रात्री सव्वादोनची वेळ. गुरूवार, 4 जून 2004, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून आमच्या ब्रिटीश एअरवेजच्या बोईंग विमानाने रनवे’वर धावण्यास सुरूवात केली. विमानतळाचे दिवे भराभर मागे टाकत विमानाने वेग घेतला. त्याआधी विमानाच्या संबधात सुरक्षीततेचे उपाय, सिटबेल्ट बांधण्याच्या सुचना, पायलट व क्रू यांची नावे, आणीबाणीच्या परिस्थितीत घ्यावयाची काळजी, इत्यादी बाबत सूचना करण्यात आल्या. आम्हांला विमानात खिडकीजवळची जागा मिळाली होती. माझा व रजनीचा हा पहिलाच विमान प्रवास होता. नाही म्हणायला हैद्राबाद्च्या ‘रामोजी फिल्म सिटीच्या’ विमानाचा आभास निर्माण करणा-या प्रतिकृतीच्या एका बाजूला बसुन आपण विमानातच बसलोय असे फोटो काढले होते.
विमानातील सीटच्यासमोर छोटा टिव्ही होता. आर्मरेस्ट्च्यावर स्क्रिनकंट्रोलची वेगवेगळी बटणे होती. १ते१८ चॅनेल होते त्यावर वेगवेगळे सिनेमे व शेवटचा चॅनल होता मॅपचा. त्याच्यावर विमानाची गती, मुंबईची आत्ताची वेळ, पोहोचणा-या ठिकाणाची आत्ताची वेळ, म्हणजेच लंडनची स्थानिक वेळ, विमानाची सध्याची जमिनीपासूनची ऊंची, इत्यादी माहिती वेळोवेळी येत होती. विमानाने आता खूपच वेग घेतला होता. साधारणतः ३६,०००० फूट उंचीवर गेल्यावर ते स्थिरपणे उडू लागले. खिडकीतून खाली पाहताना खाली-खोलवर जमिनीवरील लुकलुकणारे प्रकाशाचे बिंदु लहान लहान होत लुप्त होत चालले होते. पड्द्यावर विमानाचा वेग दिसत होता. ताशी हजार किलोमीटर वेगाने विमान ३६,००० फूट ऊंचीवरुन उडत होते. बाहेरचे तापमान वजा ३०-४० सेंटीग्रेड्च्या आसपास होते. विमान हवेत झेपावताना पोटात कसेतरी होते असे वाटत होते पण विमान आकाशांत कधी झेपावले व केंव्हा स्थिर झाले हे समजलेच नाही. रजनीचा सुध्दां हाच अनुभव होता. समोरच्या स्र्किनवर विमानाच्या मार्गाचा नकाशा होता. त्यांत अरबी सम्रुद्र सोडल्यानंतर काळ्या समुद्रापर्यंतचा प्रवास भुभागावरुन होणार असल्याचे दिसत होते.
विमानातील ह्या नवलाईतून हवाई सुंदरीच्या मंजुळ आवाजाने भानावर आलो. स्वच्छ ग्लासातून पाणी व ज्यूस देण्यासाठी तिने ” एस्कुज मी” म्हंटले होते व सीटसमोरील छोटा ट्रे ओढून त्यावर पाण्याचे व ज्यूसचे ग्लास ठेवले. ते थोडे सुध्दां हिंदकळत नव्हते, एक थेंबही सांडत नव्हता. जाता-जाता हवाई सुंदरीने खिडकीचे शटर बंद करण्याची विनंती केली. ती नाकारणे मला शक्य झाल नाही.
आमचे विमान ब्रिटीश एअरवेजचे होते. मुंबईला वेटींग-रुममधे बरेच प्रवासी होते. पण त्यातले महाराष्ट्रीयन कोण व परदेशी कोण हे कपडयावरुन ओळ्खणे कठीण होते. विमानतळाच्या बाहेर मुलगी स्वाती, जावई अजय, नातू अभिषेक व माझे व्याही श्री. बुलबुले हे सर्वजण थांबलेले होते. चेकींग झाल्याचे त्यांना फोनवरुन सांगितले.व परत १० मिनिटांनी फोन करतो असे म्हटले होते. परंतु वेटींग रुममधल्या फोनवरुन नेहमीप्रमाणे काही केल्याफोन लागला नाही. एका सहप्रवाशाच्या मोबाईलवरुन मुंबईत राहणारे जुने स्नेही सुर्यकरांकडे फोन करुन जावई-अजय यांना फोनकरण्यास सुर्यकरांना सांगितले. व तसेच पुण्याला जायला निरोपही दिला.या सर्व गडबडीत एक वयस्कर गृहस्थ आमच्याशी मराठीतून बोलले ते आमच्या बरोबर-विमान प्रवासतही बरोबर होते.
