पी.एल. संतोषी फक्त गीतकार नव्हते तर ते दिग्दर्शकही होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. उत्कृष्ट लेखकही होते. म्युझिकल कॉमेडी हा प्रकार त्यांनी लोकप्रिय केला केला. तसेच ‘अनोखे बोल’ हा गीतप्रकार ‘टिका लई कली दई’ (चित्रपट – शिनशिनाके बुबला बु) यासारख्या गाण्यातून रूढ केला. ‘कोई किसीका दिवाना ना बने’ (सरगम), ‘महफिल में जल उठी शमा’ (निराला), ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में’ (शिनशिनाके बुबला बु) यांसारखी तरल भावकाव्यं त्यांच्या लेखणीतून झरली होती.पी.एल.संतोषी हे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होते. ते उत्तम गीतकार होते. मग ते पटकथाकार बनले, मग दिग्दर्शक.
यानंतर त्यांना चित्रपट निर्माता होण्याची दुर्बुद्धी झाली आणि त्यापायी ते कफल्लक बनले. या माणसाने दोन्ही हातांनी पैसा कमावला व दहा हातांनी तो उधळला. नटीच्या प्रेमात पडले व तिच्यावर सारी संपत्ती ओवाळून टाकली. संतोषी यांनी १९५२ मध्ये ‘शिनशिनाकी बबला बु’ या नावाचा चित्रपट निर्माण केला. त्याचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते व गीतकार तेच होते. संगीतकार होते त्यांचे खास मित्र सी. रामचंद्र. हा चित्रपट म्हणजे त्यांच्या काव्यप्रतिभेचा एक उत्तम नमुना होता. या सिनेमात एकीकडे त्यांनी ‘अरे बाबा, ये हसी बाबा, ये खुशी बाबा, खा बाबा, पी बाबा, ‘ अशी निरर्थक गाणी लिहिली आणि दुसरीकडे मनाची व्याकुळता अतिशय आर्तपणे व्यक्त करणारे उत्कट गीतही लिहिली.
रेहाना नावाची नटी, संगीतकार, सी.रामचंद्र आणि पी. एल. संतोषी या त्रिकुटाने चित्रपटसृष्टीत एकेकाळी धमाल उडवून दिली होती. ‘शहनाई’, ‘खिडकी’, सरगम’ हे या त्रिकुटाचे चित्रपट हाऊसफुल्लचा ठरले होते. पी. एल. संतोषीच्या ‘हम पंछी एक डालके’ या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते. पी.एल.संतोषींबरोबर सी. रामचंद्र यांचे टयुनिंग बराच काळ जमले होते. अनेक वेळा त्यांच्या संगीतातील बरीच गाणी पी.एल.संतोषी आणि राजेंद्र कृष्ण या दोनच गीतकारापैकी एकाची तरी आढळतात. मा.पी.एल.संतोषी यांचे निधन ७ सप्टेंबर १९७८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. श्री.पद्माकर पाठक
Leave a Reply