वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या अपारंपरिक पद्धतीत सौरऊर्जा, पवनऊर्जा, सागरीऊर्जा, भूऊर्जा इत्यादींचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जातो. यातील बहुतेक पद्धती या प्रदूषणापासून मुक्त आहेत.
सौरऊर्जेचा वापर करताना एकतर विशिष्ट प्रकारच्या (फोटोवोल्टाईक) सेल्स वापरून सौरऊर्जेचे रूपांतर थेट विद्युतऊर्जेत केले जाते किंवा – आरशाच्या साहाय्याने सूर्यकिरण एकत्रित करून मिळणाऱ्या उष्णतेद्वारे पाण्याची वाफ निर्माण केली जाते. या वाफेद्वारे जनित्राचा पंखा फिरवून वीजनिर्मिती केली जाते.
पवनऊर्जेच्या बाबतीत वाऱ्याद्वारे जनित्राचा पंखा फिरवून वीज निर्माण केली जाते. दिवसातून दोनदा येणाऱ्या भरती-ओहोटीचा वापरही विजेच्या निर्मितीसाठी केला जातो. भरती- ओहोटीच्या वेळी किनाऱ्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने होणाऱ्या पाण्याच्या हालचालीचा वापर करून जनित्र चालवलं जातं आणि त्याद्वारे विद्युतनिर्मिती होते. काही ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर लांबच लांब बांध घालून भरतीच्या वेळचं पाणी बांधाच्या किनाऱ्याकडील बाजूस जमा केलं जातं. तर ओहोटीच्या वेळी हे जमा केलेलं पाणी समुद्रात सोडलं जातं. बांधातील नलिकांमधून होणाऱ्या पाण्याच्या या हालचालीचा वापर करून जनित्राद्वारे वीज निर्मिती केली जाते.
उष्णकटिबंधातील समुद्राच्या पृष्ठभागाजवळील पाण्याचं तापमान हे पंचवीस अंश सेल्सियसहून अधिक असतं, तर एक किलोमीटर खोलीवरील पाण्याचं तापमान हे पाच ते दहा अंश सेल्सियस इतकं कमी असतं. या उष्ण आणि थंड पाण्याच्या मदतीने अमोनियासारख्या सहज बाष्पीभूत होणाऱ्या एखाद्या द्रवपदार्थाचं रूपांतर आलटून पालटून वायू आणि द्रवात केलं जातं. पदार्थाचं वायूत रूपांतर झाल्यानंतर प्रसरण पावणाऱ्या या वायूद्वारे जनित्राला जोडलेला पंखा फिरून विद्युतनिर्मिती होते. भूगर्भातील उष्णतेचाही असाच वापर केला जातो. यासाठी नलिकांद्वारे जमिनीत खोलवरून पाणी फिरवून आणलं जातं. वाढत्या खोलीबरोबर वाढणाऱ्या तापमानामुळे या पाण्याचं तापमान वाढतं. या उष्ण पाण्याद्वारे अमोनियासारख्याच एखाद्या पदार्थाचं बाष्पीभवन करून जनित्र चालवलं जातं. काहीवेळा भूगर्भातून बाहेर पडणाऱ्या वाफेचाही जनित्र चालवण्यासाठी थेट वापर केला जातो.
Leave a Reply