या महाकाय देशाच्या दक्षिणेकडील भागात केरळ राज्य आहे.समुद्र किनारा आणि आणि डोंगराळ भाग यातून निर्माण झालेल्या आणि मल्याळी भाषा असलेल्या या टुमदार राज्यात आपण फिरलो तर आपण खरोखर भारतात आहोत कि परदेशात असे वाटत राहते. कोची, पूर्वीचे कोचीन या ठिकाणी हवाई तळावर विमान उतरतानाच आपण कुठे तरी अत्यंत सुंदर बगीच्यात उतरलो आहोत असे वाटते.
अमेरिकेतील डेनवर शहराचा विमानतळ विमान उतरताना जसा नयनरम्य दिसतो तसाच कोची चा विमानतळ आहे.हवाई तळावर कमालीची स्वच्छता ,गर्दी किंवा कोलाहल नाही ,इंग्रजी आणि मल्याळी भाषेतील सूचना ऐकत बाहेर आलो तर अत्यंत सफाईने इंग्रजी बोलणा-या वाहन चालकांनी स्वागत करून कोची शहरात नेले.दोन दिवस कोची शहरात राहिलो कामे आटोपली आणि शहर पाहीले.अनेक गुजराथी , मराठी , सिंधी व्यापारी अनेक दशके व्यापाराच्या निमित्ताने येथे स्थायिक झाली आहेत.परंतु जवळ जवळ सर्वच व्यापारी मल्याळी भाषेतून व्यवहार करतात .परराज्यातून किंवा परदेशातून आलेल्या ग्राहकाशी इंग्रजीतून व्यवहार करतात.आपण हिंदी भाषेतून बोलण्याचा प्रयत्न केल्यास इंग्रजी भाषेतून उत्तर देतात.
या मल्याळी लोकांची दुसरी प्रादेशिक भाषा तामिळी आहे.परंतु अनेक वेळा तमिळ आणि मल्याळी लोकांचे एकमेकांशी पटत नाही.उत्तरे कडील राज्यातून गेलेल्या लोकांना या दोन भाषेतला फरक कळत नाही .तामिळनाडू आणि केरळच्या सीमेवरील भागात या दोन्ही भाषा शिकवल्या जातात.
हिंदी भाषेवरील राग या भागात प्रकर्षाने जाणवतो .केरळ मधील जमिनी सहजा सहजी भारतीय अन्य भाषिक घेवू शकत नाही.किंबहुना मल्याळी माणसाला त्याच्या जमिनीची किंमत समजावून सांगण्याची मोठी कामगिरी केरळ मधील राजकीय पक्षांनी केली आहे.पिनाराई विजयन केरळ राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २०१६ सालच्या केरळ विधानसभा निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. आघाडीच्या विधीमंडळाचे नेते असलेल्या विजयन ह्यांनी २० मे २०१६ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.एखादा अपवाद वगळता काँग्रेस किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्याच लोकांना सत्ता मिळाली आहे.
प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस ,भाजपा आणि सत्ता धारी पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट हि सर्वच मंडळी मल्याळी आहेत त्यामुळे भाषेचे संवर्धन वगैरे गोष्टींची केरळ मध्ये गरजच नाही.
केरळ मध्ये हिंदूंचे प्रमाण अत्यल्प आहे.थिरुअनंतपूरम ( त्रिवेन्द्रम ) शहरातील काही भागाचा अपवाद वगळता सर्वत्र ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्माचा पगडा दिसतो .केरळ राज्यामध्ये सुमारे ५४ टक्के हिंदू आहेत. २७ टक्के मुस्लीम आणि १८ टक्के ख्रिश्चन आहेत.त्यामुळे गोमांस खाणा-या लोकांची संख्या प्रचंड आहे.कोची जवळ आध्य गुरु शंकराचार्यांचा मठ आहे परंतु मठापासून काही अंतरावर भर रस्त्यात खुले आम एका गाईची हत्या एक खाटिक करीत असलेला पाहून मन खिन्न झाले.
कुठेही जाहीरपणे न बोलता , न लिहिता आणि धर्म ,जात कुठलीही असो , ” फक्त मल्याळी “हाच केरळचा अलिखित नियम आहे.त्यामुळे परप्रांतीयांचा लोंढा वगैरे प्रश्नच उद्भवत नाहीत.केरळ मध्ये धार्मिक प्रवचने आणि प्रार्थना मल्याळी भाषेत होतात.मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांच्या व्यवहाराची आणि घरातली भाषा मल्याळी आहे.
कमालीची स्वच्छता हा केरळी लोकांचा स्थायीभाव आहे.केरळमध्ये भिकारी दिसले नाहीत .दक्षिणेकडील सर्वच मंदिरात शिस्त आणि स्वच्छता असते.पण चर्च आणि मशिदीतील स्वच्छता मंदिरांपेक्षा अधिक आहे.केरळ मधील माती लाल ,तांबड्या रंगाची आहे पण तिथे मातीत वाळूचे प्रमाण अधिक आहेत त्यामुळे धूळ नाही .पाणी नितळ आणि स्वच्छ असते त्यामुळे पांढरे कपडे पांढरे शुभ्र दिसतात.केरळ मधील लोक निळ्या ,हिरव्या रंगाच्या लुंग्या नेसतात.उच्च्यभ्रू ,श्रीमंत आणि सुशिक्षित लोक पांढरी शुभ्र लुंगी आणि त्यावर बुश शर्ट घालतात.
