रंगभूमी असो किंवा समांतर सिनेमा, टीव्ही, बॉलिवूड, हॉलिवूडचा पडदा; भूमिका दहा मिनिटांची असो किंवा नायकाची; ती अजरामर करण्याची ताकद ओम पुरी यांच्याकडे होती. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९५० रोजी हरियाना मधील अंबाला येथे झाला. चेहरा देखणा नव्हता, पण दमदार अभिनय आणि भारदस्त आवाज, या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केला होता. विशेष म्हणजे, या झंझावाती प्रवासाची सुरुवात १९७६ मध्ये एका मराठी सिनेमापासून – ‘घाशीराम कोतवाल’पासून झाली होती. या सिनेमात घाशीरामची मध्यवर्ती भूमिका साकारल्यानंतर, अगदी गेल्या वर्षीपर्यंत त्यांची घोडदौड सुरू होती.
पंजाबमधील पटियाला येथून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले होते. नंतर १९७६ मध्ये त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूटमधून पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एका स्टुडिओमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी ‘मजमा’ या खासगी नाट्यमंडळाची स्थापना केली. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या आक्रोश चित्रपटातून पुरी यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला.
‘घाशीराम कोतवाल’ या मराठी चित्रपटातील घाशीराम, ‘आक्रोश’मधील लहान्या भिकू, ‘अर्धसत्य’मधील अनंत वेलणकर, ‘घायल’मधील एसीपी जॉय डिसोझा, ‘नरसिंह’मधील सूरज नारायण सिंह बापजी, ‘माचिस’मधील सनातन, ‘चाची ४२०’मधील बनवारीलाल, ‘हेराफेरी’मधील खडकसिंग, ‘रंग दे बसंती’मधील अमानुल्ला खान, ‘दबंग’मधील पोलीस इन्स्पेक्टर या सगळ्या बहुरंगी-बहुढंगी, नायकी-खलनायकी-विनोदी भूमिका अत्यंत ताकदीनं साकारणारे ओम पुरी यांनी ‘आरोहण’ आणि ‘अर्धसत्य’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल १९९० मध्ये त्यांना पद्मश्रीनंही सन्मानित करण्यात आलं होते. फिल्मफेअरच्या जीवनगौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. ब्रिटिश सिनेसृष्टीतील कसदार कामगिरीबद्दल त्यांना मानद ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ ही पदवीही प्रदान करण्यात आली होती. ब्रिटिश विनोदी चित्रपट ‘ईस्ट इज ईस्ट’मधील भूमिकेसाठी त्यांना बाफ्टा पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. रिचर्ड अॅटनबरो यांच्या गांधीमध्ये ओम पुरी हे पाहुणे कलाकार होते. सन ऑफ फॅनेटिक, सिटी ऑफ जॉय, वुल्फ या सिनेमांमधील त्यांच्या भूमिकांचंही प्रचंड कौतुक झालं होते.
ओम पुरी यांच्या विनोदी अभिनेत्याचं दर्शन घडलं होतं ते, काक्काजी कहीं आणि मिस्टर योगी या टीव्ही मालिकांमधून. त्यानंतर गोविंद निहलानी यांच्या ‘तमस’मधील भूमिकेनं त्यांना दिग्गजांच्या पंक्तीत नेऊन बसवलं. दूरदर्शनवरील ‘भारत एक खोज’ या कार्यक्रमातील त्यांचा आवाज आजही अनेकांच्या कानात तसाच कायम आहे. ‘द जंगल बुक’ या चित्रपटातील ‘बघीरा’ला ओम पुरी यांनीच आवाज दिला होता. ओम पुरी यांचे निधन ६ जानेवारी २०१७ झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-इंटरनेट
Leave a Reply