नवीन लेखन...

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने

जगातील ६० टक्के लोक किनाऱ्यापासून ६० कि. मी.च्या प्रदेशात राहतात. साहजिकच किनारी भागातील लोकांना पुरातन काळापासून हवा, वनस्पती व त्यांचे महत्त्व माहीत होते. खारफुटी- संदर्भात दंतकथा, इतिहास ज्ञात आहे. भारतापुरते बोलायचे तर चेन्नईजवळ चिदम्बरम् येथील नटराजाच्या देवळात एका खारफुटीच्या झाडाची ‘स्थल वृक्ष’ म्हणून एक मूर्ती स्थापन केली आहे. भाविक आजही तिला पूजतात. सुंदरबनात ‘बनबिबी’ नावाची देवता खारफुटीच्या जंगलाची देवता समजली जाते.

महाराष्ट्रातील किनाऱ्यालगतच्या भागात भरती व ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यानच्या भागात तसेच खाड्यांच्या मुखांशी असणाऱ्या दलदलयुक्त खाजण भूमीवर खाजण अथवाखारफुटी वनस्पती आहेत. खाजण वनातील झाडांना सुंद्री असे सामान्य नाव आहे. हा वृक्ष तिवरांच्या गटात मोडतो.

सुंदरी (लुकिंग ग्लास मॅग्रोव्ह, शास्त्रीय नाव: Heritiera littoralis) हा वृक्ष प्रामुख्याने बंगाल मधील सुंदरबनाच्या दलदलीत मोठ्या प्रमाणात आढळतो. पानाच्या खाली असलेल्या चंदेरी आवरणामुळे याचे इंग्लिश नाव पडले आहे.
सुंदरी हे या वृक्षाचे बंगाली नाव आहे.

सुंदरी वृक्षाची पाने साधारण वडाच्या पानाच्या आकाराची असतात. वरून हिरवी आणि खालच्या बाजूला चंदेरी व थोडी खरखरीत असतात. नर-मादी फुले एकाच झुपक्यात येतात आणि सर्व फुलांवर नाजूक लव असते. फुले घंटेच्या आकाराची ५ मिमी लांबीची, साधारण पिवळट हिरव्या रंगाची असतात. फळ टणक, होडीसारखे, गडद भुरकट रंगाचे आणि ४-८ सेंमी लांब असते.

जुन्या व संपूर्ण वाढ झालेल्या वृक्षास रिबनसारखी नागमोडी वळणाची आधारमुळे असतात. ही मुळे फारच भव्य दिसतात. आणि वृक्षास एक वेगळेच स्वरूप प्रदान करतात.

हा वृक्ष महाराष्ट्रात दुर्मीळ आहे. सिंधुदुर्गातील समुद्रकिनारी असलेला एकमेव सुंदरी वृक्ष एका देवराईत आहे. डुंगोबा राईत सुंदरीचे पन्नासएक वृक्ष असल्याची नोंद आहे. या वृक्षास येथे मोठ्या आधारमुळ्या तयार झाल्या आहेत. सुंदरीला या भागात समुद्रकांडोळ असे नाव आहे. मुंबईत राणीच्या बागेत एक सुंदरी वृक्ष होता, पण त्याची एक फांदी मोडल्यामुळे तो पूर्ण वृक्षच तोडला गेला. सुंदरी वृक्षाकडे बघताच त्याच्या देखण्या दर्शनाने ‘ सुंदरी ‘ नावाची सत्यता पटते. हा वृक्ष ४० – ४५ फुट वाढतो. गर्द हिरवी वडाच्या पानांच्या आकाराची पाने खालच्या बाजूने चंदेरी छटा मिटवितात आणि थोडी खरखरीत असतात. पाने अभिमानाने मिरवण्यासाठी भरपूर फांद्या चारही बाजूंनी डौलदारपणे झुलत असतात याची फुले मात्र साधी – सुधी छोट्याशा झुपक्यात येतात.

नर आणि मादी फुले वेगळी असतात पण एकाच झुपक्यात येतात. सर्व फुलांवर नाजूक लव असते.
महाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या समुद्र किनाऱ्यावर व मुंबई मध्ये ठाण्याच्या खाडीत हे वृक्ष आढळतात. त्यात प्राधान्याने रीझोफोरा, अविसिनीया, सोनेरेशिया इत्यादी वृक्ष आहेत.

रीझोफोरा हा ट्रॉपिकल मॅन्ग्रोव्ह वनातील वृक्ष आहे. Rhizophora mangle ही जात ज्यास्ती प्रमाणात दिसून येते. परंतु त्याच्या काही हायब्रीड जातीपण आहेत.

रीझोफोरा किंवा सर्वच खारण भागात वाढणाऱ्या वृक्षांनी आपल्या रचनेत बरेच बदल केलेले आहेत. कारण त्यांना समुद्राच्या खारट पाण्यात जिवंत राहायचे असते. त्यापैकी एक म्हणजे numatophores. हे त्या झाडांच्या मुळांचे विस्तार असतात. ह्यांच्यावर छोटी छिद्रे असतात ज्याच्यामुळे ही हवेतील ऑक्सिजन शोषून तो खारट पाण्या मद्धे असणाऱ्या मुळांना पुरवतात. आणि त्यांच्या मुळामद्धे एकप्रकारचा खारट पणा काढण्यासाठी नैसर्गिक पंप असतो.

हे वृक्ष समुद्राच्या मध्य भागात (Intertidal झोन) मध्ये असतात जिथे समुद्र साधारणपणे स्थिर असतो. मॅन्ग्रोव्ह प्रकारच्या वनस्पतीमध्ये त्यांचे बीज अंकुरणं वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यास विविपेरस अंकुरण म्हणतात. यामद्धे बीज फांद्यांवर उलटे असते व त्याचा शेपटीकडे भाग लांब , टोकदार व कठीण असतो. बीज वाळल्यावर ते तसेच उलटे समुद्राच्या चिखलात खोलवर रुतून बसते आणि नंतर त्याचे नवीन झाड तयार होते.

तिवरांची जंगले हा दुर्लक्षित विषय आहे. शिवाय त्याच्या वरची शास्त्रीय माहितीही फारशी मिळत नव्हती. अशा परिस्थितीत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्र विभागात डॉ. जी. व्ही जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संशोधक विध्यार्थानी १९७५ पासून संशोधन केले. ते जवळ जवळ २५ वर्षे चालले. त्यातून या खारफुटी वृक्षांची खूप शास्त्रीय माहिती मिळाली व तिला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली.
खारफुटी जंगलांचे महत्व

खारफुटीची जंगलं असलीच पाहिजेत का?

अर्थातच. मुंबईत आपल्याकडे २००५ मध्ये २६ जुलै रोजी मिठी नदीने आपले पात्र ओलांडून केलेल्या पुराने हाहाकार माजवला. तो खारफुटीच्या नाशामुळेच होता. खारफुटींची मुळे जमिनीत खूप खोलवर जातात. ती गाळाला किंवा जमिनीला धरून ठेवतात. तशी ती वरही येतात. हवेतील प्राणवायू घेतात. पूर, वादळ, त्सुनामी आल्यास पाण्याचा लोंढा या वनस्पतीच्या मुळाशी, झाडात, तसंच पानात अडतो. जेणेकरून वाढलेली पातळी शहराकडे तितक्या वेगाने पोहोचत नाही. खारफुटी ही या सगळ्याला प्रतिबंधक आहे आणि तीच तोडली गेली. त्यामुळे सरळ पाणी आत आलं. त्यामुळे भविष्यात असे धोके टाळण्यासाठी खारफुटींचं जतन अत्यावश्यक आहे.

ठाणे येथील खारफुटीची जंगले नष्ट होण्यास प्रामुख्याने बिल्डर जबाबदार आहेत. कारण खार फुटीच्या झाडापासून त्यांना काहीच फायदा होत नाही पण तेथील झाडे नष्ट करून त्या जागेवर भर टाकून जमीन तयार करून तेथे गगनचुंबी इमारती बांधून अमाप पैसा मिळवता येतो हेच त्या मागील कारण आहे.

खारफुटी जंगलांना राखीव संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.

खारफुटीचे नष्ट होणारे अधिवास व कमी होत चाललेले त्यांचे महत्त्व यामुळे पर्यावरण मंत्रालयाने त्यांना ‘अतिमहत्त्वाच्या वनस्पती’चा दर्जा दिला व पुढे सागरी नियंत्रण कायदा, वन कायदा यामध्ये त्यांना समाविष्ट करून त्यांच्या संरक्षणाची कायदेशीर तरतूद केली. न्यायालयांनीसुद्धा वेळोवेळी कठोर धोरण अवलंबून खारफुटींच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले. तरीही गेल्या दोन दशकांत भारतात खारफुटींचा नाश झालेला आढळतो. या अनास्थेचे सर्वात मोठे कारण म्हणजे खारफुटीबद्दलचे अज्ञान. एक दृष्टिकोन असा आहे, की या मानवास कुठलाही उपयोग नसलेल्या व रोगराई पसरविणाऱ्या टाकाऊ वनस्पती आहेत. तर याच्या विरोधात काही पर्यावरणवाद्यांनी त्यांचे असे गुणगान केले, की यासम याच.

खारफुटीचे आणखी काही उपयोग

समुद्रात होणारं तेल, कचरा, रसायनाचे प्रदूषण खारफुटी शोषून घेते. या वनस्पतीमध्ये प्रदूषण शोषण्याची ताकद खूप जास्त आहे. तिच्या मुळाशी खूप मोठ्या प्रमाणावर सेंद्रीय गोष्टी साठतात. मासे, खेकडे, कीटकांचे ही वनस्पती म्हणजे नैसर्गिक अन्न आहे. वनस्पतीच्या मुळाशी कित्येक प्रकारचे मासे, खेकडे अंडीसुद्धा घालतात. तर, काही जलचर, कीटक ती खाण्यासाठी येतात. पूर्वी ठाण्यात खूप मच्छिमार असण्याचे कारण हेच होते. खारफुटीमुळे मासे येत होते. पूर्वी लोक जळाऊ लाकूड म्हणूनही वाळलेल्या वनस्पतीचा वापर करत होते. मोठ्या वृक्षांचा फर्निचरसाठी वापर होतो. ते टिंबर वुड म्हणून ओळखले जाते. मेस्वाक वनस्पती म्हणजे खारफुटी सदृश झाड आहे, दंतमंजनात तिचा उपयोग होतो. मधुमेहासाठी खारफुटीपासून औषधे करतात. संधीवात, गॅसेसवर हा उपचार आहे. तिच्यात औषधी गुण मोठ्या प्रमाणावर आहे. जगात यावर खूप संशोधन केलं जातंय.

आंतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन – २६ जुलै रोजी पाळला जातो.

या बरोबरच हि लेखमाला येथे संपवत आहे. यामद्धे आपण महाराट्रातील प्रत्येक प्रकारच्या जंगलातील महत्वाच्या वृक्षांची ओळख करून घेतली आहे.अजूनही

वनस्पती शास्त्रात बऱ्याच चमत्कारिक गोष्टी आहेत. त्याबद्दल आपण नंतर बोलू (लिहू).

— डॉ. दिलीप कुलकर्णी.

संदर्भ:

BY CITY BELL ON FEBRUARY 23, 2022

खारफुटीची जंगले – Loksatta 04-Jun-2017

मराठी विकिपेडिया

गूगल वरील बरेच लेख.

सर्व फोटो गूगलच्या सौजन्याने

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 76 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने

  1. डॉ.कुलकर्णीह्यांचा खारफुटी वरचा लेख, नुकत्ताच वाचनात आला. समुद्राच्या खाडीत आढळणारी हि वनस्पती क्वचित च कुणाचं लक्ष वेधून घेईल येवढी अनाकर्षक असते. मी, स्वतः ठाणेकर असल्याने आम्हा ठाणेकरांना ती नवीन नाही, पण पठारावर राहणांर्याना हिच्या विशे जास्तं माहिती नसावी. त्यांच्या साठी हा लेख नक्कीच उपयुक्त आहे.ह्या वनस्पती चे मेन्ग्रोव्ह हे इंग्रजी नाव बहुतेकांना परिचित असेल. बंगाल च्या खाडीत येणारे, सुंदरी म्हणून ओळखले जाणारे एक वृक्ष तसे आगळेवेगळे असे आहे, ते ह्या लेखातून समजलं, महाराष्ट्र मध्ये हा अभावानेच दिसुन येतो. खारफुटी व सुंदरी हे दोन वेगळी झाडं का एकच झांडची दोन नांव, ह्या बद्दल शंका वाटते. लेखकाने ह्या दोघांचे भेद आणखी उलगडून सांगीतले असते तर, ह्याचा उलगडा झाला असता.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..