नवीन लेखन...

प्राचीन वजनं

वजनांचा वापर हा व्यापाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र वजनांचा वापर करायचा तर, त्यासाठी संदर्भ म्हणून वापरल्या जाणाऱ्या एखाद्या वजनाची आवश्यकता असते. अशा प्रमाणित वजनांचा वापर केव्हापासून सुरू झाला असावा व ही वजनं प्रमाणित कशी केली गेली असावी, हा एक कुतूहलाचा विषय आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न जर्मनीच्या ग्योटिंगेन विद्यापीठातील निकोला इअ‌‍लोंगो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अलीकडेच केला आहे.

उपलब्ध पुराव्यांनुसार प्रमाणित वजनांच्या वापराला इ.स.पूर्व सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी म्हणजे कांस्ययुगाच्या काळात, इजिप्त आणि मेसोपोटेमिआमध्ये (आताचा इराक) सुरुवात झाली असावी. या प्रमाणित वजनांचा आशियातला आणि युरोपातला प्रसार त्यानंतरच्या दोन हजार वर्षांत झाला असावा. त्या काळातली वजनं ही साधारणपणे दगडापासून किंवा काशापासून तयार केली जायची. आशिया आणि युरोपातील विविध ठिकाणच्या उत्खननात सापडलेली ही वजनं आजच्या वजनांनुसार विविध गटांत विभागता येतात – एक ग्रॅमहून कमी वजनांचा, सुमारे दहा ग्रॅमच्या वजनांचा, सुमारे साठ ग्रॅम वजनांचा, सुमारे पाचशे ग्रॅम वजनांचा आणि वीस ते तीस किलोग्रॅम वजनांचा गट. यातील दहा ग्रॅम वजनांचा गट हा मसोपोटेमिआत शेकेल या नावे ओळखला जात होता. शेकेल हे त्या काळचं तिथलं एकक असल्यानं, निकोला इॲलोंगो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या या संशोधनाची सुरुवात शेकेलपासून केली.

निकोला इॲलोंगो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनात सुमारे तेविसशे शेकेलची तुलना केली. ही शेकेल दोन हजार वर्षांच्या कालखंडातली होती आणि ती सुमारे पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेल्या, वेगवेगळ्या १२७ उत्खननस्थळांवर सापडली होती. या सर्व शेकेलच्या वजनांचं या संशोधकांनी संख्याशास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण केलं. यातल्या बहुतेक सर्व शेकेलचं वजन हे त्यांच्या सरासरी वजनापासून फारतर पाच टक्के कमी-जास्त असल्याचं त्यांना आढळलं. इतक्या दूरवर पसरलेल्या प्रदेशांतील शेकेलच्या वजनांत इतकं साम्य आढळावं, ही अतिशय महत्त्वाची बाब होती. कारण ही वजनं प्रमाणित केली जात असल्याची शक्यता यावरून दिसून येत होती. या सर्व प्रदेशात एकच शासन अस्तित्वात असतं तर, शासनाच्या निर्देशानुसार एखादं मुख्य वजन संदर्भ मानून त्यावरून इतर वजनांची निर्मिती करता आली असती. परंतु इथं इतक्या मोठ्या प्रदेशात एकच शासन तर अस्तित्वात नव्हतं!

या शेकेलचा वापर वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या काळात सुरू झाला होता. आतापर्यंत सापडलेली सर्वांत जुनी शेकेल इजिप्त आणि मेसोपोटेमिआत इ.स.पूर्व ३१०० ते इ.स.पूर्व ३०००च्या दरम्यान तयार झाली होती. ग्रीसमध्ये या वजनांचा वापर इ.स.पूर्व २३०० ते इ.स.पूर्व २१००च्या दरम्यान सुरू झाला. मध्य युरोपातल्या शेकेलच्या वापराला इ.स.पूर्व १३५०चा काळ उजाडावा लागला. अटलांटिक महासागराला लागून असलेल्या युरोपीय देशांत शेकेलचा प्रसार इ.स.पूर्व १०००च्या आसपास झाला. टप्प्याटप्प्यानं झालेला हा प्रसार व्पापाऱ्यांद्वारेच तर झालेला नाही? एका वजनावरून दुसऱ्या वजनाची निर्मिती, त्यावरून तिसऱ्या वजनाची निर्मिती, अशाप्रकारे इजिप्त-मेसोपोटेमिआतून ही वजनं युरोपातल्या उत्तरेकडच्या देशांत तर पोचली नसावीत? एका वजनावरून दुसरं वजन निर्माण करताना, प्रत्येक वजनाच्या एका आवृत्तीतील त्रुटी त्याच्या पुढील आवृत्तीत संक्रमित होत असते. ही त्रुटी वेगवेगळ्या कारणांनी निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, वजनाच्या निर्मितीच्या पद्धतीतील अचूकतेची मर्यादा, मापन करण्यासाठी वापरलेल्या साधनाच्या अचूकतेची मर्यादा, मानवी इंद्रियांची मापन करण्याची मर्यादा, कालानुरूप झालली झीज, इत्यादी. यातल्या एखाद्या त्रुटीमुळे वजन वाढूही शकतं किंवा कमीही होऊ शकतं. त्यामुळे वजनांच्या अशा निर्मितीत जास्तीत जास्त किती त्रुटी निर्माण होऊ शकते, याची माहिती असणं गरजेचं होतं. निकोला इॲलोंगो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपलं पुढचं संशोधन याचं दिशेनं केलं.

या प्रयोगात वापरला जाणारा तराजू आणि वजनं ही, त्या काळच्या तराजू आणि वजनांसारखी असणं गरजेचं होतं. त्या काळी प्राण्यांच्या हाडांपासून वा शिंगांपासून तयार केलेले तराजू वापरले जायचे. यासाठी प्राण्यांच्या हाडांपासून किंवा शिंगांपासून पट्ट्या बनवल्या जायच्या आणि त्यांच्या दोन्ही टोकाला अळशी किंवा इतर वनस्पतींपासून तयार केलेल्या दोऱ्या बांधल्या जायच्या. या दोऱ्यांच्या दुसऱ्या टोकाला पारडी म्हणून चामड्याचे तुकडे किंवा पिशव्या बांधल्या जायच्या. निकोला इॲलोंगो अशाच प्रकारचा तराजू तयार केला आणि आपल्या प्रयोगासाठी वापरला. या तराजूनं मोजलेल्या वजनांतील चूक ही जास्तीतजास्त साडेतीन टक्के इतकी होती. तराजूच्या निर्मितीनंतर या संशोधकांनी सारख्याच वजनाची शंभर दगडी वजनं तयार केली. ही तयार करण्यासाठी त्यांनी विशिष्ट पद्धत वापरली. प्रथम त्यांनी दगड घासून सुमारे दीडशे ग्रॅमचं एक वजन तयार केलं. त्यानंतर पुनः दुसरा दगड घासून याच तराजूच्या साहाय्यानं अगदी पहिल्या वजनाइतक्या वजनाचं दुसरं दगडी वजन तयार केलं. या दोन वजनांतून, कोणताही निकष न लावता (यादृच्छिक पद्धतीनं) एक वजन घेतलं आणि त्याच्या वजनाइतकं तिसरं वजन तयार केलं. त्यानंतर या तीन वजनांतून अशाच प्रकारे एक वजन घेऊन चवथं वजन तयार केलं. अशा रीतीने ही शंभर वजनं निर्माण केल्यानंतर, आजच्या वजन करण्याच्या यंत्रानं या सर्व वजनांची प्रत्यक्ष वजनं घेतली. यातील बहुतेक वजनांतला फरक हासुद्धा, मूळ शेकेलप्रमाणेच, सरासरी वजनापेक्षा फारतर पाच टक्के असल्याचं दिसून आलं!

शेकेलचा प्रसार व्यापारादरम्यानच एका शेकेलकडून दुसऱ्या शेकेलच्या निर्मितीद्वारे झाला असल्याचं या संशोधनावरून दिसून येतं. जर वजनांच्या प्रमाणीकरणात एखाद्या केंद्रीय संस्थेचा सहभाग असता, तर संदर्भासाठी एखादं विशिष्ट वजन वापरून ही वजनं तयार केली गेली असती. अशा वजनांतील फरक हा सरासरीपेक्षा पाच टक्क्यांहूनही खूपच कमी असायला हवा होता. कोणत्याही केंद्रीय संस्थेच्या सहभागाशिवाय निर्माण झालेल्या या प्रमाणित वजनांचा प्रसार धिम्या गतीनं होणं, हे स्वाभाविकच होतं. त्यामुळेच इजिप्त आणि मेसोपोटेमिआत प्रथम निर्मिलेली ही वजनं युरोपातल्या दुसऱ्या टोकाला पोचण्यास सुमारे दोन हजार वर्षांचा दीर्घ कालावधी लागला!

टीपः याच संशोधनात सिंधू संस्कृतीतील इ.स.पूर्व २८०० ते इ.स.पूर्व २६०० या काळातल्या, हराप्पा, चान्हूदारो आणि मोहेंजोदारो इथल्या वजनांचाही अभ्यास केला गेला आहे. इथली वजनं ही दहा ग्रॅमच्या आसपास एकवटली नसून, ती साडेतेरा ग्रॅमच्या आसपास एकवटली असल्याचं दिसून आलं. त्यामुळे इथलं प्रमाणीकरण हे स्वतंत्रपणे झालं असल्याचं दिसून येतं.

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: L. Rahmstorf / N. Ialongo & N. Ialongo

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..