नवीन लेखन...

‘सोनी’ची ध्वजा जगभर फडकविणारे ‘नोरिओ ओगा’

Norio Ohga - The Man Behind Sony Corporation

संगणक व त्याच्याशी संबंधित लहानमोठी उपकरणे आता आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहेत. कॉम्पॅक्ट डिस्क- अर्थात ‘सीडी’ ही त्यातीलच एक.

रेकॉर्ड प्लेअरची जागा टेप रेकॉर्डरने घेतली आणि पुढे काही काळातच कॅसेट कालबाह्य़ ठरून त्यांची जागा ‘सीडीं’नी घेतली. संगीत साठवणे आणि ऐकणे हा ‘सीडी’चा केवळ एक उपयोग झाला. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही माहितीचा साठा संग्रहित करण्यापासून तो दुसर्‍याला हस्तांतरित करण्यापर्यंतच्या प्रचंड व्यवहारात ‘सीडी’ हे महत्त्वाचे माध्यम ठरले.

१९८२ साली सोनी कंपनीने पहिली सीडी बनवून वितरित केली तेव्हा हाताच्या एका पंजात मावेल अशी ही तबकडी कालांतराने धनाढ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांसाठी दैनंदिन वापराच्या वस्तूचे स्थान पटकावेल असे कोणालाही वाटले नसेल. मात्र फार थोडय़ा व्यक्तींना याची जाणीव असेल, त्यातीलच एक म्हणजे ‘सोनी’ या जगप्रसिद्ध उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष नोरिओ ओगा !

नोरिओ ओगा हे दूरदृष्टीच्या व्यावसायिक नेतृत्वापैकी एक होते. ‘सोनी’ची ध्वजा जगभर फडकविणार्‍या नोरिओ ओगा यांच्या कर्तृत्वाचा आलेख प्रचंड मोठा असला तरी त्यांची चटकन पटणारी ओळख कॉम्पॅक्ट डिस्क- अर्थात ‘सीडी’चा जनक अशी करून देता येईल. आपल्या उद्योगातून तयार होणारे कोणतेही उत्पादन हे मुख्यत: ग्राहकाला सहजतेने हाताळता आले पाहिजे हा ओगा यांचा आग्रह असे आणि या ध्यासातूनच त्यांनी या क्रांतिकारी तबकडीला जन्म दिला होता.

१९५३ साली ‘त्सुशिन क्योगो’ मध्ये आलेले नोरिओ ओगा तेव्हा फाइन आर्ट्स व संगीताचे शिक्षण घेत होते. ऑपेरा सिंगर होण्याचे त्यांचे स्वप्न होते. प्रत्यक्षात घडले ते वेगळेच. या तरुणाची ध्वनी व विद्युत अभियांत्रिकीची जाण आपल्याला फायद्याची ठरेल हे सोनीच्या संस्थापकांनी हेरले आणि ओगा हे रीतसर या उद्योगात रुजू झाले. तिशी गाठण्याआधीच ओगा अधिकारपदी पोहोचले. सर्वसाधारणपणे जपानी उद्योगात एवढय़ा अल्प काळात असे पद मिळणे दुर्लभ असते.

१९५८ साली ‘त्सुशिन क्योगो’चे नामकरण ‘सोनी कॉर्पोरेशन’ असे झाले. ही कंपनी जगातील पहिला टेपरेकॉर्डर बनविण्याच्या खटपटीत होती. अल्पावधीतच ते साध्य झाले आणि पुढे वर्षभरात ओगा हे कंपनीच्या टेपरेकॉर्डर विभागाचे सरव्यवस्थापक बनले.

ओगा यांचे स्वप्न त्यापुढचे होते. कॅसेटची एक बाजू वाजवून झाली की ती उलटी करून पुन्हा चालू करावी लागे. संगीत ऐकणार्‍यांसाठी ही एक ‘कटकट’ होती. एखाद्या गायकाचे गाणे ऐन रंगात आले आहे आणि तेवढ्यात टेप संपल्यामुळे रसभंग झालाय हे चित्र तेव्हा नेहमीचेच. त्यामुळे जास्त काळ, विना-व्यत्यय संगीताचा आस्वाद घेण्यासाठी एखादे नवे साधन शोधून काढता येईल काय, यावर त्यांचे विचारचक्र सुरू झाले.

त्यांचा आवडता संगीतकार बिथोवेन याची नववी सिंफनी ७५ मिनिटांची होती. ही पूर्ण सिंफनी सलग ऐकता येईल अशी १२ सेंटिमीटर व्यासाची कॉम्पॅक्ट डिस्क बनवण्याचा ध्यास त्यांनी घेतला.

१९८२ साली सोनीची पहिली सीडी बाजारात आली. अवघ्या पाच वर्षांतच सीडींच्या खपाने लॉंग प्लेईंग (LP) रेकॉर्ड्सना मागे टाकले. सीडीमध्ये सुधारणा होऊन १९९२ मध्ये मिनी डिस्क (एमडी) आली. त्यानंतर सीडीच्याच आकारात अधिक साठा करण्याच्या क्षमतेच्या ‘डीव्हीडी’ तयार होऊ लागल्या.

शिक्षण घेताना त्यांनी ऑपेरा सिंगर होण्याचे स्वप्न बाळगले होते, त्यानुसार स्वत:चा वाद्यवृंद बनवण्याची त्यांची मनीषाही पूर्ण झाली. ‘टोकियो फीलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा’ चे ते प्रमुख होते.

२००० साली निवृत्त झाल्यानंतरही ओरिओ नोगा यांनी सोनीच्या सल्लागारपदाची धुरा अखेपर्यंत सांभाळली. एप्रिल २०११ मध्ये वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि ‘सोनी’ची ध्वजा जगभर फडकविणारे एक सक्षम व खंदे नेतृत्व लुप्त झाले.

एखाद्या उद्योगसमूहाची कीर्ती देशाच्या सीमा ओलांडते… जगभर पसरते… खरे तर त्या उद्योगाला लाभलेले कल्पक आणि दूरदृष्टीचे नेतृत्व यासाठी कारणीभूत असते हेच खरे !

— निनाद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..