स्वयंपाककरण्यापूर्वी, करत असताना आणि करून झाल्यावर स्वयंपाकाचा ओटा, गॅसच्या शेगड्या स्वच्छ करण्यासाठी हाताजवळ एखादं ओटा पुसायचं फडकं ठेवावे. त्याने मधून मधून ओटा, शेगड्या पुसून घ्याव्या. त्यामुळे ओट्यावर सांडलेले पदार्थ लगेच साफ करता येतात. सांडलेले अन्न पदार्थ बराच वेळाने साफ करायचे म्हटले तर ते वाळल्यामुळे ओटा सतत धुवावा लागतो. पाण्यामुळे ओट्याचे आयुष्य कमी होते. मात्र स्वच्छतेसाठी आठवड्यातून एक दिवस ओटा धुणे आवश्यक आहे. आठवड्याचा एखादा वार त्यासाठी निश्चित करावा.
गॅसच्या शेगड्या सुद्धा साबणाच्या पाण्याने आणि नंतर साध्या पाण्याच्या फडक्याने पुसल्यास स्वच्छ तर होतात, पण सतत धुतल्याने बर्नर खराब होऊन त्या लवकर खराब होतात. गॅसच्या शेगडीवर दूध तापत ठेवल्यास दूध तापेपर्यंत ओट्याजवळची कामे पूर्ण करावी. म्हणजे दुधाकडे लक्ष राहाते.
ओटा आणि गॅस जास्त खराब व्हायचं कारण म्हणजे दूध उतू जाणं. तेवढं आवर्जून जपल्यास ओटा स्वच्छच राहातो.
तसेच भाजी किंवा वरण करताना भाजीचे, वरणाचे पातेले किंवा कढई हे भाजीच्या आकारमानापेक्षा थोडे मोठे घ्यावे म्हणजे पदार्थ हलवताना गॅसच्या शेगडीवर सांडत नाहीत.
पोळ्या करताना सुद्धा प्रथम ओट्यावर रद्दी पेपर पसरवून त्यावर परात ठेवून कणिक भिजवावी. कागदावरच पोळपाट लाटणं ठेवून पोळ्या लाटाव्या. पोळ्या झाल्यावर कागद उचलल्यावर ओटा स्वच्छ राहातो.
Leave a Reply