शेतीमध्ये पारंपरिक ज्ञान व शास्त्रज्ञांच्या शिफारशी यांच्या जोडीला स्वतःची कल्पकताही आवश्यक असते. विविध शेतकऱ्यांच्या उदाहरणांमधून अशा कल्पना सर्वांच्या पुढे येत असतात.
बाबुराव वानखेडे हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील आमला गावचे एक कल्पक शेतकरी. त्यांनी अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात इंटर कॉमर्सपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर स्वतः शेती करण्यास सुरुवात केली. काही वर्षे बाबुराव दर्यापूर पंचायत समितीचे सभापती होते. त्या वेळी सरकारी धोरणाप्रमाणे त्यांना रासायनिक खते व कीटकनाशके यांचा प्रसार करावा लागत असे आणि स्वतःच्या शेतीत त्याचा वापर ते करीत असत.
१९७७-७८ सालापासून ते सेंद्रीय शेती पद्धतीने शेती करतात. आहे. एका वर्षी ते शेतात तूर आणि मूग अशी एकत्रित पिके घेतात. दुसऱ्या वर्षी त्याच शेतात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या डीएचवाय- २८६ या कापसाच्या जातीची लागवड करतात. या जातीच्या पानांवर जास्त दाट लव असते. त्यामुळे नैसर्गिकपणे मावा, तुडतुडे व पांढरी माशी या किडींपासून पिकांचे संरक्षण होते. कीटकनाशके वापरायची गरज पडत नाही. झाडांची उंची ७० -७५ सेमी असल्याने कापसाची वेचणी सहज करता येते. बाबुराव कोणत्याही पिकाला रासायनिक खत देत नाहीत किंवा रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करीत नाहीत. तरीही त्यांच्या पिकांवर किडी आढळत नाहीत. या कापसाच्या शेतात आदल्या वर्षी तूर आणि मूग घेतल्याने या पिकांची पाने शेतात गळालेली असतात. त्या पानांचे खत कापसाच्या पिकाला मिळते. त्यामुळे वेगळे खत देण्याची गरज पडत नाही. बाबुरावांनी काही वर्षे सोयाबीनचे पीक घेतले. या पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो. शिवाय सोयाबीनच्या पिकाला बाजारभाव कमी मिळतो. त्यामुळे हे पीक घेण्याचे बंद केले.
बाबुराव वानखेडे विदर्भ सेंद्रीय कापूस उत्पादक शेतकरी संघाचे सदस्य असल्यामुळे त्यांच्या कापसाची निर्यात होते आणि भाव जास्त मिळतो.
लेखक : सुरेश खडसे
Leave a Reply