“छिपकलीयों का हुनर तो देखो,
बड़ी होशियारी से रात के अँधेरे में मोटे मोटे कीड़ो को हज़म कर लेती है,
और..
सुबह होते ही अपने गुनाहों को छिपाने के लिए किसी महापुरुष की तस्वीर के पीछे छिप जाती है..”
कधीतरी, कुठेतरी वाचलेलं किंवा कोणाकडून तरी ऐकलेलं हिन्दीतलं हे वचन सकाळीच आठवलं आणि नकळत त्या पालींची साम्य माणसाशी असल्याचं जाणवलं..फरक एकच अाहे पाल कितीही लहान अथवा मोठा किडा असो, तिच्या प्राणी धर्माला जागून, भुक लागल्याशिवाय त्याला गट्टम करत नाही तर मनुष्य मात्र भुक असो वा नसो, नजरेच्या पट्टयात आलेल्या सावजाला गट्टम केल्याशिवाय राहात नाही..
आणखी एक फरक पाल आणि माणसात आहे. पालीला दिवसा लपण्यासाठी पुरातन महादेवापासून ते आधुनिक महापुरूषांपर्यंत कोणाच्याही तसबीरी चालतात तर माणसाला मात्र आपापली पापं (भुक नसताना खाल्लेलं हे पापच असतं आपली संस्कृती सांगते.) लपवण्यासाठी वेगवेगळ्या महापुरूषांच्या तसबिरीच लागतात. कोणाला छत्रपती शिवाजी महाराज लागतात तर कुणाला संभाजी महाराज, कुणाला फुले, टिळक, आंबेडकर कुणाला शाहू महाराज लागतात. कुणाला समर्थ रामदास, ज्ञानेश्वर तर कुणाला रोहीदास, तुकाराम लागतात..त्या त्या महापुरूषांच्या तसबीरीचा एकदा का आधार घेतला की काय बिशाद आहे तुमच्यावर कोणी बोट रोखायची..ते बोट तुमच्यावर नसून तुम्ही ज्या प्रतिमेच्यामागे लपलायत त्या प्रतिमेवर आहे असं समजून तुमचं बोट मुळापासून उखडून टाकलं जाईल हे याद राखा..तसबीरीच्या मागे काही किडे भुकेसाठी खाऊन लपलेली पाल सापडली तर तिचा जीव घेतला जातो..माणूस सापडला तर मात्र त्या त्या महापुरूषाने समाजासाठी केलेल्या बलिदानाची याद करून दिली जाऊन पुन्हा एकदा त्यांना ‘समाजा’साठी बलीवेदीवर चढवलं जातं.
बरं, लहान-मोठे किडे-मकोडे खाऊन लहान-मोठ्या सद्यपुरूषांची खाऊन पोटं येवढी फुगलीत व त्याच्या प्रतिमा येवढ्या मोठ्या झाल्यात की लपण्यासाठी आताशा तीन फुट बाय दोन फुटच्या तसबीरी लहान पडू लागल्यात म्हणून तर आता भव्य पुतळे, स्मारकं इ.ची गरज भासू लागलीय (ती उभारतांना परत काही किडे-मकोडे गट्ट करता येतात हा भाग वेगळा.).
आपण कुठे चाललोय काहीच कळत नाही. ‘आदर्श’ असा ‘घोटाळा’ सोडला तर काहीच उरलेलं नाही. महापुरूषांचा आदर्श ठेवावा तर एक एक महापुरूष एका एका ‘इझम’शी जोडला गेला आहे. तो तो ‘इझम’ त्या त्या जातीशी जोडला गेलाय. एखादा महापुरूष व त्याचं तत्वज्ञान एखाद्याला आवडतं म्हटलं की लगेच तो एखादा उर्वरीतांचा ‘शत्रु’ होतो. दुसरं म्हणजे ‘इझम’ ही लपण्यासाठी व लपवण्यासाठी ढालंही झालेली आहे. ‘घोटाळे’ हाच ‘राजरोस’ आदर्श व ते लपवण्यासाठी घेतलेला महापुरूषांचा आधार चिंताजनक आहे..प्रत्येक गोष्टीचं झालेलं राजकीयीकरण याला कारणीभूत आहे असं मला वाटतं.
आपण जर लवकर, निर्धाराने आणि सारासार विचार करून यातून बाबेर पडलो नाही तर पुढच्या पिढीचं वैचारीक भवितव्य कठीण आहे..
– नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply