इंग्लंडमधील कुम्ब्रिया येथे १९५८ मध्ये काल्डर हॉल भागात पहिला अणुशक्ती प्रकल्प तयार झाला, तेव्हापासून मानवाने अणूपासून फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण केली आहे. काही अणू हे स्थिर असतात, पण काही अस्थिर अ असतात. त्यांना किरणोत्सारी समस्थानिके म्हणतात. मोठ्या अणूंचे विभाजन केले जाते; एकाचे दोन, दोनाचे चार असे तुकडे केले जातात तेव्हा मोठ्या प्रमाणात ऊर्जा मुक्त होते. त्यालाच अणुविखंडन असे म्हणतात.
अणूमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा असते. समजा आपण युरेनियम-२३५ घेतले तर त्यात ९२ प्रोटॉन व १४३ न्यूट्रॉन असतात. त्यावर न्यूट्रॉनचा मारा केला तर त्याचे रूपांतर युरेनियम २३६ मध्ये होते. ते युरेनियमचे अस्थिर रूप असते. त्यात ९२ प्रोटॉन व १४४ न्यूट्रॉन असतात. ते अस्थिर असल्याने त्याचे आणखी लहान अणू तयार होतात.
त्यात बेरियम व क्रिप्टॉन यांचा समावेश असतो. यातील दोन मुक्त न्यूट्रॉन हे युरेनियम-२३५ च्या आणखी अणूंवर आदळतात. त्यांचे दोन भाग करतात. प्रत्येकवेळी यात दोन न्यूट्रॉन तयार होतात. ही साखळी अशीच चालू राहाते. त्याला शृंखला अभिक्रिया म्हणतात. अणुबॉम्बमध्ये ही अभिक्रिया अनियंत्रित असते, तर अणुभट्टीत ती नियंत्रित केली जाते. अणुवीज प्रकल्प हा पारंपरिक वीज प्रकल्पासारखाच असतो.
फक्त फरक इतकाच की, त्यात उष्णता ही कोळसा, तेल, वायू जाळून मिळवली जात नाही, तर अणुविखंडनातून मिळवली जाते. त्यावर पाणी उकळवून त्याची वाफ निर्माण केली जाते व त्या वाफेवर टर्बाईन फिरवतात. हे टर्बाईन्स जनरेटरला जोडलेले असतात. त्यामुळे वीजनिर्मिती होते. वीजनिर्मिती करताना युरेनियम हे इंधन अणुभट्टीत एका काँक्रिटच्या आवरणाखाली घातले जाते.
त्या गाभ्याच्या ठिकाणी अणूंचे विखंडन केले जाते व त्यातून ऊर्जा मुक्त होते. यात सर्वांत महत्त्वाचे असते ते म्हणजे साखळी अभिक्रिया नियंत्रित करणे. त्यासाठी कॅडमियम व बोरॉन यांच्या कांड्या वापरून. जादाचे न्यूट्रॉन शोषून घेतले जातात. यात निर्माण झालेली उष्णता पाण्याला दिली जाते व त्यासाठी हीट एक्सचेंजरचा वापर केला जातो.
त्यात अणुभट्टीतील पाणी त्याची उष्णता दुसऱ्या लूपमधील थंड पाण्याला देते. त्यातून वाफ तयार होते. यात किरणोत्सारमिश्रित पाणी वेगळे राखले जातील. ही वाफ टर्बाईनला दिली जाते. टर्बाईन वेगाने फिरत असते. टर्बाईन जनरेटरला जोडलेले असते. त्यामुळे जनरेटरही फिरतो. त्यातून निर्माण झालेली वीज ग्रीडमध्ये सोडली जाते.
Leave a Reply