत्त्व त्यांच्या चित्तामध्ये नित्य वसत असते. वादळामुळे वृक्ष उन्मळून पडतात. पण पर्वत मात्र सदैव स्थिर राहतात. तुकोबांसारखे महात्मे संत अशा परिस्थितीत केवळ अविचलच राहतात असे नाही; तर उलटपक्षी त्यांची ईश्वरावरील निष्ठा अधिकच दृढतर होत जाते.
ईश्वरावरील निष्ठा दृढ झाली
“बाप मेला न कळता….” या आपल्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबांनी नेमकी हीच भावना उत्कटपणे व्यक्त केली आहे. “बरे झाले देवा निघाले दिवाळे…. या अभंगातूनदेखील त्यांनी याच भावना व्यक्त केल्या आहेत. या भवसागरातून त्या एका पांडुरंगाखेरीज अन्य कोणीही तारणहार असूच शकत नाही याची अत्यंत दृढ निश्चयभावना या कालखंडात तुकोबांच्या मनामध्ये निर्माण झाली हे सहजपणे लक्षात येते. “संसाराच्या तापे तापलो मी देवा…” या अन्य अभंगातून देखीलत्यांनी देवाचे आभारच मानलेले आहेत. यातूनच “फलकट हा संसार । येथे सार भगवंत” अशी ग्वाही त्यांना स्वानुभवाच्या आधारे देण्याचा अधिकार प्राप्त झाला.
संसार हा मृत्युग्रस्त तसेच नश्वर आणि दुःखरूप असल्यामुळे त्यासाठी धडपड करणे निव्वळ व्यर्थ ठरते ही बाब म्हणूनच तर तुकोबा आपल्याला अतिशय अधिकारवाणीने सांगू शकले. त्याच भावनेने “तुका म्हणे नाशिवंत हे सकळ । आठवे गोपाळ तेचि हित।।” असे त्यांनी आमच्यासारख्या प्रापंचिकाच्या मनावर बिंबविले आहे. वैराग्याने तुकोबांचे अंतःकरण अधिकच शुद्ध झाले. हे वैराग्य हाच तर अध्यात्मिक जीवनाचा खरा पाया आहे. असे वैराग्य हे हजासहजी कोणालाही मिळत नाही. त्यासाठी भगवंताचीच कृपा आवश्यक ठरते. ज्याच्यावर कृपा करावी असे भगवंताला वाटते; त्याला सर्वप्रथम तो वैराग्याचे दान देत असतो. खरं तर या वैराग्य भावनेमुळेच तुकोबा हेदेखील ‘निश्चयाचा महामेरू’ ठरू शकले.
खतपत्रे डोहात बुडविली
निश्चयाची भावना ही केवळ हृदयामध्ये असणे पुरेसे ठरू शकत नाही. प्रत्यक्ष आचरणातूनदेखील तिचे प्रकटीकरण होणे हे नितांत गरजेचे असते. तुकोबांच्या जीवनाचे अध्ययन केल्यास त्यांना ‘निश्चयाचा महामेरू’ असे संबोधणे किती समर्पक ठरते, हे अगदी सहजपणे लक्षात येऊ शकते. वैराग्याची भावना मनामध्ये दृढतर झाल्यानंतर चित्तवृत्ती निवळण्याकरिता तुकोबांनी एकांतवासाचा आसरा घेतला होता. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…’ या अभंगाच्या माध्यमातून त्यांना या एकांतवासाची महती विशद केली आहे.
मात्र त्यांना शोधत भामनाथावर आलेल्या कान्होबांनी त्यांना आग्रहाने घरी नेले होते. तेव्हा वडिलांच्या काळापासून ज्यांच्याकडे येणे होते; त्या सर्वांची खतपत्रे इंद्राणीच्या डोहामध्ये बुडविण्याची तयारी तुकोबांनी सुरू केली होती. मात्र कान्होबांनी त्यांना नम्रपणे एक विनंती केली होती. “आता तुम्ही साधू झाला आहात. पण मला बायकापोरांचा प्रपंच चालवायचा आहे. तेव्हा एवढे सर्व पैसे बुडवून माझे कसे चालेल?” असा प्रश्न त्यांनी तुकोबांना विचारला होता. त्यानंतर तुकोबांनी कान्होबांसाठी त्यामधील निम्मी खतपत्रे बाजूला ठेवली आणि स्वतःच्या वाटणीची खतपत्रे तात्काळ इंद्रायणीच्या डोहामध्ये विसर्जित केली होती. “आमचा संपूर्ण भार विठोबावरच आहे. आमच्या भुकेची वेळ पांडुरंगच राखील,” असे उद्गार त्यावेळी या महान संताच्या मुखातून बाहेर पडले होते. एकदा परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवल्यानंतर अशा प्रकारच्या मोहातून अत्यंत निश्चयानेच बाहेर पडायचे असते हा वस्तुपाठ तुकोबांनी यानिमित्ताने सर्वांना घालून दिला होता.