पिकलेल्या केसांचे केरळी क्वचित दिसतात.स्त्रिया केसांना खोबरेल तेल लावतात आणि दररोज नहाण करतात.
केरळ मधील घनदाट जंगले हा कौतुकाचा विषय आहे.केरळच्या फोरेस्ट खात्याला त्याचे श्रेय द्यावे लागेल.एकही टेकडी उघडी बोडकी नाही.रबर, निलगिरी,नारळ ,पोफळी ,लवंग दालचिनी,वेलदोडे,कॉफी,कोको,इत्यादी लागवड अगदी जाणीव पूर्वक केली आहे.जंगलातील रस्ते कचरा मुक्त आहेत.प्लास्टिक बंदी फक्त कागदावर नाही.संपूर्ण केरळ मध्ये मला प्लास्टिकच्या पिशव्या दिसल्या नाहीत.फळे ,केळी सुद्धा वर्तमान पत्रात बांधून देतात.प्रचंड प्रमाणात केळीची लागवड आहे.केळीच्या असंख्य जाती विकसित केल्या आहेत.
निसर्गाचा ,पाण्याचा ,हवामानाचा अत्यंत कल्पकतेने वापर करून साधन सामुग्रीचा ज्यास्तीत ज्यास्त उपयोग केरळचे नैसर्गिक सौदर्य अधिक खुलवण्यात तेथील सरकार यशस्वी झाले आहे.
केरळ मधील डोंगर माथ्यावर उभेराहून हे निसर्ग सौंदर्य निरखताना काश्मीर फिके पडेल अशी किमया केरळ मधील लोकांनी केली आहे.तिथले टुरिझम खाते आणि फोरेस्ट खाते यांचे एकत्रित योगदान या मागे आहे. मुन्नार येथील चहाचे मळे पाहून थक्क व्हायला होते.चहाची हिरवीगार रोपे पाहून मन हरकून जाते. प्रत्तेक बगीचा ,उद्यान ,प्राणीसंग्रहालये , शेती , लागवडीचे केलेले प्रयोग पर्यटकांना दाखवताना त्याचे शुल्क वसूल केले जाते.
केरळ मधील बंगले हा तर स्वतंत्र लेखाचाच विषय आहे.भव्य प्रसादा सारखे बंगले हि आता केरळची दुसरी ओळख झाली आहे.हे बंगले अलीकडच्या काळात म्हणजे २० वर्षात बांधले गेले आहेत.या बंगल्याचे मालक रबर उद्योगातील ,मसाल्याची लागवड करणारे किंवा आखाती प्रदेशात नोकरी करणारे असे मल्याळी आहेत.
आणि आपला महाराष्ट्र !
केरळ ला निसर्गाने जे दिले आहे ते महाराष्ट्राला सुद्धा भरभरून दिले आहे. परंतु मराठी जनतेची आणि राज्यकर्त्यांची मानसिकता बदलत नाही. प्रादेशिक अस्मिता लोप पावल्यामुळे महाराष्ट्राची धर्मशाळा झाली आहे. मराठी भाषा आणि मराठी माणसाला महाराष्ट्राच्या राजधानीत आणि पुणे नाशिक, नागपूर सारख्या शहरात दैन्यावस्था आलेली आहे. आपले फोरेस्ट खाते आणि पर्यटन खाते निष्क्रिय आहे. त्यात अनेक परप्रांतीय अधिकारी घुसलेले आहेत. लाच खावून परप्रातीयांना बेकायदेशीर पणे वास्तव्यास मदत करणारे सरकारी अधिकारी हेच महाराष्ट्राचे खरे शत्रू आहेत.आमचे सर्व पक्षीय राजकारणी यास जबाबदार आहेत. विकास नको पण महाराष्ट्राचा ऱ्हास थांबवा अशी वेळ आपल्यावर आली आहे.यास आपण सर्वच जबाबदार आहोत.आम्ही एकमेकांशी मराठीत बोलायला लाजतो.आपल्या रूढी ,परंपरा राखण्यासाठी आपल्याला मेळावे , शिबिरे,उत्सव भरवावे लागतात.मतांसाठी परप्रांतीयांच्या नाकदु-या काढाव्या लागतात.आपली श्रद्धा स्थाने , पराक्रम,आणि परंपरा परप्रांतीयांच्या ताब्यात गेलेली आहेत.आज या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी आहे पण भावीकाळात तो मराठी असेलच असे नाही .ही फार मोठी शोकांतिका आहे.
बोला ……जय महाराष्ट्र !
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply