जहाजावर रोटरडॅम मध्ये लोडींग सुरु होते त्यामुळे फोर ऑन एट ऑफ वॉच सुरु होते. रात्री बारा ते पहाटे चार चा माझा वॉच संपवून झोपायला जायच्या अगोदर ब्रिज वर चक्कर मारण्यासाठी गेलो. लोडींग सुरु असल्याने ब्रिजवर कोणीच नव्हते. रोटरडॅम पोर्ट मधील ऑईल टर्मिनल वरील सगळ्या जेट्टी आणि त्यावर बांधलेली जहाजे सोडीयम व्हेपर च्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघाले होते. युरोप मधील हवेचा गारवा जाणवत होता. पहाटेचे साडे चार वाजायला आले होते निरभ्र आकाशात चांदण्या लूकलूकत होत्या. लूक लूकणाऱ्या चांदण्यात हसणारा चंद्र उठून दिसत होता. हवेत गारवा तर होताच पण मधूनच वाऱ्याची हलकीशी झुळूक यायची आणि प्रसन्न वाटायचे. जहाजावर नसून महाबळेश्वर सारख्या हिल स्टेशन वर आहोत की काय असं वाटत होते. किनाऱ्यावर दूर दूरवर दिसणाऱ्या पवनचक्क्या लक्ष वेधून घेत होत्या. थंडगार हवेची झुळूक हळू हळू फिरणाऱ्या पवन चक्कीच्या पात्यामधूनच निघत असल्या सारखे वाटत होते. सगळ्या पवनचक्कीच्या विशाल पात्या एकाच वेगात फिरत असल्याने वरुणदेव त्या सर्वांना सिंक्रोनाइज करून फिरवतोय की हिपनोटाईज करून फिरवतोय असा संशय येत होता.
जहाजाच्या पाठीमागे असलेल्या मेन चॅनल मधून लहान लहान बार्ज आणि एखाद दुसरं जहाज इकडून तिकडे जाताना दिसत होते. पंधरा एक मिनिटांनी खाली केबिन मध्ये आलो तर केबिन एकदम गारे गार झाली होती. सेंट्रल एअर कंडिशन सिस्टिम चा फ्लॅप बंद असून देखील बाहेरील थंडी मुळे केबिन गार झालेली. बेडवर पडल्या पडल्या कधी झोप लागली आणि जहाज रोटरडॅम सोडून निघाले ते अकरा वाजता वेक अप कॉलची रिंग ऐकून उठल्यावर पोर्ट होल बाहेर बघितल्यावर कळाले. पावणे बारा वाजता जेवायला जाऊन बारा वाजता पुन्हा ड्युटी वर जायचे होते पण वेक अप कॉल वाजल्यापासून आठ ते दहा मिनिटे झाले नव्हते की लगेच पुन्हा रिंग वाजली. तोंडातला ब्रश काढून घाईघाईत तोंड धुवून फोन उचलला तर पलीकडून मोटर मन म्हणाला जसे असाल तसे या खाली इंजिन रूम मध्ये ऑईल स्पिल झाले आहे. खाली जाताना चीफ इंजिनियर, सेकंड इंजिनियर आणि जुनियर इंजिनियर हे पण सगळे घाई घाईत पळत चालले होते. खाली जाऊन बघतो तर प्यूरीफायर रूम मधून काळे हेवी फ्युएल ऑईल दरवाजा बाहेर ओसंडून वाहत होते. ड्युटी वर असलेला फोर्थ इंजिनियर आत जाऊन व्हाल्व बंद करत असताना दिसला. चीफ इंजिनियरसह तिन्ही मोटरमन डोक्याला हात लावून बसले होते. वितळलेल्या डांबरा सारखे चार पाचशे लिटर काळे कुट्ट हेवी फ्युएल ऑईल साफ करायला लागेल म्हणून सगळेच जण जाम वैतागले. फोर्थ इंजिनियरने सकाळी टाकीचा ड्रेन व्हाल्व ओपन केला आणि बंद न करता अलार्म आला म्हणून कंट्रोल रूम मध्ये अलार्म बघायला गेला. अलार्म रिसेट करता करता तो ड्रेन व्हाल्व बंद करायचेच विसरून गेला. तासाभराने मोटरमन ने पाहिले म्हणून लक्षात आले. चार तास चीफ इंजिनियरसह सगळे जण तहान भूक विसरून काळे कुट्ट हेवी फ्युएल ऑईल साफ करत बसले. सगळ्यांचे बॉयलर सूट तर काळे झालेच पण घाम पुसत असताना ऑईल लागल्याने चेहरे पण काळवंडले होते. सगळी साफ सफाई झाल्यावर फोर्थ इंजिनियर मान खाली घालून उभा होता. त्याला चीफ इंजिनियर म्हणाला ठीक आहे होते असे कधी कधी पुढल्या वेळेस काळजी घे.एखाद्या टँक मध्ये ऑईल लेव्हल किती आहे याची कॉम्पुटर वर माहिती मिळते, वॉर्निंग साठी लो किंवा हाय लेव्हल अलार्म पण वाजतात. पण मानवी चुका आणि दुर्लक्ष झाले की कितीही कॉम्प्युटरायजेशन आणि ऑटोमेशन केले तरी उपयोग होत नाही. ज्यामुळे ऑईल खाली ड्रेन टँक मध्ये न जाता बाहेर आले त्या लाईनचा चोक अप काढून घे वेळ आल्यास नवीन पाईप बनवून घेण्याची सूचना देऊन चीफ इंजिनियर निघून गेला. फोर्थ इंजिनियर सगळ्यांना सॉरी बोलल्याने वैतागलेले मोटरमन सुद्धा हसायला लागले चार साब दिन मे गर्ल फ्रेंड के सपने देखोगे तो ऐसा ही होगा म्हणून त्याला चिडवायला लागले. खाली इंजिन रूम मध्ये ऑईल स्पिल झालंय हे इंजिन डिपार्टमेंट सोडून कोणालाच माहिती नव्हतं. दुपारी साडे तीन वाजले तरी अकरा जणांच्या इंजिन कृ पैकी कोणी जेवायला कसे आले नाही म्हणून कॅप्टन चा फोन तेवढा येऊन गेला होता.
संध्याकाळी साडे चार वाजता पुन्हा ड्युटी संपल्यावर ब्रिजवर गेलो असताना जहाज इंग्लिश खाडी जवळ पोहचत असल्याचे समजले. एका बाजूला फ्रांस चा किनारा तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा किनारा. इकडून तिकडे जाणाऱ्या लहान मोठ्या फेरी बोट दिसत होत्या. आमचे जहाज इंग्लिश खाडीच्या लाटा कापत वेगाने निघाले होते. वर आकाशात कितीतरी विमाने इकडून तिकडे जाताना दिसत होती. मागे आणि पुढे एकसुद्धा जहाज नसल्याने दोन्ही बाजूला दिसणारे किनारे मागे पडून काही तासांनी आमचे जहाज अथांग समुद्रात एकटं पडणार होते.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B.E. (mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply