भारतीय सैन्याने तिसरा सर्जिकल स्ट्राइक म्यानमारमध्ये केला ही बातमी १५ मार्चला मीडिया मध्ये दाखल झाली. परंतु देशांमध्ये चाललेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत मध्ये मीडियाने या महत्त्वाच्या ऑपरेशनला काहीच महत्त्व दिले नाही. हे ऑपरेशन का महत्वाचे होते? यानंतर ईशान्य भारताला सुरक्षित करण्याकरता आपल्याला अजून काय करावे लागेल या सगळ्यावर चर्चा गरजेची आहे.
खरं म्हटलं तर हा सर्जिकल स्ट्राइक नव्हता. याचे नाव होते ऑपरेशन सनराइज. हे ऑपरेशन भारत आणि म्यानमार त्यांच्या सैन्याने एकत्र १७ फेब्रुवारीपासून दोन मार्च या कालावधी मध्ये केले होते. उद्देश होता की भारत-म्यानमार सिमेवर आणि म्यानमारच्या आत जे दहशतवादी गट कार्यरत करत आहेत त्यांना बरबाद करणे.
भारतीय लष्कराने ९ जून २०१५ रोजी म्यानमार सीमा ओलांडून बंडखोरांच्या दोन छावण्या उद्ध्वस्त केल्या होत्या. यात १०० हून अधिक बंडखोर मारले गेले होते. ४ जून २०१५ रोजी बंडखोरांच्या एका हल्ल्यात मणिपूरमधील चंदेल भागात १८ भारतीय जवान शहीद झाले होते. याचा बदला म्हणून लष्कराने म्यानमारमध्ये घुसून ही थेट कारवाई केली होती.
भारत आणि म्यानमार यांच्या यांच्यामध्ये सुरू असलेले कलादान मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट भारतातले कलकत्ता बंदर आणि म्यानमार मधिल सितवे बंदर जोडते. या रस्त्याला असलेला दहशतवादी गटांचा धोका पासून कमी करणे हा ऑपरेशनचा एक उद्देश होता.हा रस्ता आणि सितवे बंदरामुळे मिझोराम आणि कलकत्ता यामधील अंतर १००० किलोमीटरने कमी होईल,ज्या मुळे मिझोरामची आर्थिक प्रगती वेगाने होइल. गुप्तहेर खात्याच्या माहिती प्रमाणे अनेक दहशतवादी गट आणि त्याना मदत करणारी आराकान आर्मी, काचीन इंडिपेंडंट आर्मी या रस्त्यावर दहशतवादी हल्ले करणार आहे. त्यांना भारतामध्ये असलेले काही दहशतवादी मदत करणार होते. या सगळ्यांना ह्ल्ले करण्यास चीनच्या गुप्तहेर संस्था भाग पाड्त आहे.
त्यांना बरबाद करण्याकरता भारताच्या बाजूने भारतीय पायदळाच्या आणि आसाम रायफलच्या काही बटालियननी (१०,०००-१२,००० सैनिक) भाग घेतला. त्यांना मदत ईशान्य भारतामध्ये असलेल्या दोन स्पेशल फॉर्सेस बटालियननी मदत केली. भारताच्या बाजूने त्यांना ड्रोन, हेलिकॉप्टर्स कडून मदत मिळाली.
एनएससीएन खापलांग यांचे हेडक्वार्टर बरबाद
याच वेळी म्यानमार मधील सैन्य सुद्धा त्यांच्या बाजूने या दहशतवादी कॅम्प वरती हल्ला करत होते.म्ह्णुनच यामध्ये भारतिय सैन्याला खूप मोठे यश मिळाले.यामध्ये एनएससीएन खापलांग यांचे मुख्यालय बरबाद करण्यात आले. म्यानमार सैन्याने भारतीय बंडखोर एनएससीएन खापलांग यांच्या वरती पूर्णपणे नियंत्रण केले आहे.एवढेच नव्हे तर अरुणाचल प्रदेश पासून एक हजार किलोमीटर दूर असलेल्या त्यांच्या ट्रेनिंग कॅम्प भरती सुद्धा हल्ले करण्यात आले.केलेल्या हल्ल्यांना एनएससीएन बंडखोरांनी कुठलाही जबाब दिला नाही व त्यांच्या अनेक नेत्यांना पकडण्यात म्यानमार सैन्याला यश मिळाले आहे.आपल्याला माहीत असेल की नागालँड मधले अनेक बंडखोर गट सध्या भारत सरकारच्या बरोबर वाटाघाटी करण्यामध्ये गुंतले आहेत आणि ते हिंसाचार करत नाही. मात्र एनएससीएन खापलांग गट हा अजून वाटाघाटी करता तयार नाही. यामुळे यांच्या पकडल्या जाण्याने वाटाघाटी करण्यावर जास्त वेगाने पुढे जाउ शकतिल.
दहशतवादी गटांना एकत्र आणण्या करता चीनी संघट्ना नॉर्दन अलायन्स
आराकान आर्मी हा राखीन बंडखोर यांचा दहशतवादी गट आहे व त्यांची संख्या सात हजार एवढी असावी. सध्या त्यांचे प्रमुख आहेत मेजर जनरल लई जा. त्यांना काचीन इंडिपेंडंट आर्मी मदत करीत होती. आठवत असेल की चीनने म्यानमार आणि भारतामध्ये असलेल्या बंडखोर आणि दहशतवादी गटांना एकत्र आणण्या करता नॉर्दन अलायन्स नावाची संघट्ना तयार केली आहे. त्यांना चीनकडून मदत मिळत आहे. चीनने त्यांच्या सीमेजवळ 3000 बंडखोरांना तयार ठेवले आहे.ऑपरेशन सनराईस मध्ये म्यानमारच्या सैन्याने उल्फा यांच्या ट्रेनिंग कॅम्प जो पडती येथे आहे त्यावर सुद्धा हल्ला केला यामध्ये उल्फाचे अनेक महत्त्वाचे नेते मारले गेले.
ईशान्य भारताची छोटी छोटी सात राज्ये असलेल्या या अत्यंत दुर्गम प्रदेशाला लागून बांग्लादेश, म्यानमार, चीन, तिबेट, भूतान आणि नेपाळ या देशांची सीमा आहे. मौल्यवान नैसर्गिक साठे येथे विपूल प्रमाणात आहेत. विपूल नैसर्गिक वरदान लाभलेला हा प्रदेश पूर्व आशियावर सामरिक नियंत्रण ठेवण्यासाठी मोक्याचा ठरतो. मग हा प्रदेश भारतात असावा, असे भारताच्या हितशत्रूंना वाटेल काय? म्हणूनच या भागातील जनजातींमध्ये संघर्ष घडवून किंवा त्यांना भारताविरोधात लढायला लावून भारताला कमजोर करणे किंवा शक्य झाल्यास हा प्रदेश गिळंकृत करण्याचे षड्यंत्र गेली ५० वर्षे रचले जात आहे.
अजुन काय करावे
ऑपरेशन सनराइज एक नक्किच यशस्वी मानायला हवे.आपण म्यानमारच्या सैन्या बरोबर अशा प्रकारची जॉइंट ऑपरेशन अजून जास्त वेळा का करत नाही? हीच वेळ आहे म्यानमार मध्ये असलेल्या भारताच्या विरुद्ध कारवाई करणार्या दहशतवादी गटांना बरबाद करायची. चीन अशा गटांना पुन्हा एकदा एकत्रित नेतृत्व खालती आणून त्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे. ईशान्य भारताच्या जाती आणि जमाती या नागा असो की मणिपुरी त्या उत्कृष्ट लढवय्या आहे यामुळे जर चीनने ईशान्य भारतामध्ये पुन्हा बंडखोरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या करता धोकेदायक ठरू शकतो, कारण भारतामधील सर्वात पहिली बंडखोरी ही नागालँड मध्ये ६०च्या दशकामध्ये सुरू झाली होती.
भारतीय सैन्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आता हा हिंसाचार अतिशय कमी झाला आहे परंतु याचा अर्थ तिथे सगळे शांत आहे असे नाही. आज ईशान्य भारतामध्ये अक्षर शहा आर्थिक क्रांती होत आहे. तिथे नवीन रस्ते, रेल्वे लाईन, विमानतळ अशा अनेक प्रगतीच्या कारवाया सुरू आहे. जेवढे रस्ते गेल्या ७० वर्षांमध्ये या भागांमध्ये बांधले नव्हते त्याच्या पाचपट जास्त रस्ते आता तिथे बांधण्यात येत आहे. हा भाग डोंगराळ असल्यामुळे येथे हालचाल करणे हे नेहमीच कठीण असते. रस्ते बांधल्या मुळे केवळ व्यापारच वाढेल असे नाही तर पर्यटन आणि इतर विकास कामे यांना सुद्धा वेग येऊ शकतो. परंतु यामध्ये विघ्न घालण्याचे काम चीन करत आहे.
म्यानमारच्या जंगलात मोठी मोहिम सुरु करा
सत्तर च्या दशकामध्ये अनेक दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प चीनच्या युनान प्रांतांमध्ये होते. नव्वदच्या दशकामध्ये हे ट्रेनिंग कॅम्प चीनने बांगलादेश आणि म्यानमार मध्ये ढकलले. बांगलादेश आपला मित्र झाल्यानंतर तेथिल ट्रेनिंग कॅम्प बंद करण्यात आले. हे ट्रेनिंग कॅम्प सध्या फक्त म्यानमारमध्ये आहेत. म्यानमार चा भारतीय सीमेजवळचा भाग हा डोंगराळ आणि जंगलांनी व्यापलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे ट्रेनिंग कॅम्प तिथे निर्माण करणे सोपे आहे. म्हणूनच जर ईशान्य भारताच्या मध्ये शांतता हवी असेल तर म्यानमार सैन्याच्या मदतीने आपल्याला तिथे असलेल्या ट्रेनिंग कॅम्प विरुद्ध नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करु शकतो.
ईशान्य भारतामध्ये सैन्याची अजिबात कमी नाही म्हणून केवळ दहा ते पंधरा बटालियन्स वापरून शांतता होणार नाही.आपण इथे असलेले प्रचंड सैन्य या कारवाई करता वापरू शकतो. यामुळे इथल्या वेगवेगळ्या बंडखोर गटांना बरबाद करण्यामध्ये आपल्याला यश मिळेल. लुक इस्ट किंवा अक्ट इस्ट या पॉलिसी प्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आपण य़ा देशांची आपले व्यापारी संबंध रस्ते आणि रेल्वे लाईन चा वापर करून वाढवणार आहे. याकरता ईशान्य भारताचे बंडखोर गट चीनच्या मदतीने आपल्याला त्रास देऊ शकतात. म्हणूनच गरज आहे की अशा सगळ्या गटांना बरबाद करून या भागांमध्ये शांतता निर्माण करायची. आशा करूया की निवडणुकी नंतर मोठे हल्ले म्यानमारच्या जंगलात केले जातील त्यामुळे तिथे असलेल्या वेगवेगळ्या बंडखोर गटांना मोडण्या मध्ये आपल्याला यश मिळेल व ईशान्य भारत आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. आशा करूया की निवडणुकी नंतर येणारे नवीन सरकार ईशान्य भारताला अजून जास्त सुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply