चित्रपटांतील नायिकांना “नृत्य “आलेच पाहिजे हा एक अलिखित नियम आहे. नायकांना जमले नाही (गेला बाजार – सनी देओल) तरी चालते, पण नायिकांची त्यापासून सुटका नाही. आजवर चित्रसृष्टीने अतिशय संस्मरणीय बहारदार नृत्याचे प्रसंग दिलेले आहेत आणि काही अत्युत्तम नर्तिकाही बहाल केलेल्या आहेत.
मला व्यक्तिशः आवडलेले तीन प्रसंग आणि त्या साकारणाऱ्या तिघीजणी !
१) चित्रपट- गाईड
हा सार्वकालिक महान हिंदी चित्रपट आहे. सर्वच आघाड्यांवर (अगदी देव आनंदही कधी नव्हे तर त्याचे “उत्तम” येथे देऊन गेलाय) हा चित्रपट सुखावणारा आहे. कदाचित त्याची लांबी आजच्या पिढीला खटकेल पण आम्हांला याची सवय होती. वहिदाने इथे एक ग्रेट नृत्य दिलेले आहे. तशी नृत्यासाठी ती कधीच प्रसिद्ध नव्हती (नर्तिका असली तरीही). तिला आम्ही अभिनयासाठी प्रामुख्याने ओळखतो. “ गाईड “ मध्ये ती पूर्णवेळ नर्तिका होती. पण मला इथे तिच्या भुजंगासमोरील नृत्याचा संदर्भ द्यायचा आहे. देव आनंदला घेऊन ती सपेऱ्यांच्या वस्तीत जाते. बावचळलेला देव बसलेला असतो तिथून ती एका झटक्यात उठते, जणू तेथे आधीच नृत्य करीत असलेल्या नर्तिकेला तिला एकप्रकारे इशारा द्यायचा असतो.
नंतरची तीन -साडे तीन मिनिटे ती अंग झोकून त्या सर्पावरची नजर हलू न देता नृत्य करते.पती कडून झालेली वैवाहिक घुसमट, दुर्लक्ष ती नृत्यातून दाखवून देते. तिला शरीरात बंदिस्त असलेली ऊर्जा झोकून द्यायची असते. दरवेळी देव आनंद फक्त बावळट चेहेऱ्याच्या अनेकविध छटा दाखवत राहतो. नृत्य कलेतील नवरसांचे भाव मुद्राभिनयातून दाखविणे तिने सहजगत्या साध्य केले आहे.तोल जाता जाता सावरणे तिने तर दाखविलेच आहे पण सुरुवातीला कपाळावरचे आणि नंतर गळ्याभोवतीचे धर्मबिंदू दाखवत तिने झोकून देत नृत्य करणे याचा अर्थ साभिनय दाखविला.नृत्यानंतरचे समेवर येत स्वाभाविक दमून जात विसावणे याला तोड नाही. पार्श्वसंगीताला तितकीच दाद देणे अपरिहार्य होते. काहीतरी अद्भुत पडद्याने दाखविले जे अजूनही नजरेसमोरून जात नाहीए.
२) चित्रपट- ज्वेल थीफ
पुन्हा एकदा देव आणि विजय हे बंधुद्वय आणि मास्टर स्ट्रोक वाले सचिनदा ! मात्र यावेळी नृत्याविष्कार करणारी ख्यातकीर्त दाक्षिणात्य कलावती होती वैजयंतीमाला. अंगी झिंग आणणारे गीत – ” होटोंपे ऐसी बात ”
तब्बल आठ मिनिटे चालणारा वाद्यकल्लोळ हा एस डी ची संगीतावरील हुकूमत आणि निर्मितीच्या छटा ऐकवून जातो. सुरुवातीची दोन मिनिटे वातावरण निर्मिती तर शेवटची दोन मिनिटे फक्त बेभान नृत्य. बुजगावण्यासारख्या देवकडे साफ दुर्लक्ष केले तरी चालेल असा माहोल त्या राजवाड्यात तयार झालेला आणि प्रत्यक्ष चोरीच्या आधीचा वैजयंती मालाचा घायाळ,भावानुकूल चेहेरा. वाद्यांच्या तालावर मात करीत वैजयंतीमाला जीव तोडून नाचलेली आहे.मुख्य म्हणजे हा सहजाविष्कार होता, त्यासाठी कोठल्याही प्रकारचे ओढून-ताणून प्रयत्न तिने केले नव्हते. सगळा नैसर्गिक मामला, डोळ्यांचे पारणे फेडणारा!
३) चित्रपट-जाग उठा इन्सान
तुलनेने अप्रसिद्ध असा हा मिथुन/राकेश रोशन आणि पूर्णतया श्रीदेवीचा चित्रपट. उच्च -नीच भेदभावांची किनार असलेला. देवीच्या मंदिरातील ” तरपत बीते तुम बीन ये रैना ” हे परिपूर्ण शास्त्रोक्त गीत. लता जितकी रमली आहे तितकीच श्रीदेवी या गीतातील पवित्र हावभावांमध्ये गुंतून गेली आहे.देवळातील शांत सांज,मिथुनच्या बासरीचे दैवी सूर ( दुर्मिळ राजेश रोशनचे श्रवणीय संगीत) आणि “आँ ” वासून बघणारे राकेश व देवेन वर्मा ! सगळं जग क्षणभर मंदिरात आणि तिच्या घुंगरात थांबलेलं. नर्तनाचा अस्सल आविष्कार- डोळे तृप्त !
असे भाव असलेले नृत्य अनेकदा पाहिलेले आहे, अगदी “दो अंजाने ” वाल्या रेखाचेही ! पण इथे सिद्ध करणे आहे- आईला घराबाहेर काढलेल्या पुजारी आजोबांसमोर आणि त्यासाठी त्यांच्याच मंदिरातील देवीसमोर गाऱ्हाणे घालणे सुरु आहे. ही आळवणी तृप्त करणारी आहेच तरीही श्रीदेवीची नृत्यांगना म्हणून खरी ओळख करून देणारी मात्र नाही.
यथावकाश तिचे लग्न राकेश रोशनशी झाल्यावर त्याला तिच्यात “देवी ” रूप दिसायला लागते आणि तो बावचळतो. हा न कळणारा अधिक्षेप (स्वतःचा गुन्हा माहित नसतानाचा) तिला छळू लागतो. गांवात बभ्रा सुरु होतो. एका सायंकाळी मंदिराच्या त्याच अंगणात बांध फुटून ती त्वेषाने नृत्य करू लागते आणि जणू सगळ्या जगाला जाब विचारू लागते. पुढची तीन मिनिटं तिची-फक्त तिची ! त्या अवमानित रूपवतीचे प्रलयंकारी नृत्य अधिक दाहक होते जेव्हा अवकाशातून विजा कडकडायला लागतात आणि त्वेष सीमारेषा ओलांडतो.
जणू हे दूरवरच्या मिथुन चक्रवर्तीच्या कानी जाते आणि तो स्वतःजवळची घननिळाची बासरी काढून तिचे सांत्वन करतो. विजांच्या पाठोपाठ जलसरी येतात, तिला शांतवतात आणि मग धीमं बहारीचं नृत्य सुरु होतं. क्लांत होऊन तीही मंदिराच्या प्रांगणात कोसळते पण तोपर्यंत श्रीदेवी ही अभिजात नर्तिका आपल्याला काबीज करून पुढे निघून गेलेली असते.
तिन्ही गाण्यांची उणीपुरी ९-१० मिनिटे, पण नृत्यकला आपल्यावर कोरून जातात.
क्षण दैवी झाले की बेभान कलावंत समर्पणातून स्वतःला झोकून देत कसा व्यक्त होतो याचा आपला अभ्यासक्रम पूर्ण होतो.
–- डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply