आपण जसे अधिकाधिक उंचीवर जाऊ, तशी हवा थंड होत जाते. त्यामुळे अतिशय उंचीवरील पठारासारख्या ठिकाणांचं किंवा उंच पर्वतांवरचं तापमान कमी झालेलं असतं. परंतु जशी उंची वाढत जाते, तसा त्या ठिकाणी होणारा सूर्यप्रकाशाचा मारा अधिकाधिक तीव्र होत जातो. तीव्र सूर्यप्रकाश झेलणारी ही ठिकाणं त्यामुळे, एका अर्थी ‘तप्त’ ठिकाणं ठरतात. नासाच्या सिरीस या, वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या प्रकल्पाच्या अंतर्गत, उपग्रहांद्वारे पृथ्वीवरच्या विविध ठिकाणी, सूर्यप्रकाशाद्वारे पोचणारी ऊर्जा मोजली जात आहे. या प्रकल्पाद्वारे केलेल्या निरीक्षणांतून, दक्षिण अमेरिकेतील, अतिउंचीवरच्या अटाकामा वाळवंटातला अॅल्टिप्लॅनो हा अतिथंड प्रदेश ‘अतितप्त’ही असल्याचं दिसून आलं आहे. हा निष्कर्ष उपग्रहांद्वारे, अंतराळातून काढला गेला असल्यानं, या निष्कर्षाची प्रत्यक्ष त्या ठिकाणाहून पडताळणी होणं, आवश्यक होतं. चिलीतील सांतिआगो विद्यापीठातील राऊल कोर्देरो आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनाद्वारे आता ही पडताळणी केली आहे. राऊल कोर्देरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा, या संशोधनावरील शोधनिबंध ‘बुलेटिन ऑफ दी अमेरिकन मिटिऑरॉलॉजिकल सोसायटी’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. हा शोधनिबंध, २०१६-२०२२ यादरम्यानच्या पाच वर्षांहून अधिक काळात केल्या गेलेल्या, नोंदींवर आधारित आहे.
अटाकामा वाळवंटातील अॅल्टिप्लॅनो हा प्रदेश चिली, बोलिव्हिआ, पेरू आणि अर्जेंटिना या देशांच्या परिसरात वसला आहे. याच प्रदेशात चॅजनँटोर नावाचं पठार आहे. सुमारे पन्नास चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या या पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ५,१०० मीटर आहे. या पठारावरचं उन्हाळ्यातलं सरासरी तापमान हे शून्य अंश सेल्सिअसच्या जवळ असतं, तर हिवाळ्यातलं सरासरी तापमान हे शून्याखाली सहा अंश सेल्सिअसच्या खाली जातं. हा सगळा भाग अत्यंत शुष्क आणि वैराण असून, इथल्या हवेत बाष्पाचं प्रमाण अत्यल्प आहे. इथलं आकाश हे वर्षभरातील मोठा काळ निरभ्र असतं. राऊल कोर्देरो आणि त्यांचे सहकारी २०१६ सालापासून, या चॅजनँटोर पठाराच्या वायव्य सीमेलगतच्या भागातून, तिथे पोचणाऱ्या सूर्यप्रकाशाची नोंद करीत आहेत. या निरीक्षणांसाठी हे संशोधक पायरॅनोमीटर या नावाचं उपकरण वापरत आहेत. या छोट्याशा अर्धगोलाकार उपकरणाद्वारे एखाद्या ठिकाणी, सूर्यप्रकाशामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेचं एकत्रिकरीत्या मापन केलं जातं. या उपकरणाला, सूर्यप्रकाशातील विविध लहरलांबीच्या किरणांचं प्रमाण मोजणाऱ्या, एका विशेष प्रकारच्या वर्णपटमापकाचीही जोड दिली गेली आहे.
राऊल कोर्देरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, पाच वर्षांहून अधिक काळ केलेल्या आपल्या निरीक्षणांचं विश्लेषण केलं आणि सूर्यकिरणांपासून मिळणाऱ्या वर्षभरातील ऊर्जेची सरासरी काढली. या विश्लेषणावरून चॅजनँटोर पठारावरील प्रत्येक चौरस मीटर क्षेत्रफळावर प्रत्येक सेकंदाला सरासरी ३०८ जूल (ऊर्जेचं एकक) इतकी ऊर्जा पोचत असल्याचं दिसून आलं. नासानं आपल्या सिरीस या प्रकल्पाद्वारे, २०११-२०२० या काळात अंतराळातून केलेल्या निरीक्षणांनीसुद्धा, ही सरासरी सेकंदाला ३०२ जूल असल्याचं दाखवून दिलं होतं. या तुलनेवरून अॅल्टिप्लॅनो हा प्रदेश खरोखरचं ‘अतितप्त’ असल्याचं नक्की झालं.
सूर्यप्रकाश हा हवेतील बाष्पात शोषला जातो. त्यामुळे कमी उंचीवरील प्रदेशांत, जमिनीवर पोचेपर्यंत सूर्यप्रकाशाची तीव्रता लक्षणीय प्रमाणात कमी झालेली असते. चॅजनँटोर पठार किंवा तिबेटचं पठार, अशा अतिउंचीवरच्या प्रदेशांतल्या हवेत बाष्पाचं प्रमाण अत्यल्प असतं. त्यामुळे या अतिउंचीवरील प्रदेशातल्या सूर्यप्रकाशाची तीव्रता अधिक असते. चॅजनँटोर पठार हे तिबेटच्या पठारापेक्षा सुमारे चौदाशे मीटर अधिक उंचीवर आहे. इथलं हवामान इतकं शुष्क आहे की, अंटार्क्टिका वगळता जगात कुठेही इतकं शुष्क हवामान आढळत नाही. साहजिकच, या पठारावर सूर्यप्रकाश अधिक प्रमाणात पोचणं अपेक्षित आहे; आणि वस्तुस्थितीही अर्थात तशीच आहे. चॅजनँटोर पठारावर पोचणाऱ्या सूर्यप्रकाशाचं प्रमाण हे तिबेटच्या पठारावर पोचणाऱ्या सूर्यप्रकाशापेक्षा सुमारे २८ टक्क्यांनी अधिक असल्याचं राऊल कोर्देरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आढळलं. इतकंच नव्हे तर, या ‘अतितप्त‘ प्रदेशातील उन्हाळातल्या सूर्यप्रकाशाचं प्रमाण हे एव्हरेस्ट शिखराला चिकटून असणाऱ्या, साऊथ कॉल या सुमारे आठ हजार मीटर उंचीवरच्या ठिकाणी पोचणाऱ्या सूर्यप्रकाशापेक्षा दोन टक्क्यांनी जास्तच भरलं.
चॅजनँटोर पठारावरचा सूर्यप्रकाश तिबेटच्या पठारावरील सूर्यप्रकाशापेक्षा अधिक तीव्र असण्यामागे, तिबेटपेक्षा अधिक असलेली उंची, इतकंच एकमेव कारण नाही. त्याला इतर कारणांचीही साथ मिळाली आहे. या इतर कारणांपैकी एक कारण म्हणजे, चॅजनँटोर पठार हे तिबेटच्या पठाराच्या तुलनेत विषुववृत्ताला अधिक जवळ आहे. त्यामुळे इथे सूर्यकिरण तिबेटपेक्षा कमी तिरके पडतात. साहजिकच, इथे बसणारा सूर्यप्रकाशाचा तडाखा अधिक तीव्र असतो. याचबरोबर आणखी एक कारण म्हणजे, दक्षिण गोलार्धातले उन्हाळे उत्तर गोलार्धातील उन्हाळ्यापेक्षा अधिक तीव्र असतात. कारण दक्षिण गोलार्धात उन्हाळा सुरू असतानाच, पृथ्वी आपल्या प्रदक्षिणाकाळात सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ येते. (उत्तर गोलार्धात मात्र या काळात हिवाळा असतो.) अॅल्टिप्लॅनो प्रदेशाच्या बाबतीत, हवेतील ओझोनचं प्रमाणही कमी आहे. त्यामुळे इथे सूर्यप्रकाशातील अतिनील किरण कमी प्रमाणात शोषले जातात. याचाही परिणाम सूर्यप्रकाश अधिक तीव्र होण्यात होतो.
