“केवळ काॅन्व्हेंटमध्ये शिकतात म्हणून मुलं ‘आपली’ भाषा विसरत नाहीत, तर त्या भाषेचे जिवंत प्रेम त्यांना घरी कुठेच दिसत नाही व म्हणून ती भाषा मुलं त्याज्य ठरवतात. ‘आम्ही आपल्या भाषेचे प्रेमी आहोत’ असं उठ-सूट बोलण्यापेक्षा, त्या भाषेचे प्रेम मुलांना आपल्या आई-वडीलांच्या जगण्या-वागण्यातून आपसूक जाणवायला लागते आणि ते तसे जाणवले तरच ते पुढे मुलांकडून जोपासले जाते; मग ती कोणत्या का माध्यमातून शाळा शिकेनात.!!”
-पु. ल. देशपांडे
पुलंचा हा उतारा केवळ मराठीच नव्हे प्रत्येक भारतीय भाषेला लागू आहे म्हणून वर केवळ ‘आपली’ भाषा असा उल्लेख केला आहे..! मराठी, गुजराती, मारवाडी अशा सर्वच देशी भाषांबद्दलची त्या त्या भाषीक समाजातील अनास्था वाढत चालली असल्याचे समाजात वावरताना लक्षात येते. इंग्रजी शिकणे म्हणजे स्वत:ची भाषा कमी लेखणे किंवा विसरणे नव्हे हे कोणी लक्षात घ्यायला मागत नाहीय..! त्यात या अनास्थेत ‘सर्वात पुढे महाराष्ट्र माझा’ अशी परिस्थिती आहेच..।!
आजच्या ‘राजभाषा दिना’च्या निमित्ताने मला सांगावसं वाटतं की आपल्या ‘मराठी भाषे’वर प्रेम करा, तिचा रोजच्या व्यहारात अट्टाहासाने वापर करा आणि पुढे असंही सांगेन, की कुणाशी भांडायची पाळी अलीत तर निदान भांडताना तरी मराठीचा वापर करा. एक दणदणीत वाक्य मराठीत फेकून मारा, बघा, समोरचा पन्नास टक्र्याने तरी खाली येतो की नाही..!
भांडणावरून विषय आला म्हणून सांगतो, घरी मुलाला किंवा मुलीला शाळेत घालायची वेळ येते, तेंव्हा त्याला किंवा तिला कोणत्या शाळेत घालावं यावरून छोटेसे वाद होतात. फार कमी घर याला अपवाद असतील. वाद कोणत्या शाळेत म्हनजे कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालावं यावरून होतात. इथे आश्चर्याची होष्ट अशी की मातृभाषेच्या शाळेत घालण्यास बहुतेक घरात ‘मातृ’पक्षाचाच विरोध असतो. यालाही अपवाद असतील पण ते ही कमीच.
लोकलच्या प्रथमवर्गीत सो काॅल्ड हाय सोसायटीतील दोन मराठी माणसं भांडताना (म्हणजे वेगळ्याप्रकारे चर्चा करताना) हटकून इंग्रजीत वाद घालताना दिसतात. दुस-या वर्गात इंग्रजीची जागा हिन्दी घेते. खरंतर मराठी ही लढवय्यांची भाषा असताना व प्रेमापेक्षा लढण्यालाच उद्युक्त करणारे अनेक शब्दप्रयोग मराठीत असताना निदान भांडताना तरी इतर भाषांचा आधार का घ्यावा लागतो हेच मला कळत नाही. (याचा अर्थ मराठी भांडखोरांची भाषा आहे असं नाही. खरं तर मराठीजनांएवढी सहनशील जमात देशात कुठे सापडू नये. प्रेमाने मागाल तर कांसेची लंगोटी देतील परंतू गृहीत धरून चालाल तर मात्र तुमची खैर नाही. अन्याया विरूद्ध , मग तो कोणावरचाही असो, लढण्यासाठी धावतो तो लढवैया मराठीच..!) खरंतर मराठी शिवी ही जगातील पहिल्या दोन क्रमांकात येते जाते ( पहीला क्रमांक पंजाबी). मराठीतली शिवी एके ५७ च्या गोळीसारखी सण्णकन लागून समोरच्या माणसाला घायाळ करून जाते.
नाहीतरी मराठी माणसाला भांडल्याशिवाय कुठे काय मिळालंय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिन्दवी स्वराज्यापासून ते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रापर्यंत मराठी जनांनी सर्व भांडूनच मिळवलंय. आणि भांडल्याशिवाय जे मिळतं त्यात आपल्याला गोडी वाटतंच नाही हे ही तेवढंच खरं. फक्त दुर्दैव येवढच की आता मराठी भाषेसाठी स्वत:ला मराठी म्हणवणाऱ्या लोकांशीच भांडायची वेळ आली आहे. तेवढं मात्र होऊ देऊ नका ही कळकळीची विनंती..
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply