पहिल्यांदा जहाजावर गेल्यावर एन आर आय स्टेटस म्हणजे नेमकं काय असतं याचा उलगडा झाला कारण जहाजावर जाण्यापूर्वी एन आर आय, एन आर आय हे फक्त ऐकून होतो. नेरुळ ला शाळेत असताना नवी मुंबईत करावे गावाजवळ एन आर आय कॉम्प्लेक्स बांधले जातेय हे पण माहिती होते. एन आर आय म्हणजे अनिवासी भारतीय, अशा भारतीयांना भारताबाहेर सहा महिने राहिल्यानंतर इन्कम टॅक्स भरावा लागत नाही, त्यांच्याकडे खूप पैसे असतात अशा ऐकीव माहितीवरून झालेला एक समज होता.
पहिल्या वेळेस जहाजावर गेल्यावर तिथे सिनियर अधिकाऱ्यांच्या तोंडातुन नेहमी एन आर ई डेज, एन आर आय स्टेटस हे ऐकायला मिळायचे. माझे एन आर ई डे पूर्ण झाल्यावर मी घरी जाईन, येणाऱ्याचे एन आर ई डे व्हायचे आहेत म्हणून मला दोन महिन्यात घरी जावे लागतेय, अशी अनेक वाक्ये कानावर पडायची. वर्षातील एकूण 365 दिवस त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त दिवस म्हणून पूर्ण 183 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस भारता बाहेर काम करून मिळवलेला पगार किंवा इन्कम यावर कोणताही इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही. तसं पाहिले तर परदेशात कामं करण्यासाठी गेलेले घरकाम करणारे, गवंडी, सुतार, ड्रायवर, बागेचे माळी, स्वयंपाकी, नर्स, डॉक्टर, इंजिनियर आणि बिझनेसमॅन हे सगळेच एन आर आय असतात. तरीपण परदेशात काम करणारे एन आर आय म्हणजे एक प्रकारचा स्टेटस सिम्बॉलच आहे असे भासवून भाव खाताना दिसतात.
एकदा एक ट्रेनी वायपर एका अधिकाऱ्याला मस्करीत बोलला होता की तुम्ही पण एन आर आय आणि मी पण एन आर आयच आहे फरक फक्त दोघातील पगाराचा आहे, तुम्हाला पंधरा वर्ष झाली मिळाला आणि मला पण सुरवातीच्या एका वर्षात का होईना पण एन आर आय चा स्टेटस मिळतोच की.
जहाजावर काम करणारे बहुतेक जण एन आर आय स्टेटस मिळवण्यासाठी धडपडत असतात. कोणी वर्षातील सहा महिने एकाच जहाजावर एकाच कॉन्ट्रॅक्ट मध्ये सलग पूर्ण करतात तर कोणी वर्षातून तीन तीन महिने दोन वेळा, तर कोणी एकदा चार महिने आणि दुसऱ्या वेळेस दोन महिने करून पूर्ण करतात. कंपनी सुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांचा एन आर आय टाइम पूर्ण होईल याची काळजी घेत असते. खलाशांचे कॉन्ट्रॅक्टच नऊ महिन्यांचे असतात त्यामुळे त्यांचा एन आर आय टाइम सलग आणि सहजच पूर्ण होत असतो.
इन्कम टॅक्स भरावा लागू नये म्हणून वर्षातून कसेबसे सहा महिने कुढत कुढत पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांसह जास्त पैसे मिळावे नऊ किंवा दहा महिने काम करून सुद्धा समाधानी नसणारे अधिकारी पण बघायला मिळतात.
एन आर आय स्टेटस पूर्ण होण्यासाठी कंपनी सांगेल तसं बऱ्याच अधिकाऱ्यांना ऐकावे लागते, जसे की सणासुदीला किंवा घरात एखादे कार्य असेल तर जहाजावर जायला किंवा जॉईन करायला उशीर होईल असे सांगितल्यावर कंपनी त्या अधिकाऱ्याला सांगते की आता जॉईन केले नाही तर आणखीन तीन महिने जॉईन करता येणार नाही ज्यामुळे एन आर आय स्टेटस पूर्ण होऊ शकणार नाही याची कल्पना असल्याने मग तो अधिकारी मनात नसताना, घरात कार्य असून काही दिवसांवर सण किंवा उत्सव असून देखील निमूटपणे जहाजावर जायला तयार होतो. परंतु कंपनीला सुद्धा चांगले अधिकारी टिकवून ठेवायचे असतात त्यामुळे हुशार, इमानदार आणि कर्तबगार अधिकाऱ्यांना कंपनी त्यांच्या सोयीप्रमाणे जहाजावर पाठवत असते किंवा त्यांच्या गरजे प्रमाणे सांगतील तसे रिलीव्ह करत असते. जहाजावर रिलीव्ह करायला किंवा जॉईन करायला कन्व्हेनियेंट पोर्ट असेल तरच शक्य होते, कन्व्हेनियेंट म्हणजे काही देशांत किंवा पोर्ट मध्ये तेथील स्थानिक नियम, कायदे एवढे किचकट असतात त्याशिवाय त्या पोर्ट मधून जाण्यायेण्यासाठी सोयी सुविधा पुरविणारे एजंट उपलब्ध नसतात. जसे की रशिया मध्ये सहसा भारतातील कुठल्याच अधिकारी किंवा खलाशाने जहाज जॉईन केल्याचे किंवा जहाजावरुन घरी गेल्याचे आजपर्यंत मी ऐकले नाही. नायजेरिया सारख्या देशांत जहाजावरुन विमानतळावर ने आण करताना खलाशी किंवा अधिकाऱ्यांची होणारी लुटालूट, त्यांना किडनॅप करून मागितली जाणारी खंडणी असे प्रकार होत असल्याने तिथे सुद्धा कंपनी सहसा कोणाला जहाज जॉईन करायला पाठवत नाही. मग जहाज अमेरिकेतून नायजेरियात जाणार असेल आणि तिथून पुन्हा अमेरिकेला यायला पंचवीस ते तीस दिवस लागणार असतील तर तेवढे दिवस कोणाला जहाज जॉईन करता येत नाही की कोणाला जहाजावरुन घरी परतता येत नाही.
इंजिनियरिंगला ऍडमिशन घेताना एन आर आय कोटा असायचा त्यावेळेस या अनिवासी भारतीय लोकांसाठी हा स्पेशल कोटा का असावा असा प्रश्न पडायचा. पण वास्तविक असे आहे की एन आर आय लोकांना टॅक्स द्यावा लागत नाही, बहुतेकांचे परदेशात बिझनेस, किंवा मोठ्या पगाराच्या नोकऱ्या असतात म्हणून त्यांच्याकडून जास्त फी आकारता यावी यासाठी स्पेशल कोटा ठेवला गेला.
एन आर आय लोकांना टॅक्स भरावा लागत नाही म्हणून टॅक्स भरणाऱ्या लोकांना त्यांच्याबद्दल असूया असते. तसं असण्याचे खरं म्हणजे काही कारण नाहीये, परदेशात नोकरी किंवा उद्योग व्यवसाय करून परदेशातील परकीय चलन आपल्या भारतात आणतात म्हणून सरकारने एन आर आय स्टेटस मिळवणाऱ्यांना टॅक्स मध्ये सुट दिली आहे. तसंही प्रत्यक्ष इन्कम टॅक्स भरला नाही तरीसुद्धा रोड टॅक्स, जी एस टी, सर्विस टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स यासारख्या इतर सर्व टॅक्स द्वारे सरकारला प्रत्येक जण या ना त्या स्वरूपात टॅक्स भरतच असतो ना. एवढंच कशाला पेट्रोल आणि डिझेलवर सुद्धा त्यांची जास्त किंमत मोजून प्रत्येक जण टॅक्स भरतोच ना.
शोअर जॉब करून अमेरिका, कॅनडा, युरोप किंवा गल्फ मध्ये असणारे एन आर आय हे तिकडे जाऊन स्थायिक होतात किंवा तिथले नागरिकत्व मिळवतात अशांची तडजोड वेगळी आणि अथांग समुद्रात तरंगणाऱ्या जहाजावर घरापासून, नातेवाईक, मित्रमंडळी आणि संपर्क क्षेत्र अशा सर्वांपासून लांब असेल तशा परिस्थितीत वादळ वारा, ताण तणाव अशा सतत हेलकावे खाणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीत एन आर आय स्टेटस मेंटेन करण्यासाठी एक एक क्षण आणि दिवस मोजत काम करावे लागते. नोकरी मुळे मिळालेले एन आर आय काय किंवा एन आर ई स्टेटस जे काही आहे ते जोपर्यंत नोकरी करू तोपर्यंतच राहील. पण माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाल्यामुळे शेवटपर्यंत शेतकरी राहीन हेच सगळ्यात मोठं भाग्य आणि तोच माझा अभिमान.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B.E.(mech ), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply