एकदा कर्करोगाचे निदान झाले की, रोगी स्वतः व त्याचे नजिकचे कुटुंबिय दोघांवर प्रचंड तणाव येतो. कर्करोगाचा इलाजासाठी इतर काही रोगांच्या तुलनेत खूप जास्त खर्च येतो. देण्यात येणारी औषधे व रेडिएशन हेदेखील खर्चिक उपाय आहेत. कर्करोगाला वापरण्यात येणारी औषधे व रेडिएशन यामुळे माणसाला अतिशय थकवा येतो, उलट्या होतात, मळमळते, डोक्यावरचे केस गळतात. या सगळ्याला आपल्याला तोंड द्यावे लागणार या भीतीने रोगी गर्भगळीत होतो.
देशातील बहुसंख्य रोगी कर्करोगाच्या इलाजासाठी मुंबईतील प्रख्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतात. कित्येक रोग्यांना त्यांच्या निवासस्थानापासून मुंबईला येण्याचा, मुंबईत राहण्याचा, औषधांचे खर्च परवडण्यासारखा नसतो. हॉस्पिटलमधील निरनिराळे विभाग कर्करोगाच्या उपचारासाठी शर्थीने झटत असतात. उपचार पूर्ण झाल्यावर रोगमुक्त रुग्णाची नियमित कालांतराने तपासणी केली जाते. या संपूर्ण कालखंडात रोग्याचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी समुपदेशन, आर्थिक मदत व राहण्याची सोय समाजसेवक संस्था करतात.
परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा सामाजिक कार्य करणारा विभाग गरजू रोगी व त्याचा एक नातलग यांना आर्थिक साहाय्य मिळवून देण्याचे कार्य करतो. त्यांच्याकडून हॉस्पिटलमध्ये नोंदणी झालेल्या रोग्यास व त्याच्यासोबत महाराष्ट्रातून किंवा देशातील कोणत्याही प्रांतातून येणाऱ्या सोबत्यास रेल्वेचा प्रवास विनामूल्य करता येतो. गरजूंची राहाण्याची गरज लक्षात घेऊन टाटा मेमोरिअल हॉस्पिटलने वांद्रा पूर्व येथे डॉक्टर बोर्जेस मेमोरियल निवासस्थानाची सोय केली आहे. येथे राहाणारे रोगी व त्याच्याबरोबरच्या सोबत्यास उपचारकाळात बसने हॉस्पिटलमध्ये नेण्या-आणण्याची सोय आहे. अशाच तऱ्हेची सोय नाना पालकर रुग्णालयातही केली आहे.
मुंबईतील कॅन्सर पेशंटस् एड असोसिएशन ही संस्था गरजू रोग्यांना महाग औषधे विनामूल्य मिळवून देण्याची व्यवस्था करते. त्यांच्या प्रवासाचा खर्च करते व बाहेरगावाहून आलेल्या रोग्यांची राहाण्याची सोय करते. टाटा मेमोरियल हॉस्पिटलशी संबंधित इंडियन कॅन्सर
सोसायटी या संस्थेत कर्करोग्याचे मानसिक व आर्थिक पुनर्वसन करण्यावर भर दिला जातो. येथे रोग्यांकडून शिवणकाम, वेतकाम, पर्सेस इत्यादीची निर्मिती करून घेतात.
ज्यामुळे रोग्याला अर्थार्जनाची संधी मिळते.
-डॉ. रजनी भिसे
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply