काल एक वेगळा अनुभव आला होता. दुपारी अचानक मोबाईल वाजला. फोन मी कधीच उचलत नाही ऐकू येत नाही म्हणून. त्यामुळे घरचे. नातेवाईक मला फोन करत नाहीत. हो पण कधी कधी काय होते की हे त्यांचा फोन इथेच ठेवून बाहेर बैठकीत वगैरे जातात आणि अशा वेळी काही महत्त्वाचे सांगायचे असेल तर मुलांचा फोन येतो. माझ्या फोन वर करतात म्हणून मी हाका मारत असते. तिकडून आलो आलो असे हे कितीही ओरडून सांगितले तरी मला ऐकू येत नाही माझे अहो अहो हे चालूच असते. आणि आल्यावर आधी ओरडा खावा लागतो तेव्हा पासून मी पण ढिम्म बसून राहणे पसंत करते. ज्यांना गरज असेल तर ते बोलतील किंवा फोन पाहून यांच्या लक्षात येईल. मला काय करायचे आहे. ऐकू येत नाही हा माझा दोष नाही. त्यामुळे आपल्या सोबत फोन घेऊन जायचे होते. एक तर सांगा ते सांगा आणि वरुन बोलणी खा काही गरज? आणि नंतर मोबाईल वर एका विद्यार्थ्यांनीने व्हॅटस अप वर बाई मी तुमची विद्यार्थीनी. फेसबुकवर तुमचा फोटो पाहून तुमच्या मुलीकडून नबंर घेतला आहे. मग ऐकू येत नाही असे सांगितले. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की ऐकू येत नाही असे सांगितले की हेडफोन कानयंत्र वापरा असा प्रेमळ सल्ला दिला जातो. अरे काय चाललय हे मला माहित नाही का हे सगळे. एका अपघातात डावा कान गेला आणि आता वय ८१+ आहे का यावर उपाय काही. असो परदु:ख शितल त्यानंतर तिचे इंग्रजाळलेले मराठी. मी सुवर्णा पाटील जोशी अमूक एका वर्षी. इयत्ता. राहणे. अशी बरीच माहिती दिली होती. तरीही मला नक्की आठवत नव्हते आणि मग खूप वेळ विचार केला ती कुठे रहात होती हे वाचून तिच्या व माझ्या घरापासून काय काय होते म्हणजे रस्ता. दुकानं नेहमीची माणसं. हळूहळू आठवत गेले. एकदम पोस्ट अॉफिस आणि तिथे काम करणारे तिचे वडिल. शिवाय तिने तिच्या लहानपणीचा फोटो पाठवला होता आणि डोक्यात प्रकाश पडला हो मोठ्या डोळ्याची कुरळे केस असावेत असा अंदाज केला आणि ओळख पटली…
तिने सगळी माहिती सांगितली. लांब राहते. या वयात आपल्याला ओळखीचे कुणी तरी असावे. कसे आहात असे विचारले की खूपच छान वाटते. समाधान आनंद बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे वाळवंटात ओयासिसच. त्यामुळे मोबाईलचे आभार मानले पाहिजेत. पण माझा थोडा रोष आहे याचा की मोबाईलवर इंग्रजी आणि आपल्याला हवी ती भाषा मेसेज करता येईल अशी सोय असायला हवी होती. म्हणजे किती छान झाल असत असो आपल्या विचाराला काय महत्व? आणि माझा वेळ छान गेला. मी मलाच विसरून गेले. दुखणे विसरून गेले. बराच काळ लोटला होता ते सगळे डोळ्यासमोर उभे राहिले. तंत्रज्ञान विकसित झाले म्हणून आपण किती जवळ येऊ शकतो. नाहीतर एक लाट तोडी पुन्हा नाही भेट असे होते पूर्वी. आणि आता या गोष्टीला खूपच वर्षे झाली आहेत तरीही सारे काही आठवले. नोकरीत असताना खूप विद्यार्थी विद्यार्थीनी शिकून गेले. त्यांच्यात बदल होतो म्हणून आपण ओळखत नसलो तरी ते ओळतात तर अशी जवळीक साधून त्यांना व मलाही खूप छान वाटतं आनंद होतो. अगदी असाच ग्रुप वर सुद्धा अनुभव येतो. अप्रत्यक्षपणे आपलं एक छोटेसे जग आहे म्हणून बघा काय झालं ते काल मी तूप कसे टिकवायचे असे विचारले असता लगेचच किती जणींनी छान सांगितले होते आणि त्यातून मस्त मज्जा आली. आणि आंनद झाला होता अगदी तसाच आंनद एक विद्यार्थीनी भेटली याचा आनंद झाला आहे…
–सौ कुमुद ढवळेकर
कुमुदताई,
असे मनोरंजक आत्मकथन तुमचे
लक्ष्मीबाई टिळकांच्या धर्तीचे