ओंकारा गणनाथा गजवदन बुद्धिदाता
कपिल अमेया विकट मोरया, तूं जीवनदाता ।।
युगेंयुगें तव सगुणरूप-अवतार एकदंता
युगेंयुगें खल अगणित नाशुन रक्षियलें जगता
युगेंयुगें जनमन, गणराया, स्तवतें तव गाथा ।।
अविरत असते नयनांसन्मुख वक्रतुंडमूर्ती
अविरत जपती हृदय आणि मुख प्रमथनाथकीर्ती
अविरत झुकुनी गजमुखचरणीं नत माझा माथा ।।
जीवन जावें तुझिया पुढती कुसुमें वाहत रे
जीवन जावें तुझिया पुढती नाचत राहत रे
जीवन जावें प्रथमपते तव गुण गातां गातां ।।
जन्मोजन्मीं वसो मनीं विघ्नेश दु:खहर्ता
जन्मोजन्मीं असो पाठिशी दंती सुखकर्ता
जन्मोजन्मीं ठेव गणेशा शिरीं वरदहस्ता ।।
– – –
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply