From the time line of श्रीनिवास चितळे
अनुपमा —“काका ,मी आधीच तुम्हाला सांगून ठेवते कि मला लग्नानंतर पुणे सोडून कुठेही जायचं नाही ,नो कर्जत ,नो कोकण ,नो मुंबई .”
“अग तू कुठे बघितल आहेस का ? कोणी आवडलाय का ? मला सांग हवतर मी जाऊन विचारतो .
“तस काहीही नाहीये काका ,पण मला पुणे सोडायचं नाही आणि आई पाठी लागली आहे कि देवगडच एक स्थळ आहे ,मुलगा इंजिनियर आहे आणि इथली बजाज मधली नोकरी सोडून तो गावाला शेती ,बाग बगिच्या पाहायला स्वतःहून गेला आहे म्हणे “.
“अहो,भावोजी बघा हो ,दारी १००० कलम ,सुपारीच्या ५ बागा ,शेती ,मुंबई पुण्याच्या सर्व सुख सोई आहेत आणि हि जायचं नाही म्हणते “.
“अहो वाहिनी सोडून द्या ना ,तिला नाहीना जायचं ,आणि त्याला छपन्न मुली मिळतील आणि हिला ५६ उत्तम स्थळ येतील ,अहो आपली एवढी हुशार मुलगी ,कम्प्युटर इंजिनियर त्या शिवाय लेखिका ,कवयत्री .”
“अहो त्या मुलाने आणि त्याच्या आईने हिला सरोज वन्सनच्या शेखरच्या लग्नात पहिली आणि त्यांना हि खूप आवडली आहे ,मी काय म्हणते एकदा आपण देवगडास जाऊन तर येऊ ,त्या मुलग्याशी हिला बोलू दे ,तिच्यावर जबरदस्ती नाही पण सहज एक कोकण ट्रीप म्हणून जायला काय हरकत आहे ? तिला नाही आवडला तर नाही .”
“अनुपमा हा वाहिनीचा मुद्दा मला पटला ,अग बघून घे कि .”
“ठीक आहे ,आलिया भोगासी असावे सादर “म्हणत बाई तयार झाल्या .
आम्ही कोकणात गेलो ,उत्तम स्वागत .तिच्या सासऱ्यांच्या “ये ग मनी माऊ ,अग तुला पाहिल्यावर अनिकेतनेच तुला हे नाव ठेवलय .आणि हे बघ मस्त दोन दिवस फिरा ,बागेत जा ,समुद्रावर जा ,खा प्या मजा करा आणि तरीही तुला पसंत नाही पडल तर नाही म्हण बाळा .”या गोड बोलण्यानेच अनुच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे बदलले ,त्या दोघांनी खूप गप्पा वगैरे मारली आणि येताना गाडीत मला अनु म्हणाली “काका बोका आवडला,आणि मग पुणे येई पर्यंत त्याची आजी ,आई ,सासरे ,धाकटा दीर ,एक वन्सबाई ,बाग हे कित्ती कित्ती मस्त आहे याची सहस्र आवर्तन झाली .
लग्न झाल ,हि माझी तशी लांबची पुतणी , नंतर बरेच वर्ष गाठभेट नाही ,कधीतरी फोनवर बोलण व्हायचं ,तीच सारख एकच टुमण “काका ,काकू या कि एकदा पुतणीच राज्य बघायला .”
बरेच वर्षांनी योग आला ,गाडीतून उतरलो तर काकूला आणि मला मिठी मारून रडून झाल ,”काका तुम्ही इकडे ट्रीप सारख यायचं सांगितल नसतत ,तर मी खरच स्वर्गाला मुकले असते ,thank you ,thank you ,thank you काके काकू करून झाल .
“अगो बाई ,एक बाई रुसल्यात का आमच्यावर ,दोन दिवसात इकडे फिरकले नाही म्हणून,”बाप रे किती तो शिष्ठपणा अगदी पहिली कळी उमलली म्हणून एवढ नकोय काही ,माहित्ये पाहिलट करीण आहेस ती ,”सुखली ग ताई माझी ,दोन दिवसात पाणी नाही का मिळाल ,आज सांगत्ये हो वामनला इकडे पाट फिरवायला .”ओ पोफळे वाहिनी ,तुम्ही जीव धरणार कधी ,जरा वारा आला को १८० अंशात डुलता .”
मी आणि हि बघतच राहिलो ,”अनु किती सुरेक बोलत्येस झाडांशी ?अग कोणी शिकवलं तुला हे ?.
“काका ,आजे सासूबाई होत्याना त्या सुरवातीला मला घेऊन या बागा मधून फिरायच्या ,झाडावरून एवढ्या प्रेमाने हात फिरवत बोलायच्या कि ती झाड अगदी झिम्माड होऊन जायची आणि खर सांगते काकू ,आजी बागेत शिरण्यापूर्वी पेक्षा त्या अस झाडांशी बोलून गेल्या कि झाड टवटवीत व्हायची .”
मध्यंतरी माझ्या सासर्यांनी म्हणजे बाबांनी एक गोष्ट सांगितली कि म्हणे एक आदिवासी जमात आहे ,त्यांना एखाद झाड काढून टाकायचं असल कि ते झाड तोडत नाहीत ,सगळे गावकरी जमून त्या झाडाला मोठमोठ्या आवाजात शिव्या देतात ,मग ते झाड अपोआप मरून जात .”
आमच्या सासूबाई सांगतात झाड ,गुर यांच्याशी प्रेमाने बोलाव ,त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत कौतुक कराव कि ती झाड देता किती घेशील दो कराने अस दान देतात .
आम्ही मंत्रमुग्ध होवून नुसत ऐकत होतो ,तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या झाल्या का बागा फिरून आणि मालकिणीने केलेलं कौतुक ऐकून ? अनु तू बस हो काका काकूशी गप्पा मारीत मी बघत्ये जेवणाच .
मग .
एवढ्यात सासरे आले आणि गप्पात सामील झाले .”बाबा उद्या आपल्याला समुद्रावर पोहायला जायचं आहे ,मी काही ऐकणार नाही “.
“ते म्हणाले अग मी कशाला ?नवऱ्याला घेऊन जा ,माझ्यावर नको तुझी दादागिरी “.
अहो त्याला वेळ असेल तर ना ,साहेबांचा काहीतरी नवीन कलमाचा प्रयोग चालू आहे ,उद्या दापोलीस जायचं होत पण आता काका आलेत म्हणून पुढे ढकलली .
“अनु ,पोहायला कधी शिकलीस ?”
आज्जे सासूबाई आणि बाबा यांची पहिली अट होती कि पोहायला शिकायचं ,मी भीत होते पण बाबांनी हट्टच धरला कि यंदा गणपती विसर्जनाला समुद्रात तू गणपती नवऱ्या बरोबर घेऊन जायचीस म्हणून ,मग काय मारली उडी आणि घाबरल्ये मग यांनी माझी वेणी धरून वर घेतली आणि अशी घट्ट बिलगल्ये त्यांना ,तेव्हा हे हळूच म्हणाले अशी बिलगणार असलीस तर सतरा वेळा विहिरीतून वर काढेन .
“काका ,सासऱ्याच्या समोर काय पुराण लावल आहे ते ऐकलत ना ?”सासरे हसून म्हणाले तशी पटकन म्हणाली “बाबा you are not my सासरा only ,तुम्ही मित्र आहात माझे “.
माझ्या डोळ्यातून अश्रू यायचे बाकी होते .
तेवढ्यात तीच पिल्लू आल आणि म्हणाल “आई मी शिपण्याला जाऊ ?’
फावड उचलत तरी का ?उगीच पाटात पाय फिरवत खेळत बसायचं ,सर्दी होईल ,काही नको जायला .”
तेवढ्यात सासूबाई पोह्याच्या बशा घेऊन बाहेर आल्या आणि म्हणाल्या “गवयाच्या पोराने मोठा आ लावला तर घसा दुखत नाही अनु ,जाऊ दे त्याला .”
“तरी काका अनुची गंमत सांगत्ये ,पहिल्यांदाच पावसात मनसोक्त भिजली ,एवढा पाऊस पुण्यात कधी बघितलेला नसेल ,आणि आली शिंकत आणि कोमट अंग घेऊन ,तेवढ्यात तिचा नवरा हसला आणि मग काय ग बाई तो सदाशिवपेठी फणकारा .तिला औषध दिल आणि दोन दिवसांनी पुन्हा मोठी सर आली तशी गोधडी लपेटून बसलेली ,तेवढ्यात हे आले आणि म्हणाले चला सुनबाई पावसात ,मनसोक्त भिजा ,अग म्हणजे इथल्या पावसाला पण कळत कि हे आपल माणूस आहे ,दोन तीन वेळा भिजलीस कि पाऊस मग सर्दी वगैरे नाही फक्त वरदहस्त देतो .”
तीन दिवस हे सगळ ऐकत होती ,जावई आणि अनु त्यांच्या नवीननवीन योजना ,शेतीतील ,बागेतील एकेक प्रयोग दाखवीत होते,गोठ्यातील गोधन दाखवीत होते .मी आणि हि फक्त अचंबित .तेवढ्यात दोन खड्डे खणलेले आणि दोन डाळिंबाची रोप उभी होती तिथे अनु घेऊन गेली आणि म्हणाली “तुमच्या दोघांच्या हस्ते वृक्षारोपण आणि आज इथेच बागेत जेवण असा बेत आहे ,”
निघताना मी विचारल “अनु पुण्यास कधी फेरी ?’
“काका ,खर सांगू ,इथून पाय निघत नाही ,दोन दिवस नसले कि या आमच्या लाडूबाई म्हणजे वेली रे रुसतात ,मला आठवण आली कि मीच गाडी पाठवून आई ,बाबांना इकडे बोलवून घेत्ये आणि आता काका तू हि निवृत्त झाला आहेस ,तुला हवेतेव्हा कळव मी तुमच्यासाठी गाडी पाठवून देईन .”आणि एकदा सगळ्या मुलांना देखील पाठवून द्या बघा म्हणाव आमच कोकण “.
— श्रीनिवास चितळे
— संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो..
Leave a Reply