आयुष्यात कधी एवढया मोठ्या प्रवासाचा योग यईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. माझा मुलगा योगेश याला अमेरिकेत जाउन पांच वर्ष झाली होती. या अगोदर त्याच्याकडे जाण्याचा योग नव्हता. नोकरी-सोनलचे (घाकटीमुलगी) लग्न,योगेशचे लग्न व अमेरीकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला यामुळे त्याच्याकडे जाण्याचा विचार करणेही शक्य नव्हते. पण योगेशने स्थिरस्थावर झाल्यावर प्रथम कोणते काम केले असेल तर, आम्हां दोघांना अमेरिकेत येण्यासाठी करावी लागणारी व्हिसा- कागद पत्रांची पूर्तता, त्यासाठी कायकाय करावे लागेल या बाबतची संपूर्ण जंत्रीच त्याने पाठवली होती. व्हिसा काहीही त्रास न होता मिळाला. तिकिटांची, इन्शुरन्सची, पूर्तता झाली. युकेच्या ट्रान्सीट व्हिसाचा विषय बरेच दिवस चर्चेत राहिला .कारण आमचे विमान मुंबई-लंडन, लंडन-बोस्टन असे जाणार होते. लंडनला ३ तास विमान थांबणार होते. त्यासाठी ट्रान्सीट व्हिसा आवश्यक आहे का नाही यासाठी ब-याच वेबसाईट्वर जाऊन माहिती घ्यावी लागली होती. काही ठिकाणी इमेल ही केले. काहींची उत्तरे होकारार्थी तर काहीची नकारार्थी आली होती. शेवटी युके-काऊन्सिलेटने सर्व विमान कंपन्यांना पाठविलेले अलिकडचे परिपत्रक वेबसाईटवर मिळाले, त्यांची प्रिंट करुन बरोबर ठेवायची असे ठरवलं होते.
विमान आता ३६,००० ते ३९,००० फूट ऊंचीवरुन उडत होते. तास-दि ड्तांसाचाच प्रवास झाला होता. आता जेवण आले. काही पदार्थ चवदार तर काही अगदीच बेचव होते. रजनीने पूर्ण शाकाहारी जेवण घेतले होते. मी मात्र एशियन नाॅनव्हेज – त्यात आम्लेट्खेरीज दुसरे काहीच आवडले नाही. ब्रेड,बटर बरे होते. पाणी मात्र अतिशय स्वछ व स्वछ ग्लासात होते. समोरच्या स्र्किनवर विमान सध्या कुठे आहे? कितीउंचीवर आहे, व मुंबईला किती वाजले हे कळत होते. माझे घड्याळ मुंबईच्या वेळेनुसार तर, हिचे घड्याळ लंडनच्या वेळेनुसार लावले होते. मनांत वेळेचा हिशोब करत प्रवास चालला होता. सकाळ्पासूनची दगदग– पुणे-मुंबई प्रवास यामुळे हिला डुलकी लागली होती. मी मात्र स्र्किन-वरचे वेगवेगळे देश,सुंदर शहरे,व त्यांची नावे पहात होतो. लंड्नला पोहोचण्याची वेळही मधूनमधून स्र्किनवर येत होती. मुंबईतून निघताना वाटत होते की, सिनेमांत दाखवतात तसे विमानतळावर चालत जाऊन विमानाला लावलेल्या शिडीने विमानांत चढायचे. परंतु वेटींग-रुममधून निघाल्यावर बंद पॅसेजमधून चालत जाऊन कधी विमानात पोहोचतो ते कळलेच नाही. सीट शोधण्यासाठी हवाई सुंदरीने तप्तरतेने मदत केली. विमानात स्पिकरवरुन सूचना देताना त्या इंग्रजी बरोबर हिंदीतूनही देण्यात येत होत्या. गुजराथीतूनही सूचना देण्यांत येतील असे सांगितले . परंतु शेवटपर्यंत गुजराथीमधून सूचना काही दिल्या नाहीत. ब्रिटीश एअरवेजच्या हिंदीतून सूचना ऎकताना बरे वाटले, वाटले ब्रिटीशांनी १५० वर्ष भारतावर सत्ता गाजवली त्याचे परिमार्जन करत असावेत. दुसरा विचार आला की, मार्केटिंगची ही धंदा वाढवण्याची खुबी तर नसेल ना असो.
Leave a Reply