दरवर्षी जवळजवळ ५००० मुले दूरवरच्या प्रांतातून कर्करोगाचे निदान व उपचाराकरिता मुंबईत येतात. यातील च बहुसंख्य मुलांना कर्करोगावरील उपचार परवडण्यासारखे नसतात. अशा आर्थिक दुर्बल मुलांना सेंट ज्युड इंडिया चाइल्डस् सेंटर ही संस्था अत्याधुनिक, स्वच्छ, सुरक्षित निवारा देते.
सेंट जुड ही संस्था शामा व निहाल कविरत्ने यांनी स्थापित केली. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरजू मुलांस व त्याच्या आई-वडिलांना ही संस्था स्वच्छ, सुरक्षित, आरामदायक अशी राहण्याची व्यवस्था विनामूल्या करते.
कविरत्ने दाम्पत्याने लोअर परळ येथील म्हसकर हॉस्पिटलमध्ये २००६ साली आठ कर्करोगग्रस्त मुले व प्रत्येकाचे आई-वडील यांची राहण्याची सोय केली. त्यानंतर इंडियन कॅन्सर सोसायटीच्या सहकार्याने टाटा हॉस्पिटलजवळ २ टप्प्यात एकूण बावीस बालकांना निवारा दिला. खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटरच्या अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च व एज्युकेशन या संस्थेच्या सहकार्याने चौथ्या टप्प्यात सेंट जुड सेंटरमध्ये एकूण ४१ मुलांसाठी विनामूल्य राहाण्याची सोय केली.
सेंट जुड संस्थेने कर्करोगग्रस्त बालकांसाठी एक नमुनेदार वातावरण तयार केले आहे. १२ वर्षे किंवा त्याहून कमी वय असलेल्या बालकांना येथे प्रवेश मिळतो. प्रत्येक रोगी व त्याचे आई-वडील यांना राहाण्यासाठी वातानुकूल खोली, रेफ्रिजरेटर, औषधे ठेवण्यासाठी पेटी, मुलांना लागणारे टॉवेल, कपडे इत्यादीची अत्याधुनिक सोय येथे आहे. मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे जेवण मिळावे म्हणून प्रत्येक पेशंटसाठी छोटेखानी स्वयंपाकघराची व्यवस्था आहे. कर्करोग उपचारासाठी मुलांना ३-६ महिन्यापर्यंत- चहा-साखर, दूध, डाळ-तांदूळ इत्यादीचे सुरेख डबे प्रत्येक स्वयंपाकघरात रचलेले दिसतात.
यामुळे मुलांना त्यांच्या आईच्या हातचे आवडणारे जेवण मिळते व आई-वडिलांच्या सान्निध्यात मुले आनंदी राहतात. शाळेची उणीव भासू नव्हे म्हणून संस्थेतील कर्मचारी मुलांचा अभ्यास घेतात, मुलांना टी.व्ही.वरचे कार्यक्रम बघायला प्रोत्साहन देतात. मुले ड्रॉईंग, पेंटिंग, नाच-गाणी इत्यादी कार्यक्रमात भाग घेतात. सेंट जुड केअर सेंटर मुलांना त्यांचे दुःख-आजार, वेदना विसरून आनंदी आयुष्य जगण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. येथे प्रवेश देताना मुले गरजू आहेत याची खात्री करून त्यांच्या औषधांचा खर्च टाटा मेमोरियल हॉस्पिटल सोडवते. अशा तऱ्हेच्या लोकोपयोगी संस्था म्हणजे कर्करोग्यांची माहेरघरच.
-डॉ. रजनी भिसे
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply