नवीन लेखन...

पाहारेदार

सातपुड्याच्या पायथ्याशी येळकोटवाडी नावाचं गाव व्हतं. साधारण दीड दोन हजार वस्तीचं गाव.. गाव तसं लहानच… गावाला खंडूबा प्रसन्न व्हता… गावात शिरताच म्होहर च खंडूबाचं देवुळ व्हतं …या खंडूबाच्या देवळाच्या रावळात एक माणूस बशेल असायचा… दिसा तो नसायचा पण रातीला तो तिथंच गवसायचा… त्याचं नाव पांडबा…

अंगात नेसायला धोतर आन कोपरी..डोईवर पागुटं…खांद्यावर घोंगडी..गळ्यात मुंजोबाचा टाईत..पायात वाळ्याचं कड… खिश्यात तंबाखूची पुडी..
जबड्यात म्होरचा एक दात किडका….दाट पिळदार मिश्या….वयानुसार व्हतं चाललेले ढवळे केस.. सावळं रुपडं… मोठाले डोळं…ऊन पावसानं रगड व्हयेल आशी जाड चमडी….अर्धी पन्नाशी ओलांडून साठी जवळ येयेल असा रांगडा गडी…आवाजात एक येगळीच जरब…हातामध्ये कवळ्या बांबूची काठी…काठीन एखाद्या जनावरा वरती घाव घातला तर जनावर निपचित आडवं व्हईल…बायको वारल्यापासून एकुलत्या एक पोराच्या संसारापासून दूर व्हयेल गडी…पाटलाच्या घरून दोन येळची भाकरी मिळलं त्यावर पोट भरणारं माणूस…

दिवसभर रानात पाटलाची गुरं चरायला न्यायची….अन रातीच्याला खंडोबाच्या देवळात वस्तीला राहायचं…..कोणाचं काही अडलं नीडल,त्याच्या मदतीला धावून जायाचा..रातच्याला उशिरा गावात कुण येतं, कुण जातं त्याच्यावर बारीक नजर ठूवणार…गावकऱ्यांसाठी आधार आन चोर दरोडेखोरांही वर वचक ठूवणारा…स्वतः कधी बाई बापडीकडं चुकूनही मान वर करून पाहणार नाय पण एखाद्या टवाळखोरानं वाडीतल्या बाई बापडीकडं वाईट नजरान पाहिल्यास त्याचा बराबर समाचार घेणारा…पांडबानं गावचे पन्नास एक पानकाळ पाहेल व्हते.. वाडीतली समदी मंडळी पांडबाला लय मानायची.. त्यापेक्षा वयानं मोठुले लोक पांडबा हाय मग काय भ्यावं नाय असं समजून बिनघोर ह्रायचे… आणि पांडबापेक्षा वयाने लहान पोरं कोणचीबी गोष्ट करायची असल तर पांडबाचं मत घेतल्याबगिर पुढं ढळत नव्हते…असा ह्यो पांडबा वाडीसाठी एक शिपाईच व्हता…

एक दिस गावात एक चोरी झाली. डाग दागिनं मुद्देमाल सकाळच्या येळी जागावर नव्हता. वाडीत एकच गलका झाला.सख्याच्या घरी चोरी झाली व्हती. सख्याची बायकु जोर जोरान हंबरठा फोडून रडत व्हती. सख्या आजूबाजूला सगळीकडं जावू जावू चौकशी करू ईचारीत व्हता. कोणी कोणाला पाहिलं का राती? कोण आलं व्हतं का? पण कुठं ठाव लागना. तेवढ्यात पोलीस पाटील आलं.ईचारपूस केली.. काय काय गेलं कधी गेलं? समद ईचारून झालं..सख्याची बायकु मातुर रडता रडत थांबत नव्हती. पोलीस पाटलांनं सांगितलं तालुक्याल जाऊन खबर द्या. सख्या तालुक्याला जाऊन खबर द्यायले निघाला. तेवढ्यात बाबुराव अन् शंकऱ्या असं दोन-चार जण म्हण अरे रातिच्याला पांडबा आपल्या गावाचं राखण करीतोय, त्यासणी माहीत असल…सगळं लोकं पांडबाकडं पोचलं. एकाचं येळी एव्हढं लोकं पाहून पांडबा जरा गोंधळलं. लोकयनी ईचारलं,” पांडबा, रात्री त्वा चोराला पाहिलं का? सख्याच्या घरी चोरी झाली”. पांडबा म्हणालं रातभर मी जागाच व्हतो. आठ दिसापासून खोकला येतुय, त्यानं डोळ्याला डोळा नीट लागत नाय. शिवाय काल रातभर कुत्र्यांयचा गलका चालू व्हता. त्यामुळं झोप आलीच नाय. परंतु एक चिटपाखरू ही गावात घुसलं नाय. तरीही दोन-चार जणायचा संशय पांडबावरच व्हता. त्यायनी पांडबालाच या चोरीसाठी जबाबदार धरलं. “तुझ्याइना दुसरं कोणीच नाय. त्वाच चोरी केली हाय”. लोकांयनी केलेला आरोप ऐकून पांडबा पुरता हाबकून ग्येला. आयुष्यभर ज्या गावाचं डोळ्यात तेल घालून राखण केलं त्येच गाव माझ्यावर उलटलं. समद ऐकुन पांडबा डोक्याला हात लावून एका ठिकाणी निपचित बसला. गावातली काही थोर मंडळी आली.त्यांयनी सांगितलं पांडबा त्यातला नाय. त्यो असं काही करणार नाय. तुमचा कायतरी गलत होतय. पण त्ये लोकं काय ऐकायला तयार नव्हत. तेवढ्यात सख्या तालुक्याहून पोलीस कंप्लेंट करून आल. संध्याकाळच्या येळी पोलीस आलं,त्यायनी सगळी चौकशी केली. त्यानीबी लोकायच्या आग्रहाखातर पांडबाची चौकशी केली. आपले जाब जबाब नोंदून पोलीस निघून गेलं. पांडबाचं मात्र सगळं चित हादरून गेलं. इमानदारी ज्याचा नसा नसा मदे भिणली व्हती त्या पांडबा वर आज चोरीचा आरोप करण्यात आला व्हता.एवढा धडधाकट गडी माणूस पण एकदम जाम होऊन गेला व्हता.पांडबा बी स्वतःलाच अपराधी समजू लागला व्हता. त्याचा स्वतःवरचा ईश्वास उडला व्हता.त्यो कोणाशी बोलत नव्हता. दोन घासही त्यासनी गिळवत नव्हते. “जोपोहुतर हा चोरीचा कलंक आपल्या माथ्यावरून जात नाही तोवर आपण अन्नाला शिवणारच नाय” अशी मनोमन प्रतिज्ञा त्यांनं केली व्हती. दिसामागून दिस जात व्हते.

आठवडा उलटून गेला व्हता. तालुक्यावरून पोलिसांची गाडी दुपारच्या येळी वाडीत परत आली. पोलिसायची गाडी पाहून सगळेजण तिच्या भोवती जमा झाले. पोलिसायनी बाबुराव विषयी चौकशी करायला सुरुवात केली. बाबुराव गावाच्या पल्याड एका टेकडीवरती जुनाट मरीआईच्या मंदिरापाशी दारू पीत बसेल ह्रायचा. त्याचा नेहमीचा तो अड्डा व्हता. पोलिसायनी त्याला तिथं जाऊन गावात आणला. दोन-चार पोलिसी खाके दिल्यावर त्यानं चोरीची कबुली दिली की,” सख्याकड चोरी म्याच केलीय”. बाब्या सख्याच्या बायकुचा भाऊ म्हणजी सख्याचा सालाच व्हता. आपले दारू पाणी खरीच पूरे करायसाठी त्यानं सख्याच्या डाग दागिन्यांवरती डल्ला मारला व्हता. काही दिवसापूर्वी त्याला रातीच्या येळी एक बकरू लांबवताना पांडबाना हटकलं होतं. त्याचाच राग डोक्यामंदी धरून त्यांनं पांडबाला अडवकण्यासाठी त्याचेवर चोरीचा आरोप लावून स्वतः एवढं मोठ कांड घडून आणल व्हत. आन बायकोचा भाऊच असल्यान सख्याच्या घरची समदी माहीती त्यास्नी व्हतीच आन म्हणूनच त्यान या चोरीला चांगला अंजाम दिला व्हता. तालुक्याला ज्या सोनाराला माल इकेल व्हता त्याला इका दुसऱ्या चोरीत पकडला व्हता. तवाच पोलिसायला ह्यो चोराचा ठाव लागला व्हता. पोलिसांनी समदा जबाब नोंदवून झाल्यावर त्याला बेड्या टाकल्या आणि गाडीत घालून तालुक्याच्या पोलीस स्टेशनाला घेवून गेले..

गावातील समदे लहान थोर देवळात पांडबाच्या जवळ गेलं.पांडबाला समदी हकीकत सांगितली. सगळं ऐकून पांडबाच्या डोळ्याईतून पाणी वाहू लागलं. ज्या गावासाठी आपण दिस-रात् रक्त आटीवलं त्या गावात आपल्याला लागेल कलंक पुसला गेला याचं खूप मोठं समाधान पांडबाच्या चेहऱ्यावर दिसत व्हत. समद्यानी पांडबाची समजूत काढून पांडबाला दोन घास चारले. असे हे पांडबा प्रत्येक गावात असतात. त्यांच्यामुळेच कित्येक गावे आणि वाड्या या सुरक्षित आहेत. त्यांना जपा. त्यांचे महत्व जाणा….

डॉ.सुनिल वाघ,
कांदिवली पश्चिम,मुंबई.
आम्ही साहित्यिक या फेसबुक समूहाचे सभासद….

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..