नवीन लेखन...

आयुष्यात रिटेक नाही.. वन टेक ओके हवा

सांगावंसं वाटतंय की, विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं, तरी ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी जर मिळाली तरच अर्थ आहे ना? पण विरहाचं रुपांतर वियोगातच झालं, तर हळहळणं आणि उरलेलं आयुष्य मनस्तापात, दु:खात घालवणं याशिवाय पर्यायच राहणार नाही, नाही का?

माझ्या अगदी परिचयातला एक जण असाच हळहळत असतो. कुठल्याही हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर त्याला वडिलांची आठवण होते. ते म्हणाले होते, “मला एकदा हॉटेलमध्ये डोसा खायचा आहे रे”

“जाऊया की मग…त्यात काय? उद्याच नेतो तुम्हाला.” असं आश्वासन देऊन तो बाहेर गेला आणि तो उद्या आयुष्यात कधी उगवलाच नाही. कारण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याच रात्री वडिलांना हार्ट अॅटॅक! आणि जगाचा निरोप!

मुंबईत ताज-ओबेरॉयचा अतिरेकी हल्ला काय किंवा रेल्वेमध्ये झालेले बॉम्बस्फोट काय…कितीतरी जणांचे उद्या गिळंकृत करून गेले आणि वेदनांचे डंख जगणाऱ्यांसाठी ठेवून गेले. पेपरमध्ये त्यांच्या करुण कहाण्या छापून आल्या, तेव्हा कुणी आई म्हणत होती
“अभ्यास करत नाही म्हणून रागवायचे मी त्याला…आता?”

“नेहमी भांडायचो आम्ही…माहेरी जाईन, घटस्फोट देईन पर्यंत जायची भांडणं, आता?”, कुणी एक विधवा साश्रूनयनांनी विचारत होती

नाती, माणसं असतात तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो नं आपण?
जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात, तेव्हा कळते त्याची किंमत. पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि…आणि आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असतं.

म्हणूनच, या जन्माचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा. पूर्णविरामाचा क्षण, कुणास ठाऊक कधी राहील उभा!

सकाळी उठताना कंटाळा येतो? मग करून बघा विचार, सगळ्यांच्याच नशिबात कुठे असा सूर्य उगवतो? कुणी बिचारा झोपेतच जगाचा निरोप घेतो…मग बिछाना सोडून ताडकन उठावंसं वाटेल. आळसाला रामराम ठोकावासा वाटेल…

नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग…

स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आठवावी खपाटीला गेलेली पोटं…

अभ्यासाचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणावी ती अर्धनग्न कळकट मुलं, ज्यांना भीक मागण्यासाठी हात पसरावे लागतात सतत…

भूतकाळ माझा नाही. भविष्यावर अधिकार नाही. पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात. हे प्रेझेंट, हे बक्षीस, आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं. सजगतेनं जगायला हवं.

सुदृढ शरीराचा लाभ न घेता व्यसनाधीन होऊन छातीचं खोकं आणि किडनीची चाळणी करणारी मंडळी पाहिली की, अस्वस्थ व्हायला होतं.

एकत्र कुटुंबात राहणाऱ्याला घरं तोडून स्वतंत्र व्हायचे डोहाळे लागले की, वाईट वाटतं.

आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की, विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दु:ख पदरी नाही,ह्या भाग्याला सोडून, असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही?

अरसिक नवरा किंवा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात…

आई-वडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं.

सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलमधले रोगांशी झुंजणारे पेशंट दाखवावेसे वाटतात .

जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत, इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावसं वाटतं.

श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना, इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावासा वाटतो.

अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दिला गेला असेल तर …?

पिक्चरच्या शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेत येत नसतात.

म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न हवंहवंसं जगलं तर…?

Avatar
About Guest Author 523 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..