लंड्नच्या विमानतळावरुन १० वाजता विमानात बसण्याची परवांगी मिळाली. परत आम्हाला खिडकीजवळील जागा मिळाली. ३ सीटच्या रांगेत खिडकीजवळ रजनी, नंतर मी व मग एक कृष्णवर्णीय तरुण बसला. विमानांत ‘क्रू’ ने अतिशय अदबीने स्वागत केले. प्रवास उत्तम होणार याची खात्री पटत होती. यावेळी तीन सिटच्या रांगेत असल्याने थोडी अडचण भासत होती खरी -पण महाराष्ट्र महामंडळाच्या एसटी प्रवासाची आठवण करुन घेता– ह्या सीट केव्ह्ढ्यातरी सुखकारक होत्या, विमानाने आता निघण्याच्या सूचना दिल्या. बेल्ट लावण्यांस सांगण्यात आले. ह्या सुचना मात्र एकूण एक प्रवाशी अत्यंत प्रामाणिकपणे अमलात आणतांना दिसत होते. थोडयाच वेळात विमानाची घरघर सुरु झाली. पण धावपट्टीकडे निघण्याची काही चिन्हे दिसेनात. शेवटी सूचना आली की, विमान अर्धा तास उशिरा सुटेल, मग पुन्हां बेल्ट सोडले, व विमानात काही भारतीय चेहरे दिसतात का ते पाहू लागलो.पण एकही भारतीय दिसत नव्हता. नाही म्हणायला एक दाक्षिणात्य जोडपे दिसले ४-५ रांगा सोडून बसले होते. आता जवळपास पाऊण तास झाला होता.पुन्हां एकदा सूचना झाली यावेळी मात्र काही तांत्रिक कारणाने खोटी झाली आहे. व थोडया वेळातच पुढचा प्रवास सुरु होईल असे सांगून दिलगिरी व्यक्त केली. अशा ४ वेळा सूचना देऊन शेवटी २ तास उशिराने विमानाने घावपट्टी-कडे धावण्यास सुरूवात केली. विमान उशिरा सुटण्याचे कारण, विमानाचा लगेज चढ्ण्याचा दरवाजा बंद होत नव्हता. हे आम्हांला शेवटच्या सुचनेतून कळ्ले.
हिथ्रो लंडन ते बोस्टनचा प्रवास ८ तासांचा होता. आता विमान घावपट्टीवरुन वेगाने निघून आकाशांत झेपावले सुध्दां. खिडकीतून लंड्न शहराचे विहंगम दॄश्य दिसत होते. रस्ते, इमारती, कुठे हिरवागार निसर्ग, तर कुठे नद्या, तलाव, पूल, इत्यादी आता विमान उंच ढगात गेले. खालचे दॄश्य ढगात धुक्यात लपून गेले. आजुबाजूला ढगच ढग नसतील तर फक्त पोकळी. आता विमान३६,००० फुटांवरुन उड्त होते. विमानाचा मार्ग टिव्ही वर दिसत होता. आता पुढचा प्रवास समुद्रावरुन होता. अटलांटीक महासागरावरुन आमचे विमान जाणार होते. विमान स्थिर होताच खाण्याचे पदार्थ द्यायला सुरवात झाली. प्रथम ज्यूस आले. हवे ते ज्यूस मिळत होते. आमच्या शेजारच्या प्रवासी मित्राने वाइन घेतली. जेवणांत पालकभाजी, पराठे, मुगाची उसळ, सॅलड, टॅमाटो सूप व चॉकलेट, पण होते. थोडे जागत थोडे झोपत असा प्रवास सुरु होता. शेजारचा मित्र आता जरा आनंदलेला दिसत होता.त्याच्या चेह-यावर थोडे स्मित होते. त्याने हाय पण केले. ३/४ तास असेच गेले. पुन्हा जेवण आले. भारतीय पदार्थ घेतले. शेजारच्या मित्राने परत २ बाटल्या मागवल्या. १ मला देऊ केली.सॉरी’ म्हटल्यावर त्याला बरे वाटले.असे दिसले. कारण त्याच्या पेयाच्या वाट्यात मी सामील झालो नव्हतो. आता बोस्टन आता १ तासावर राहिले होते. विमान खरे तर त्या वेळेनुसार १ वाजता पोहोचणार होते. त्याआधी विमानात इमिग्रेशनचे फार्म भरुन ठेवले. विमान आता विमानतळाभोवती घिरट्या घालू लागले. कदाचित धावपट्टी मोकळी नसावी. पुन्हां एकदां बोस्टनवर एक मोठी फेरी मारली. विमानातून बोस्टन शहर अतिशय सुंदर दिसत होते. समुद्रावरील कमानीचा पूल, उंचच उंच इमारती,रस्ते, अगदी स्पष्ट दिसत होते. मनांत इतिहासातील बोस्टन टी-पार्टी इथेच कुठे तरी झाली का? असा विचार आला. शेवटी ३ वाजता विमान बोस्टनच्या विमानतळावर उतरले. थोडासुद्घां घक्का बसला नाही. लगत अगदी पिसासारखे उतरले. पुन्हां तपासणी, स्क्रिनिंग, बॅगा, ताब्यात घेणे व फिंगर प्रिंटीग इत्यादी सोपस्कार झाले. शेवटी निघताना सुध्दां बोस्टनच्या विमानतळावर सुरक्षा-रक्षकाने विचारले, ” आंबे वैगेरे आहेत का बॅगेत ? आमच्या नाही म्हणण्यावर त्याने चटकन विश्वास ठेवला.
आम्ही तेथून निघालो. या सर्वात साधारण ४५ मिनिटे गेली होती. आता उत्कंठा शिगेला पोचली होती. बॅगा ढकलत आणि नजरेने योगेश- अजिता कोठे दिसतात का? ह्याचा शोध घेत बाहेर आलो. दोघांनी आम्हाला वाकून नमस्कार करुन पुष्पगुच्छ कधी हातात दिले हे पाणावलेल्या, हरवलेल्या नजरेला दिसलेच नाही. आयुष्यांत आपल्या मुलाने व सुनेने येवढे सुंदर स्वागत करावे हे खरोखरच मोठ्या भाग्याचे. आयुष्यांत कधीही न विसरण्या-सारखे ते क्षण तो प्रसंग. एक सुंदरसे ग्रिटींग योगेशने आणले होते. योगेश- अजिताने चॉकलेटस आणले होते. ते आम्हांला खायला लावले. आता बॅगा ओढण्याची जबाबदारी त्या दोधांनी घेतली. विमानतळाच्या बाजूलाच असलेल्या पार्किंग लॉट्मधे ठेवलेल्या गाडीकडे गेलो. आणि गाडीतून घराकडे आमचा प्रवास सुरु झाला. योगेशच्या घरी सुमारे एका तासात पोहोचलो. भव्य मोठे रस्ते, वेगाने जाणारी वाहने, मोठ्मोठे ओव्हरब्रिज सुंदर सुंदर घरे, घराभोवती हिरवळ नजरेत साठवत योगेश- अजिताच्या घरात प्रवेश केला. प्रथम-दर्शनीच घर एकदम छान ठेवल्याचे दिसत होते. शुक्रवार ४ जुन २००४ चा दिवस होता. बोस्टनला पोहोचलो तेथील तारीखही तीच होती. खरंच आपण अमेरीकेत आलो? मुलांना भेटलो? खरच का? स्वप्न तर नाही ना हे! आणि आरामखुर्चीवर कघी डोळा लागला ते कळलेच नाही. घर छान होते, मोठी वसाहत, ८ मोठ्या इमारती. त्यांत साधारण २४ अपार्ट्मेंटस सर्व बाजूंनी कंपाऊंड -वॉल -मधे हिरवळ, फुलांची झाडे,आणि मुख्य म्हणजे सर्व बाजूच्या इमारती-भोवतीने फिरायला रस्ते होते. मध्यभागी पोहण्याचा तलाव होता. अशा त- हेने सर्व सुख-सोईंनी युक्त अशी जागा होती. आता या वास्तूत ६ महिने वास्तव्य करावयाचे होते.
माझा अगदी सिंहगड ते मुंबई, व पुढे लंड्नमार्गे बोस्टनपर्यंतचा प्रवास तुम्ही माझाबरोबर केलातच आता अमेरिकेतल्या गमती–जमती पुढ्च्या लेखात …
— भास्कर पवार
Leave a Reply