तुकोबांनी आपली संपूर्ण चित्तवृत्ती त्या जगन्नियंत्या पांडुरंगाच्याच चरणी निश्चयपूर्वक अर्पण केली होती. त्या निश्चयी वृत्तीला मागे खेचू शकणारी, पायबंद घालणारी अशी दुष्ट दुराशा त्यांना नकोशी झाली होती. “देह जड झाले ऋणाच्या आभारें । केलें संसारें कासावीस ।।” अशा प्रकारचा कर्जाचा अनुभव त्यांना आलेलाच होता. त्यामुळे निदान आता तरी या अशा प्रकारच्या व्यावहारिक देण्याघेण्याच्या कटकटीतून कायमचेच मुक्त व्हावे आणि मग अगदी निर्वेधपणे हरिभजनामध्ये रममाण होता यावे, याचकरिता त्यांनी खतपत्रे इंद्रायणीच्या डोहात बुडविली होती. विशेष म्हणजे त्यानंतर तुकोबांनी कधीही द्रव्याला स्पर्श केला नव्हता. गरिबीचे हाल सहन केले; प्रसंगी भिक्षेवरदेखील ते राहिले. मात्र यावज्जन्म कधीही धनस्पर्श करायचाच नाही असा निश्चय करून आणि तो लौकिक आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत अंमलात आणून; आपण ‘निश्चयाचा महामेरू’ आहोत हेच तुकोबांनी सिद्ध केले होते.
तुकोबांचा मनोजय
‘निश्चयाचा महामेरू’ असे वर्णन सरसकट कोणालाही लागू होत नसते. त्याचे कारण हे नीट लक्षात घ्यावे लागते. यासंदर्भात निवंगत थोर भगवद्भक्त ह.भ.प. वै. ल. ग. पांगारकर यांनी नमूद केलेला एक अभिप्राय याठिकाणी उद्धृत करणे हे खचितच उपयुक्त ठरेल असे वाटते. “मनावर खोगीर ठेवून अंतःशत्रूस जिंकणाऱ्या वीराची योग्यता, ही अश्वारूढ होऊन रणांगणावर रिपुदळे लोळविणाऱ्या शूरापेक्षाही जास्त आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले होते. ते खरे आहे. “मन एव मनुष्याणा, कारण बंधमोक्षयोः ।।” या श्लोकातूनही मनोजयाची महती विशद करण्यात आलेली आहे. कुमार्गाकडे धावणाऱ्या उच्छृंखल मनापेक्षा या जगामध्ये आपला अन्य कोणीही प्रबळ शत्रू नसतो असे मत भागवतकारांनीदेखील मांडलेले आहे.
मन हे चंचल आणि दुर्निग्रह असल्याचे सत्य अर्जुनाने कथन केल्यानंतर भगवान गोपालकृष्णांनी श्रीमद् भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातीलं ‘अभ्यासेनतु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते’ या पस्तीसाव्या श्लोकाच्या माध्यमातून मनोजयासाठीचा उत्तम मार्ग पार्थाला दाखविला आहे. त्यावर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी केलेले भाष्य फारच उदबोधक असे आहे. माऊली म्हणतात,
परि वैराग्येचेनि आधारें ।
जरी लाविले अभ्यासचिये मोहरें ।
तरी केतुलेनि एकें अवसरें ।
स्थिरावेल || कां जें यया मनाचें एक निकें ।
जे देखिलें गोडीचिया ठाया सोके ।
म्हणौनि अनुभवसुखचि कवतिकें ।
दावीत जाइजे ।। (६/४२०)
तुकोबांनादेखील या मनाचा नाठाळपणा चागलाच ठाऊक होता. त्यामुळे त्यांनी आपल्या मनाला व्यवस्थितपणे जिंकलेले होते. त्यांच्या जीवनातील असंख्य प्रसंगांमधून नेमकी हीच बाब वारंवार समोर येते. धन, कामिनी आणि प्रतिष्ठा हे परमार्थाच्या मार्गातील तीन प्रमुख खड्डे मानले जातात. मुळात परमार्थमार्गावरील पांथस्थ फारच कमी असतात. जे प्रवास सुरू करतात; त्यापैकी काही जण या पहिल्याच खड्यात पडून गायब होतात. जे त्यातून वाचतात: त्यांच्यापैकी काही जण दुसऱ्या खड्यात पडून गायब होतात. आणि त्यातूनही जे वाचतात ते सर्वाधिक धोकादायक अशा प्रतिष्ठारूपी खड्डयात अडकतात आणि मग त्यांचा त्यापुढील प्रवासच संपुष्टात येतो. केवळ तुकोबांसारखे काही निवडक संत आणि सत्पुरुष हेच या तीनही खड्यांमध्ये जरादेखील न अडकता थेट पुढे जाऊ शकतात आणि म्हणूनच तर ते भगवद्कृपेस खऱ्या अर्थाने पात्र ठरतात.
— श्रीराम अनंत पुरोहित
पत्रकार, कर्जत-रायगड
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
Leave a Reply