एक लहान मुलगी एका ऊंच पहाडावर चढत असते. तिचे घर त्या पहाडाच्या पलिकडे असते. तिच्या पाठीवर एक लहान मुलगा असतो. पहाड चढायला फार कठीण असतो.
त्या मुलीबरोबर एक साधुही तो पहाड चढत असतो. तो त्या मुलीकडे बराच वेळ पहात असतो. त्याला तिची दया येते. ती वयाने एवढी लहान असून एवढे ओझे घेऊन चढत असते. तो तिच्या जवळ जातो. तिला म्हणतो “बाळा, तू एवढे ओझे घेऊन चढते आहेस. दमली असशील. हा पहाड चढायलाही त्रासदायक आहे. मी तुला काही मदत करु का? ”
ती मुलगी वळून त्या साधूकडे पहाते आणि त्याला तोंडानेच प्रणाम असे म्हणते. तो साधु मान हलवून तिच्या नमस्काराचा स्विकार करतो. ती मुलगी पुढे म्हणते “तुम्ही मला मदत करण्यासाठी हात पुढे केलात त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. पण तुम्ही म्हणालात की मी ओझे घेऊन चढते आहे. तुम्ही कशाबद्दल बोलत होतात ते मला नाही कळले. ”
साधु तिच्या पाठीवरच्या मुलाकडे बोट दाखवितो. ती मुलगी हसते आणि म्हणते “हे होय. हे ओझे नाही आहे. हा माझा छोटा भाऊ आहे. मला त्याचे ओझे वाटणे शक्य नाही. तुमच्या मदतीबद्दल मी आभारी आहे. परंतु मला माझ्या भावाचे ओझे वाटत नाही. हा पहाडही माझ्या घराकडे मला घेऊन जाणार आहे. तो माझ्या सवयीचा आहे. त्यामुळे मला त्याचीही काळजी नाही. ”
साधुला त्या मुलीच्या बोलण्याचे कौतुक वाटते. त्या दिवशी संध्याकाळी मठात प्रवचन करताना तो ही गोष्ट आपल्या शिष्यांना सांगतो. “ज्या कामात आपल्याला आनंद मिळतो त्याचा आपल्याला त्रास वाटत नाही, त्या जबाबदारीचे ओझे वाटत नाही”. उदाहरणादाखल तो त्या पहाड चढणाऱ्या मुलीचे बोलणे आपल्या शिष्यांना सांगतो.
प्रत्येक शिष्य विचार करु लागतो. खरोखरच ज्या कामात आपल्याला आनंद मिळतो त्याचा त्रास आपल्याला कधीच वाटत नाही. लहान मूल जन्मल्यापासून आईला अनेक कष्ट घ्यावे लागतात. रात्र रात्र जागरण करावे लागते. परंतु आई त्याबद्दल कधीच, कुठलीच तक्रार करत नाही. उलट तिला त्या जबाबदारीचा अभिमान वाटतो. आपल्या बाळामुळे आपण आई झालो यासाठी तिला कृतज्ञता वाटते. या उलट सावत्र आईला मुलाचे ओझे वाटते.
एकच काम परंतु दोन स्त्रियांना त्याबद्दल वेगळ्या भावना वाटतात. दिवसरात्र आपले आयुष्य विसरुन एक आई मुलामध्ये तन्मय होते. तर दुसरी, आपलेपणा नसलेली त्याचे एखादे लहान काम करायलाही नाराज असते. तिला त्या कामाचे ओझे वाटते.
आपलेही असेच असते. आपल्याला आवडणाऱ्या कामात आपण स्वतःला विसरतो. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण कितीही कष्ट घ्यायला तयार असतो. परंतु न आवडणारे काम करावे लागले तर आपण किती तक्रार आणि कटकट करतो. जीवनातले खरे यश यात आहे की आपल्याला मिळालेले काम आणि जबाबदारी यातच आपण आनंद शोधला पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. बहुसंख्य लोकांना आपल्या आवडीचे काम अथवा जीवन जगायला मिळत नाही. त्यामुळे त्यांची सारखी कुरबुर चालू असते. मिळालेल्या कामात अथवा जीवनात आनंद शोधला तर आपलेही जीवन आनंदी होऊन जाते. लहान मुलीच्या त्या गोष्टीवरुन आपण थोडे अंतर्मुख व्हायला हरकत नाही.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply