नवीन लेखन...

‘जावा’ने घडवलेली आठवणींची सफर – पूर्वार्ध

माझा सायकल ते मोटरसायकल शिकण्याचा प्रयत्न –

कशावरुन कधी काय आठवेल त्याचा नेम नाही. तसंच झालं. ‘लोकसत्ते’त एक बातमी पाहिली. महिन्द्र कंपनी ‘जावा’ मोटरसायकल ‘पुन्हा’ बाजारात आणणार, ही ती बातमी. ही बातमी वाचली आणि मन एकदम मागे गेलं. काही न काही कारणाने मला अशी भुतकाळात मधेच एखादी फेरी मारून यायची सवय आहे, त्याला इलाज नाही. नाहीतरी आपल्या कडू-गोड आठवणी भुतकाळातच असतात, भविष्यात काय वाढून ठेवलंय हे कुणालाच कळत नाही. गत आठवणींना असं अधे-मधे भेटून आलेलं स्वत:च्या आनंदासाठी आणि तब्येतीसाठीही बरं असतं. तर, पेपरातली ‘जावा’च्या पुनरागमनाची बातमी वाचली आणि मधली ३५-४० वर्ष गाळून एकदम मागे गेलो आणि माझं इयत्ता ७वी ते १० वीमधलं लपून सायकल शिकणं, सन ८१ ते ८७ सालातलं माझं काॅलेज जीवन, त्यातले मित्र, मोटरसायकल शिकण्यासाठी केलेली धडपड, माझ्या आयुष्यात आलेल्या मित्रांच्याच जावा/येझदी व इतर मोटरसायकल्स-स्कुटर्स, त्यांनी मला दिलेला आणि अजुनही मनात भरून राहिलेला अवर्णणीय आनंद इत्यादींच्या मनातल्या त्या सर्व आठवणी जिवंत झाल्या आणि हा दोन भागातल्या लेखात शब्दरुप घेऊन उतरल्या..!

मी राहायचो तो अंधेरी पूर्वेचा पंपहाऊस एरिया तसा त्याकाळी निर्जनच होता. आमच्यापुढेच काही अंतरावर महाकाली गुंफांकडे जायचा रस्त्यावर एक तबेला होता, त्याला सागून एक मारुतीचं मंदिर आणि पुढे तर तो रस्ता राना-वनातून जायचा. शेरेपंजाब काॅलनीच्या इमारतींचे रान माजलेले सांगाडे बरीच वर्ष तिकडे उभे होते. ते ठिकाण म्हणजे तेंव्हाच्या तरुण पोरा-पोरींचं लफडी करण्याचं किंवा नुसत्या पोरांनी दारु-सिगरेट प्यायला शिकायचं निर्जन स्थान होतं. कधीतरी आम्ही त्या रस्त्यावरून महाकाली गुंफांमधे पिकनिकला जायचो किंवा कधीतरी रात्री वडिलांच्या ख्रिस्तांव मित्रांसोबत शिकारीला. आता हे सांगुनही कुणाला खरं वाटणार नाही येवढा हा रस्ता गजबजून गेला आहे. थोडक्यात त्याकाळी हा रस्ता अगदी निर्जन असायचा. एखादी टॅक्सी किंवा तबेल्यात गवत घेऊन येणारा बेडफोर्ड कंपनीचा एखादा चुकार ट्रक सोडल्यास रस्ता अगदी मोकळा असायचा.

मी सायकल चालवायला कसा शिकलो, हे सांगण्यासाठी वरचं पाल्हाळ लावणं गरजेचं होतं. मला घरून सायकल चालवायला सक्त मनाई होती. याचं एकमेंव कारण म्हणजे माझ्या आईला मला अपघात होईल याची सतत भिती वाटायची. वरच्या परिच्छेदात वर्णण केलेलं चित्र जर तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं असेल, तर माझ्या आईला वाटायची ती भिती किती फिजूल होती, हे तुमच्या लक्षात येईल..

