लंड्नचे अंतर मिनिटा- मिनिटाला कमी होऊ लागले होते. मधेच डुलकी लागत होती. मनांत एक अनामिक हुरहुर वाटत होती. युकेच्या स्थानिक वेळेनुसार विमान सकाळी ७.३५ ला हिथ्रो विमानतळावर उतरणार होते. मुंबई ते लंडन हा प्रवास ९ तास ५० मिनिटांचा होता. विमान मात्र ७ वाजताच हिथ्रो विमानतळावर उतरले. त्या अगोदर सिटबेल्ट बांधण्याच्या सुचना देण्यांत आल्या. विमानतळावर उतरतांना खालचे द्रृश्य अतिशय मोहक होते. चित्र काढल्याप्रमाणे प्रमाणबध्द व सुबक रस्ते, नद्या, नद्यांवरील पुल, इमारती. एखाद्या प्रदर्शानांत मोठ्या शहरांची लहान प्रतिकृती ठेवावी असे ते चित्र डोळ्यांत साठ्वून ठेवतो न ठेवतो, तोच विमान घावपट्टीवर अलगद उतरले, रनवेवरुन धावत-धावत टर्मिनल ४ लागलेसुध्दां, आधाराशिवाय न चालणारे प्रवाशी ,वयस्कर प्रवाशी, मूलबाळ घेवून जाणारे प्रवाशी यांना विमानांतच थांबवून अगोदर इतर प्रवाशांना बाहेर पडू दिले जात होते. विमानाचे पायलट, क्रू, हवाई सुंदरी प्रवाशांना निरोप देण्यांसाठी दारातच उभे होते व हसून ‘बाय बाय’ करत होते.
हिथ्रो विमानतळावर पाऊल ठेवले. इंग्रजांच्या भूमीवर आपल्यांला कधीकाळी पाय ठेवता येईल असे वाटले नव्हते. याच भूमीवरुन हिंदुस्थांनात येऊन १५० वर्ष राज्य करणा-या ब्रिटीश नागरिकाला शोधण्याचा उगीचच असफल प्रयत्न केला. नक्की इंग्रज कोण ? साऱ्या जगातले असंख्य लोक विमानतळावर दिसत होते. ‘हिथ्रो’ विमानतळ हे जगातील सर्वात मोठे विमानतळ आहे. तेथे अनेक ठिकाणी एक्झीट व ट्रांझीटचे बोर्ड होते. मी ट्रांझीटचा मार्ग जिथे नेईल तिकडे हातातील बॅगा साभांळ्त जात राहिलो. पुन्हा एकदां मेटल डिटेक्टरने सामान व सर्व शरीराची तपासणी झाली. आमचे पुढचे विमान त्याच टर्मिनलला लागणार होते. टर्मिनलला २५ गेट्स होते. त्यापैकी कोणत्या टर्मिनलला विमान पार्क होणारहे दिसण्यांसाठी अनेक डिस्प्ले विमान तळावर मौजूद होते, व ते इतर विमानांच्या बाबतीत तसे दाखवतही होते. परंतु आमचे विमान कुठे लावायचे हे त्यांचे ठरलेले नसावे म्हणून ‘थांबा व पहा’ अशीच पाटी दिसत होती.शेवटी अर्धातास तिथे थांबून कंटाळा आला म्हणुन रजनीला तिथेच उभे करुन मी फोन करावा. म्हणून जवळच असणा-या बुथपाशी गेलो. तेथे सर्व व्यवहार पौंडातले. माझ्याजवळ भारतीय नोटा व अमेरिकन डॉलर्स , एका भल्या गृहस्थाने माझी अडचण ओळ्खून इंग्रजीतून मला मार्ग-दर्शन केले, त्याच्या इंग्रजी उच्यांरातून सर्वच काही कळले असे नाही, फक्त इतके कळले की थोड्या अंतरावर कार्ड विकत मिळतात. तिथे जाण्याचा मार्ग खुणेने त्याने सांगितला. तिथे जाऊन १३ डॉलर्स खर्च करुन ५ पौंड किंमतीचे फोन कार्ड घेतले, त्या कार्डावरील नंबर स्क्रॅच करुन योगेशला अनेक प्रयत्नानंतर फोन लागला. परंतु तो व्हाइसमेलला गेला. त्याला निरोप ठेऊन , ही उभी होती तिथे परत आलो.
अजुनही विमान कोणत्या गेटला लागणार याचा डिस्प्ले अद्यापही येत नव्हता. विमान तळावरील खुल्या बाजारात चक्कर मारायचे ठरवून निघालो, ह्या ‘डयुटी फ्री’ दुकानातून काय म्हणून विक्रीला नव्हते,…-टिव्ही, कॉमेरे, व्हिडीओ शुटींगचे अद्ययावत कॅमेरे, मल्टीमिडीयाचे जगातले एकूणएक प्रकार, विविध प्रकारचे चॉकलेट, इ विक्रीला असलेली भव्य दुकाने, काचेच्या विविध रंगाच्या व आकाराच्या वस्तू, मुलांचे कपडे, खेळणी, पुस्तके, वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्यातून भरलेली मदीरा, एकास एक फ्री सौंदर्यप्रसाधने, सुकामेवा, अत्याधुनिक वस्तू,- काय म्हणून त्या बाजारपेठेत नव्हते. जाहिरात करण्यासाठी एक फिरती कारही त्या ठिकाणी होती.त्या प्रचंड मार्केट्मधले ग्राहक मात्र सर्व प्रवासी होते, किती तरी वर्णाचे, धर्माचे, जातीचे, स्त्री-पुरुष, मुले, वयस्कर माणसे, कॆरीयरवर सामान ठेउन इकडून तिकडे फिरत होते. किती वाजले हे डिस्प्लेवरुन समजत होते. येथे उतरुन आता साधारण १ तास होत आला होता. मन बाजारातील वस्तुंच्या किंमतीचा अर्थात पौंडात हिशोब करत होते एखाद्या वस्तूला किती डॉलर द्यावे लागतील व त्याचे रुपये किती हे मनातल्या मनात ठरवित होते मधेच एका ठिकाणी रेस्टरुम दिसली. मग आळीपाळीने बॅगा सांभाळत वॉश घेतला. अद्यापही विमान कुठे लागणार हे समजले नव्ह्ते. शेवटी माहिती देणा-या कांऊटरवर बोस्टनला जाणारे विमान कोणत्या फलाटाला लागणार आहे हे विचारले असता २३ नबंरच्या गेटवरआमचे विमान लागणार असे कळले, त्या गेटकडे जाणारा मार्ग बाणाने दाखवला होता. आम्ही उभे होतो तेथुन २३ नंबर गेट्पर्यंत जायला साधारणपणे ३० मिनिटे लागणार होती. विमानाची वेळ १० वाजुन ५५ मिनिटे होती. आता साधारण नऊ सव्वा नऊ झाले होते. गाडी ढकलत ,गप्पा मारत आम्ही आजुबाजूची नवलाई पहात क्रं २३ कडे निघालो. मधूनच मागून घंटी वाजवत एखादी लहान कार(फ़्लॅक–वयस्कर प्रवाशांना घेवून जाण्यासाठी असणारे छोटे वाहन) येत होती. त्यातला प्रवाशी वयस्कर दिसत होता, परंतू ती गाडी चालवणारा सुध्दा वयस्करच होता. ; एकदाचे २३ नंबरचे गेटवर येऊन पोहोचलो. तिथे असलेल्या चेअर्सवर आराम करत बसलो. सुमारे अर्धातासाने विमानात बसण्यासाठी सोडण्यात येणार होते. काचेच्या तावदानातून आम्हाला नेणारे विमान दिसत होते. मुंबईला आमचे विमान बाहेरुन कसे दिसते, ते आम्हांला बघायला मिळालेच नव्हते. आता मात्र ब्रिटीश एअरवेजचे विमान दिसत होते. विमानांत प्रवाशी-सामान चढवण्याचे काम चालू होते.प्रचंड मोठ्या जाळीच्या कंटेनरमधे अनेक प्रवाशांच्या बॅगा, लगेज, अनेक मोठी गाठोडी, क्रेनच्या साह्यांने ठेवण्यात येत होती. आमच्याही बॅगात्यात असाव्यात. विमानतळाच्या ४ नंबरच्या टर्मिनलचा थोडाच भाग दिसत होता. डावीकडे गेट क्रं २२-२१-व पुढे २४ असे गेट दिसत होते. प्रत्येक गेटवर ब्रिटीश-एअरवेजची विमाने होती. आकाशांतून साधारण मिनिटाला एक विमान खाली येतांना किंवा आकाशांत झेपावताना दिसत होते.
Leave a Reply