गेले बरेच दिवस सुरु असलेल्या नेट न्युट्रॅलिटीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) कौल दिला आहे. त्यामुळे भारतीयांना आता त्यांच्या आवडीनुसार आणि पसंतीनुसार इंटरनेटचा वापर करण्याची मुभा मिळणार आहे.
गेले काही महिने रिलायन्स आणि फेसबुकने जाहिराती आणि होर्डिंगच्या माध्यमातून रिलायन्सच्या फ्री बेसिक्स प्लॅनचे जोरदार प्रमोशन केले. या मुद्द्यावर अक्षरशः रान पेटले होते. इंटरनेट हे माध्यम सगळ्यांसाठी समान असावं आणि त्यात भेदभाव असून नये हा नेट न्युट्रॅलिटीच्या समर्थकांचा मुद्दा होता. फ्री बेसिक्सची सेवा देणार्या कंपन्या त्यांना हवी असलेली माहिती ग्राहकाच्या गळ्यात मारू शकतील अशी शंका उपस्थित होत होती.
ट्रायने (दूरसंचार नियामक मंडळाने) हा मुद्दा मान्य करत नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने कौल दिला आहे. त्यामुळे ट्रायच्या आदेशानुसार सगळ्या ग्राहकांना त्यांना हवी ती माहिती मिळवण्याचा व त्यासाठी समान पैसे मोजण्याचा निर्णय अमलात आला.
‘फेसबुक’चा सीईओ मार्क झकरबर्ग याने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नेट न्युट्रॅलिटीच्या बाजूने दिलेल्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) कौल दिल्यानंतर दोनच दिवसात फेसबुकने भारतातून फ्री बेसिक्सचा गाशा गुंडाळला आहे. रिलायन्सने आता फेसबुकचा फ्री बेसिक्स प्लॅटफॉर्म पेड करण्याचा निर्णय घेतला आहे.
अखेर भारत फ्री-बेसिक्समुक्त झाला आहे.
हा रिलायन्स आणि फेसबुकचा मोठा पराभव समजायचा का अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
— निनाद प्रधान
Leave a Reply