चॅजनँटोर पठारावर केल्या गेलेल्या मापनात दिसून आलेली एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे, इथलं सूर्यप्रकाशाचं प्रमाण अनेकवेळा अल्प काळासाठी प्रचंड प्रमाणात वाढतं. ही वाढ काहीवेळा काही सेकंदांची असते, काहीवेळा काही मिनिटांची असते, तर काहीवेळा ती काही तासांचीही असू शकते. आतापर्यंत जगभरात नोंदल्या गेलेल्या अशा सर्वोच्च दहा वाढींपैकी सात वाढी या चॅजनँटोर पठारावरील, राऊल कोर्देरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणांत नोंदवल्या गेल्या आहेत. यांतील सर्वोच्च नोंद २४ जानेवारी २०१७ रोजी झाली असून, ती पावणेचार तासांची होती. या वेळी इथल्या प्रत्येक चौरस मीटरवर प्रत्येक सेकंदाला तब्बल २१७७ जूल, इतक्या प्रचंड प्रमाणात सौरऊर्जेचा मारा झाला – म्हणजे वर्षभराच्या सरासरीच्या तुलनेत सातपट तीव्र! पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरापर्यंत पोचणाऱ्या सौरऊर्जेच्या तुलनेतही, हे प्रमाण सुमारे साठ टक्क्यांनी अधिक होतं. किंबहुना, सौरऊर्जेचं हे प्रमाण जवळपास, शुक्रावर पोचणाऱ्या सौरऊर्जेच्या प्रमाणाइतकं होतं. ऊर्जेतील या वाढींना कारणीभूत ठरतं आहे ते सूर्यप्रकाशाचं, ढगांकडून होणारं विशिष्ट प्रकारचं विखुरणं!
ढग हे सर्वसाधारणपणे जरी सूर्यप्रकाश अडवीत असले, तरी काहीवेळा ते वेगळाच परिणाम घडवून आणतात. ढग सूर्यप्रकाश शोषतात, तसंच ते सूर्यप्रकाश विखरूनही टाकतात. काही विशिष्ट प्रकारचे खंडित स्वरूपाचे आणि विशिष्ट पारदर्शकता असणारे ढग हे, त्यांच्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा मोठा भाग जमिनीच्या दिशेनंच विखरून टाकतात. याचा एकत्रित परिणाम होऊन, सूर्यप्रकाश जमिनीवरील एखाद्या परिसरात एकवटतो व अल्पकाळासाठी तिथे सूर्यप्रकाशाच्या प्रमाणात वाढ घडून येते. चॅजनँटोर पठारावरचं आकाश हे वर्षभरातील बराच काळ निरभ्र असलं, तरी तिथे ढगांचा पूर्ण अभाव मात्र नाही. उन्हाळ्यातल्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात, इथल्या आकाशात दक्षिण अमेरिकन मॉन्सूनचे ढग जमा होतात. दिनांक २४ जानेवारी २०१७ रोजी इथल्या सूर्यप्रकाशात जी मोठी वाढ घडून आली, ती अशा ढगांमुळेच. सूर्यप्रकाशातली ही वाढ, त्या-त्यावेळच्या तिथल्या सूर्यप्रकाशाच्या तुलनेत अगदी ऐंशी टक्क्यांपर्यंत असू शकते. अशी वाढ अनेक ठिकाणी, कमी उंचीवरील प्रदेशातही (क्वचित समुद्रसपाटीजवळील प्रदेशातही!) नोंदली गेली असली तरी, चॅजनँटोर पठारावर ही वाढ अनेकवेळा घडून येत असल्याचं, राऊल कोर्देरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून दिसून आलं आहे.
राऊल कोर्देरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या संशोधनानं, चॅजनँटोर पठार आणि पर्यायानं हा अॅल्टिप्लॅनो प्रदेश अतिथंड असला, तरी तो ‘अतितप्त’ही असल्याच्या निष्कर्षावर शिक्कामोर्तब झालं आहे. याच संशोधनानं, इथे अल्पावधीसाठी होणारी सूर्यप्रकाशातली वाढ, हीसुद्धा अत्यंत तीव्र असल्याचं दाखवून दिलं आहे. सौरऊर्जेतील वाढीची ही निरीक्षणं महत्त्वाची आहेत. कारण, कोणत्याही ठिकाणच्या हवामानाचं स्वरूप हे विविध अन्योन्य क्रियांवर अवलंबून असतं. एका ठिकाणची हवामानविषयक परिस्थिती, ही फक्त त्या जागेपुरती मर्यादित नसते. ती आजूबाजूच्या ठिकाणांच्या परिस्थितीवरही परिणाम घडवून आणीत असते. त्यामुळे हवामानाचा सर्वांगीण अभ्यास करायचा, तर अशा घटनांची दखल घ्यावी लागते. म्हणूनच राऊल कोर्देरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या, चॅजनँटोर पठारावरील अल्पावधीच्या अतीव ऊर्जावाढीच्या या नोंदीसुद्धा, हवामानाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या ठरतात.
(छायाचित्र सौजन्य : ESO/H.H.Heyer, hukseflux.com, Cordero, et al)
Leave a Reply