सन ७६-७७ च्या दरम्यान सायकल आम नव्हती. शेकडा एखाद्याच घरात सायकल असायची व ते घर श्रीमंतात सामील असायचं. आमच्यासारख्यांना सायकल भाड्याने घेण हा एकाच पर्याय असायचा. सायकली तेंव्हा भाड्याने मिळायच्या. ५० पैसे अर्था तास. शाळेत असतानाच मी सायकल चालवायला शिकलो होतो. ती ही चोरून. चोरुन अशासाठी की, माझ्या आईची मी सायकल चालवायला सक्त मनाई होती. अपघात होईल म्हणून. त्यात मी तीन बहिणींमंधला एकुलता एक मुलगा असल्याने मी काय करतो, कुठे जातो यावर तिचं बारीक लक्ष असायचं. त्यात मी सायकल चालवतो का यावर जरा जास्तच लक्ष असायचं. पुन्हा गरिबी. आठ आण्यालाही किंमत होती व म्हणून साय्क्ल्साठीचे ते आठ आणेही मिळायचे नाहीत तेंव्हा. कुणीतरी मावशी-मामाने खाऊसाठी दिलेले पैसे जपून ठेवायचे आणि मग त्यातून जमेल तशी सायकल भाड्याने घेऊन लपून-छपून चालवायची. फार लपताही येत नसे. याचं कारण त्याकाळचे शेजारी. त्यांची एरियातला कोण मुलगा काय करतोय यावर कडक लक्ष असायचं व तसं काही आढळल्यास लगेच झापायचे, वर घरी तक्रार करायचे. सीसीटिव्हीपेक्षाही भारी आणि अत्यंत कार्यक्षम अशी यंत्रणा असायची ही. आताचा कॅमेरा जसं घडलं तसं दाखवतो, तेंव्हाचे शेजारी त्यात स्वत:च्या पदरचंही थोडं टाकून घरापर्यंत पोचवायचे. त्यामुळे त्यांचा धाकही असायचा. आता सारख ‘तुमको क्या करनेका?’ असं बोलायचीही सोय नसे. त्याचीही तक्रार घरी व्हायची व दुप्पट मार खायला लागायचा. ’मी आज जे काही मार्गावर आहे, त्याच बरचस श्रेय ह्या शेजाऱ्यांना जात. ह्या सर्व अडचणीतून मित्रांच्या सक्रीय सहाय्याने मार्ग काढून बऱ्याच खटाटोपीनंतर मी सायकल शिकलो.

सायकल आल्यानंतर आता मोटरसायकल चालवाविशी वाटत होती. इथे सायकल मिळणे दुरापास्त, तिथे मोटार सायकल काय मिळणार, ती तर अगदी दुर्मिळ. त्या काळात मोटरसायकल अभावानेच दिसायची आणि ती ही जास्तकरून पोलिसवाल्यांकडे. तेंव्हाचे राजकारण मुख्यत्वेकरुन समाजकारण असल्यामुळे, समाजात कसलेही भेद नसायचे. एरियातली दादा मंडळीही आपापल्या दारू अथवा मटका व्यवसायात मग्न असायची. सर्वसाधारण माणसाला त्यांचा त्रास नसायचा. असलंच तर प्रोटेक्शनच असायचं. त्यामुळे राजकारणी आणि दादालोक यांच्यामुळे आतासारखा होणारा त्रास त्याकाळी पोलीसांना नसायचा आणि अम्हालाही नसायचा. एकंदर सगळीकडेच शांती असायची. त्यामुळे पोलीसवालेही कधीमधीच दिसायचे आणि म्हणूनच मोटरसायकलही कधीतरीच दिसायची. इतर कुणाकडे नव्हतीच, तर चालवायला मिळण्याचीही शक्यता नव्हती हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल.

मी ८१-८२च्या दरम्यान काॅलेजात दाखल झालो. जोगेश्वरीचं इस्माईल युसुफ हे माझं काॅलेज. स्टेशनजवळच पूर्वेला एका लहानशा टेकडीवर वसलेला हा काॅलेजचा परिसर होता मोठा रम्य.!. छोटसं हिल स्टेशनच होतं ते. घनदाट झाडी, त्यातून वर चढत जाणारे लहानसे रस्ते. एक लहानशी मशिदही होती. डेरेदार वड-पिंपळाची झाडं आणि टेकडीच्या माथ्यावर पिवळसर दगडात ब्रिटिश काळात बांधलेली देखणी एकमजली इमारत. या सर्व देखणेपणामुळे आमच्या काॅलेजात नेहेमी सिनेमाच्या शुटींग्स होत असायच्या.

आमचं हे काॅलेज त्याकाळात दुय्यम दर्जाचं समजलं जात असलं तरी, माझं श्रद्धास्थान असलेले पु. ल. देशपांडे या काॅलेजचे विद्यार्थी होते, याचंच मला जास्त अप्रूप. माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुलेही माझ्याच काॅलेजचे विद्यार्थी. कविवर्य शंकर वैद्य माझ्यावेळी आर्ट्सला शिकवायचे. या काॅलेजात दाखल झालो, अन् आतापर्यंत फक्त सिनेमात पाहिलेलं एक रोमॅंटीक जग समोर उघडं झालं.

काही काळातच काॅलेजात रुळलो. समान गुणधर्माचे सवंगडी मिळाले. माझा जो सगोत्र ग्रुप जमला, त्यात सर्व थरातले मित्र होते. माझ्यासारखे गरिब होते, खात्या-पित्या घरातले होते, तसेच खानदानी श्रीमंतही होते. पण आमच्यात परिस्थिती कधीही आड आली नाही. ह्यातील बहुतेक सर्व मित्रांशी माझी मैत्री अजुनही तशीच टिकून आहे. ही कथा जशी माझ्या मोटरसायकल शिकण्याची आहे, तशीच ती मला गाडी चालवायला शिकवणाऱ्या काही मित्रांचीही आहे.

ह्यापैकी एक मित्र होता. संजय पाटणेकर. श्रीमंत नाही, पण तसं म्हणता येईल अशा घरातला. उंचं, सावळा, नाकेला. एकदम राजबिंडा आणि मित्रांसाठी काही करायची तयारी असलेला. तेंव्हा बहुतेकजण काॅलेजमधे ट्रेन किंवा चालतच यायचे. आता सारख्या त्याकाळात मुलांच्या कुल्याखाली दुचाकी गाड्या नव्हत्या. क्वचितच कुणीतरी प्राध्यापक मोटरसायकल किंवा स्कुटर घेऊन यायचे, त्याचंच भारी अप्रूप वाटायचं आणि मग त्या गाडीला टक लावून बघत राहा, पार्क केलेली असली की हात लावून बघ असले उपद्व्याप सुरू व्हायचे. मोटरसायकल चालवायची अतृप्त इच्छा अशी पूर्ण करायची. अशी एखादी गाडी दुरून जात असली, की आमच्यात त्याची चर्चा व्हायची. त्यातून असं समजलं की, संजूची एक मावशी पालघरला राहाते आणि तिच्या यजमानांकडे मोटरसायकलही आहे म्हणून. एकदा असंच बोलता बोलता, “यार मुझे मोटरसायकल सिखने की इच्छा है, कुछ जुगाड कर ना” अशी माझी इच्छा बोलून गेलो. आणि मित्रांची इच्छा म्हणजे ती इकडची दुनिया तिकडे झाली तरी पूर्ण करायचीच, या स्वभावाच्या संजूने ते लगेच मनावर घेतलं..

एक रविवार ठरला. बोरिवली ते पालघर हे रेल्वेने साधारणत: साठेक किलोमिटरचं अंतर. आम्ही दोघं होतो, एवढं आठवतं. आणखी कोणी होतं की नाही ते आठवत नाही. आम्ही तीन-चार तासांनी पालघरला पोहोचलो. बिनधास्त आणि बेडर संजूला सवय होती मोटरसायकल चालवायची. मला मात्र हे नवीनच होतं. त्यामुळे माझा उत्साह फसफसून आला होता.

पालघरला पोहोचलो. संजूने मोटरसायकल ताब्यात घेतली. ‘राजदूत-२५०’ माॅडेल होतं ते.. गाडीला कधीतरी हात लावून बघितल होत, तेवढाच माझा आणि गाडीचा संबंध. आज तिच गाडी प्रत्यक्ष चालवायची होती. मला गाडी कशी चालवायची ते फक्त ऐकूनच माहिती होत. तशी त्या माहितीवर मनातल्या मनात गाडी बरीच चालवून झाली होती. चिमणराव-गुंड्याभाऊ हा जुना चित्रपट कुणी पहिला असेल, तर त्यात चिमणराव, म्हणजे आपले दिलीप प्रभावळकर गाडी चालवायला शिकतात असा एक प्रसंम्ग आहे. गाडी चालवणं चिमणरावांच्या अंगात इतकं भिनतं की, ते झोपेतही चक्क गाडी चालवतोय असे हात वारे करत, असा मजेशीर प्रसंग त्या चित्रपटात दाखवलाय. मोठी मजा येते तो प्रसंग पाहताना. त्याच मनोभुमिकेतून मी ही अनेकदा गेलो होतो. अगदी झोपेत नाही, मात्र येत जाता कुणी पाहात नाही असं पाहून अॅक्सिलेटर पिरगळ्यासारखं मनगट वाकव, टेबलवर बसल्या बसल्या पायाने गियर टाकल्याची अॅक्शन कर, असं करत मनातल्या मनात मनात मी भरपूर गाडी चालवली होती.

आता तर मोटरसायकल प्रत्यक्ष चालवायची वेळ आली. संजूने धिर दिला, “xxx डर मत, कुछ हो गया तो मै हूं”. त्याचा विश्वास खुप महत्वाचा होतं. कुठुनसा मनात आणि शरिरात एकदम आत्मविश्वास भरून आला. सायकल येत असल्याने तोल सांभाळायचा प्रश्नच नव्हता. गाडीवर स्वार झालो, किक मारली. पहिला गियर टाकला, गाडी व्यवस्थित उचलली आणि निघालो. पुढे सर्व काम संजून दिलेल्या आत्मविश्वासानेच केलं. व्यवस्थित जमलं. एकदाही पडलो नाही की गाडी मधेच बंद पडली नाही. मी गाडी शिकलो. मला गाडी चालवता येते हा आत्मविश्वास मिळाला, तो आजही शिल्लक आहे. हे सर्व संजय पाटणेकर नांवाच्या मित्राचे उपकार.

परिस्थिती यथातथाच असलेल्या माझ्यासाठी ह्या संजूने खूप काही केलं. अगदी काॅलेजची पुस्तकं, कपडे, बूट काय म्हणाल ते. तोंडातून ‘यार ये चीज होनी चाहिये’ असं म्हणायचा अवकाश, त्याच्या आवाक्यात असेल तर तो लगेच हजर करायचा. अजिबात स्वार्थ नाही. हा माझा प्रिय मित्र चार वर्षापूर्वी वयाची पन्नाशी पूर्ण करायच्या अगोदरच एका लहानश्या आजारपणात देवाघरी गेला. म्हणून वर तो ‘होता’ असा त्याचा उल्लेख केला आहे.

मी फाटका असुनही मित्रांच्या जिवावर पुढे खुप गाड्या उडवल्या, त्याची हकिकत पुढल्या भागात..!

(पूर्वार्ध समाप्त- उत्तरार्ध लवकरच)

— ©️ नितीन साळुंखे
9321811091

#उत्तरार्धाची_ओळख…-

तेंव्हा तीनच प्रकारच्या गाड्या होत्या. मी जिच्यावर गाडी चालवायला शिकलो, ती राजदूत-२५०, येझदी -२५० (जावाही बहुतेक हिलाच म्हणत) आणि राॅयल एन्फिल्ड -३५०. पैकी शेवटची राॅयल एन्फिल्ड किंवा बुलेट ही पोलीसांची समजली जायची. ती गाडी होतीही दणकट, जोरदार फायरींग. मोटरसायकलला फटफटी हे टोपण नांव बहुतेक हिच्याच फायरींगवरून मिळालं असावं. पोलीसांनाच शोभणारी. आताच्या एन्फिल्ड्स (आणि पोलीसहा) म्हणजे त्यांच्यापुढे अगदीच पानी कम. ही गाडी आणि ती वापरणारे पोलीस, दोघंही दणकट, त्यामुळे माझ्यासारख्या बारीक अंगकाठीच्या माणसाला तिच्या वाटेला कधी जावसं वाटलं नाही. ‘राजदूत’ला तसं काही रंगरुप नव्हतं. मला अजिबात आवडायची नाही ही गाडी. हिचा उपयोग मुंबईत जास्त करुन बीएसईएस या इलेक्ट्रीक कंपनीचे मिटर सुपरवायझर्स आणि ग्रामिण भागात दुधाचे भले मोठे कॅन मागे लावून नेण्यासाठी व्हायचा. हिचं फायरींगही अगदीच काहीतरी…।

(..संपूर्ण उत्तरार्ध लवकरच)

-नितीन साळुंखे

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..