” अहो पूर्वा ला आता मोबाइल लागणार आहे , लवकरच काय ती सोय करा ,सध्या ती माझा वापरते आहे .”
” तिला आणि मोबाइल ? , अगं दहावी तरी होउ दे ” मी
” अहो दहावी होण्याची कसली वाट पाहत आहात , आता तिची मोबाइल वरच शाळा सुरू झाली आहे , तुम्हाला
कल्पना तरी आहे का ? ”
” मोबाइल वर आणि शाळा ? ” मी आश्चर्याने विचारलं .
” हो online lectures घेतात तिच्या बाई ! ”
” सर्व विषयांची ? ”
” हो मग , तुम्हाला काय वाटलं ,एकाच विषयाची ? जरा तरी इकडे तिकडे बघत चाला हो ” सौ .चा टोमणा
एका रविवारी सकाळी हे संभाषण होतं काय आणि लगेच संध्याकाळी पूर्वा च्या नावावर एक मोबाइल घरात येतो काय ?
सगळंच अनपेक्षित
” work from home ” हे मी अनेक ठिकाणी वाचलं होतं , पण शाळा सुध्धा ? याची मला खरंच कल्पना नव्हती , कधी मनातही माझ्या आलं नसत . अख्ख्या वर्गा समोर बाईंची बोलणी आणि मार खाऊन आम्ही लहानाचे मोठे झालो .
नुसते मोठे नव्हे तर शिक्षकांनी सुशिक्षित ही बनवलं ! ते शाळेचे दिवस आठवले की मन अस्वस्थ होतं . आज ती दहावीत आहे पण पूर्वा शाळेत जायला लागल्यापासून पहातोय शिक्षणाची वर्षा वर्षा ला चाललेली अधोगती ! आजही माझ्या शिक्षकांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर येतात , माझ्या समोर आलेच तर झटकन सहजगत्या वाकून त्यांना नमस्कार केला जाईल इतकी कृतज्ञ पणाची भावना त्यांच्या बद्दल माझ्या मनात आजही आहे . विद्यार्थ्यांचे सोडा ,पण आजचे शिक्षक ? हो खरं आता ते शिक्षक राहिले नाहीत पगारी सेवक आहेत , पगार घेतला की .. विषय संपला !त्यामुळे ऑनलाइन काय आणि ऑफलाइन काय त्यांना काहीच फरक पडत नाही !उलट ऑनलाइन खूपच सुखकर . इकडून तिकडून video जमा करायचे आणि द्यायचे मुलांना पाठवून , किती सोप्पं . . त्या रविवार नंतर मी जातीने पाहू लागलो पूर्वा ची ऑनलाइन शाळा . नुसता फार्स चालू आहे . आणि आज तर काय परीक्षे शिवायच दहावीचा रिझल्ट लागला . आणि जाणीव झाली की शाळेत जाऊन निदान पढत मूर्ख तरी जन्माला येत होते आता ते सुध्दा होणार नाही !
आज जगावर विषाणूनचे संकट आलं आहे , पण ते जेव्हा जाईल तेव्हातरी पूर्ववत शाळा चालू होउ देत हीच आता येणाऱ्या गणपतीच्या चरणी प्रार्थना !
– गणेश वेलणकर
Leave a Reply