साधारण सन १९९० – १९९२ साल असावे लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या.माझी नेमणूक पुणे रेल्वे न्यायालयाला पोलीसांचा सरकारी वकिल म्हणून झालेली होती.त्यावेळी पोलीस खात्यात गाजलेले व नावाजलेले दोन पोलीस अधिकारी एक पुणे रेल्वेचे “पोलीस आधिक्षक” भुजंगराव मोहीते व दुसरे “होम डि वाय एस पी” माणीकराव दमामे नेमणूकीस होते.मी मोहितेसाहेबांना विनंती केली की “कांही दिवस मला पोलीस प्रशासन कामकाज पध्दत शिकायचीय.न्यायालयात काम करायला त्याचा नक्कीच फायदा होईल”.शिकायचय म्हटल्याबरोबर त्यांनी मला आनंदाने दमामे साहेबांच्या ताब्यात दिले.सहा महिने त्यांच्या सोबत कार्यालय व पोलीस स्टेशनचे प्रत्यक्ष (चांगले ,वाईट) कामकाज व न्यायालया संबंधित कामकाज जवळून पहाता आले.पोलीस मॕन्यूएल अभ्यासता आले. सहा महिन्यानंतर पुणे रेल्वे न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम पाहू लागलो.
न्यायालय प्लॅटफार्म क्र.१वर होतं.पुणे रेल्वे पोलीस स्टेशनला नेमणूकीस आसलेला आत्यंत धाडसी व “पोलीसींग” व तपास कामात हूशार असलेला तरूण फौजदार शिरीष गांधी यांचेशी कामा निमित्ताने रोजच संबध येऊ लागला.फौजदार गांधींचा एवढा दरारा होता की घोरपडी ,लोणी,उरूळी कांचन,जेजूरी परिसरातील गुन्हेगार म्हणायचे “पुणे ग्रामीण,पुणे शहरचे पोलीस परवडले पण रेल्वेचे पोलीस !नको रे बाबा”! मला सहा महिने प्रशासकीय व “कायद्याचे पोलीसी” ज्ञान बय्रापैकी मिळाले असल्यामुळे गांधी माझ्याशी तपास व कायदेशिर बाबीवर बय्राच वेळा चर्चा करित असत.
साधारण सन १९९१मध्ये ९२ साल असावे लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या.पुणे रेल्वे पोलीसांना निवडणूक बंदोबस्त (राखीव फोर्स ) दिलेला.बंदोबस्तासाठी दहा सरकारी जिप गाड्या कलेक्टर यांनी मंजूर केलेल्या व त्या पुण्यातील कोणत्याही शासकिय कार्यालयाकडून मागून घ्यायला सांगितलेल्या.बदोबस्त फोर्सची जबाबदारी फौजदार गांधींच्या कडे दिली होती. सेंट्रल बिल्डिंग मधील कार्यालयात जाऊन आधिकाय्रांना त्यांच्या गाड्या मागून व तसा कलेक्टरचा आदेश दाखवूनही कोणताही अधिकारी त्यांची गाडी देत नव्हता.गांधींनी त्यांच्या वरिष्ठांना सांगितले तर ते म्हणले “तु इन्चॕर्ज आहेस तुच मार्ग काढ”.गाड्या तर अर्जंट हव्या होत्या.गांधीनी रिमांडला कोर्टात आल्यावर त्यांची मला अडचण सांगितली. “पीपीसाहेब कांहीतरी उपाय सांगा”.मला माहित होत की निवडणूक कामकाजाला शासनाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.त्यांना सल्ला दिला की “कलेक्टर साहेबांना भेटा आणी अधिकारी गाड्या देण्याचा नकार देतात.आसे सांगून त्यांच्याकडून,गाडी ताब्यात घेतल्याचे कलेक्टरांच्या सहीचे आदेश घ्या .मात्र गाडी नंबरची जागा कोरी ठेवा” माझा सल्ला त्यांच्या लक्षात आला.सल्ल्याप्रमाणे त्यांनी दहा आदेश मिळवले व सकाळी ९.३० वाजताच सेंट्रल बिल्डिंगच्या गेटवर दोन तीन ड्रायव्हींग येणारे पोलीस घेऊन उभे राहीले. गेटमधून आत येणारी जिप दिसली की तिचा नंबर कलेक्टरांच्या लेखी आदेशातील मोकळ्या जागेत टाकून जिप ताब्यात घेऊ लागले .वर्ग एकच्या दर्जाचे आधिकारी गेटमधेच उतरून अॉफीसकडे चालत जाऊ लागले तर कांहीनी विरोध करून पाहिला पण कलेक्टरांच्या आदेशासमोर त्यांचे कांही चालले नाही.एका तासात दहा सरकारी गाड्या गांधीनी ताब्यात घेतल्या.
पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारात एक दर्गा आहे.त्या दर्ग्याच्या व स्टेशनच्या परिसरात फक्त कमरेला आर्धी चड्डी घातलेला किंवा कधीकधी फक्त टॉवेल लावलेला उघडा दणकट पिळदार शरीरयष्टीचा पायात कड ,पिळदार दंडात काळ्या करगोट्यातील ताविज घट्ट बांधलेला.व गळ्यात काळा करगोट्याचा गोफ व कायम आपल्याच तंद्रीतच असलेला “मस्तान” नावाचा वेडसर माणूस रहायचा व रहातो.तो कोणासीही बोलायचा नाही.रेल्वे पोलीस ,रिक्षा ,व्यवसायीक दुकानदार टॕक्सी वाले या सर्वांची श्रध्दा होती की त्याने जर स्वताहून कोणाला फटका किंवा लाथ मारली,अगदी थोबाडीत जरी मारली तरी त्यांचे इच्छित काम होणार म्हणजे होणारच. रेल्वेच्या लोकोमोटीव्ह शेड जवळ व पिंपरी रेल्वे स्टेशनला लागुनच रेल्वे हद्दीत रूळाजवळ मोठे मटक्याचे धंदे राजरोस चालायचे.आगदी पोत्याने धंदेवाल्यांच्याकडे नोटा जमा व्हायच्या.मटक्याचा आकडा लागावा म्हणून मटके बहाद्दर कायम मस्तान बाबाच्या आवती भवती फटका खाण्यासाठी घुटमळतआसत.त्याच्या लाथ वा फटका खाण्याने मटक्याचा आकडा लागतो का नाही हे फक्त त्या मटक्या वाल्यालांच माहीत.
निवडणूकीच्य धामधुमीत या मस्तान बाबाची महती निवडणूकीच्या उमेदवारांचे पर्यंत गेलेली होती.स्टेशन परिसरात ते प्रचाराला आले की कार्यकर्ते त्यांना मस्तान बाबा जवळ फटका खाण्यासाठी आणीत. पाच सहा उमेदवारांना त्या पायाळू बाबाने लाथा मारलेल्या मी पाहिले आहे.पण त्यातला एकच लाथ खाणारा उमेदवार विजयी झाला होता. सन १९९२ पासून आजपर्यंत बय्राच लोकसभा ,विधानसभा महानगर पालीकेच्या निवडणुका झाल्या. फौजदार गांधी डीवायएसपी पदावरून निवृत्त झाले.कितीतरी रेल्वे पोलीस आधिकारी आले गेले.रेल्वे कोर्टाची जागा बदलली .रेल्वेस्टेशनचा परिसर बदलला. मटक्याचे धंदे बंद झाले दर्गा, दत्तमंदीर सुधारली.पुन्हा निवडणुका लागल्या.म्हातारा थकलेला मस्तान बाबा आजूनही फक्त टाॕवेल लावून कोण फटका खायला येतोय का !याची वाट पहात स्टेशन परिसरात फिरतोय.
बाळासाहेब खोपडे
मोरगांव /पुणे
दि. मे १३-२०२४
Leave a Reply