नवीन लेखन...

पान…

‘पान खायो सैंया हमार’ किंवा ‘खाईके पान बनारसवाला’ अशा गाण्यांची उत्पत्ती कशी झाली याचा अभ्यास करायचा असेल तर जुन्या काळात थोडेसे डोकावले पाहीजे. सतरंजी तक्क्याने सजलेली बैठक, मध्यभागी पितळेचा पानपुडा, अडकित्ता, चुना, कात, सुपारी, लवंग, विलायची, हे घराघरात हमखास दिसणारे चित्र. पितळेचा नक्षीदार अडकित्ता विशेष आकर्षण. घरी आलेला माणूस ओठ लाल करूनच गेला पाहिजे. एखादेवेळी चहा पाजला नाही तरी चालेल पण पान पाहीजे असा प्रघात होता.

हाताने पान लावून खाण्यात वेगळीच मजा होती. तांब्यातले पाणी पेल्यात घेऊन त्यातले काही थेंब चुन्याच्या डबीत टाकून काडीने चुना कालवायचा, दोन पानं घ्यायची, त्यांची देठे आणि खालचे टोक तोडायचे, मांडीवर घासून पुसलेली पानं सतरंजीवर ठेवायची, बोटाने चुना पानावर पसरवायचा, काताची वडी अडकित्त्याने कातरून त्यात टाकायची, मग अत्यंत सावधपणे आणि एकाग्रतेने सुपारी बारीक कातरून टाकायची, विलायची कचकन फोडून आतले दाणे टाकायचे अन छान घडी घालून ते पान तोंडात भरायचे.

पुरुष मंडळींना कैफासाठी झिंग आणणार्‍या तंबाखूची जोड असायची. पानपुड्यात चुन्याची एक चपट्या आकाराची स्टीलची डबी असायची. बाकी काही नसले तरी चालेल पण ही डबी घरात असलीच पाहिजे. एका बाजूला चुना आणि दुसर्‍या बाजूला किसान किंवा सूर्यछाप तंबाखू त्यात ठासून भरलेली असायची. बोटाने टिक टिक करून डबीतून तंबाखू तळव्यावर घ्यायची, अंगठ्याने चुना काढून त्यावर लावायचा, काडी कचरा बाजूला करत अंगठ्याने किंवा पहिल्या बोटाने मिश्रण घसघस मळायचे, तळव्यावर टाळी वाजवून भुगा उडवायचा. मनाचे समाधान होईपर्यंत ही क्रिया चालू ठेवायची. त्यानंतर मिश्रण हळूवार पानात सोडायचे किंवा तोंडात फक्की मारायची आणि टाळी वाजवून तळवा साफ करायचा. असे हे शाही पान तोंडात भरतांना स्वर्गसूख मिळाल्याचा भाव चेहर्‍यावर झळकलेला असायचा. किवाम आणि बाबा जर्दा पानपुड्यात असला तर त्यासारखे सुख दुसरे काय! पानावर बोटाने किवाम पसरवून त्यावर जर्दा भुरभुरला तर अजूनच मजा.
पान खाणे आणि खाऊ घालणे हे केवळ व्यसन नसून जवळीक साधण्याचे माध्यम होते. त्यामुळे गप्पा मारत पान लावण्याचे व खाण्याचे काम चालायचे. तोंडात रस जमू लागला की ओठ दाबून बोलले जायचे. समोरचा काय बोलला हे फक्त त्या मैफिलीतल्या इतर शौकीनांनाच कळायचे. ओघळ ओठाच्या कोपर्‍यातून बाहेर डोकावले तरी पिंक मारायची इच्छा होत नसे. बोलता येतच नसेल तर अंगणात पिंक मारली की झाले काम!
ही पिंक मारायचीही खास कला होती. दोन बोटे ओठांवर दाबून नेम लावून पिंक योग्य जागीच पाडली जायची. दोन तीन वेळेस पिंक मारून झाली की तोंडातला चोथा फेकून पेल्यातल्या पाण्याने खळखळ चूळ भरून धोतराच्या सोग्याने तोंड पुसून झाले की इति पान पुराण समात्प होत असे.

प्रत्येक घरात अशा लाल रंगाचा थरावर थर जमलेला जोत्याचा एखादा कोपरा असायचा. कितीही पाणी ओता, खराट्याने घासा, हा चिटकून बसलेला रंग निघता निघणार नाही. पुट्टी भरली तरी तो रंग बाहेर डोकावेल एवढा पक्का असायचा. ज्या घरात असा लाल कोपरा नसेल त्या घरात रौनक नाही असेच वाटायचे!

असा यथेच्छ पान खाण्याचा आनंद घेत मंडळी निघून गेली की बैठक सुनी होवून जायची. सतरंजीवर मागे राहिलेली पानाची देठे, सुपारीचा चुरा, तंबाखूची भुकटी ही वास्तुत किती राबता आहे हे दर्शवणारे प्रतीक असायचे. बैठक उठली की ढेळजात बसलेला गडी सतरंजी झटकून घ्यायचा. हळूच नजर लपवत पानपुड्यात हात घालून तंबाखूची मळी भरून फक्की मारून तृप्त मनाने घरी जायचा.
दुपारच्या वेळी ही बैठक बायकांनी गजबजलेली असायची. शेजारच्या पाजारच्या बायका जेवणे आटोपून गप्पा मारायला यायच्या. गावातल्या सर्व बातम्या चुन्याबरोबर पानावर पसरवल्या जायच्या. कात, सुपारी, बडीसोप पानावर टाकून गुंजपत्ता भिरभिरवला जायचा, विलायची अन् खोबर्‍याचा भरपूर कीस टाकलेल्या पानाची घडी घालून पान तोंडात टाकेपर्यंत गप्पांना उधान आलेले असायचे. हे पान तंबाखूरहीत असल्यामुळे तोंडात जमा झालेला रस ‘सुर्र’ करून आत ओढून गुटकन गिळून टाकला जायचा. तो आवाज ऐकूनच पान न खाणार्‍यांच्या तोंडाला पाणी सुटायचे.

अगदी लहानपणी, म्हणजे तीन चार वर्षाचा असतांना, आईच्या मांडीवर बसून तिच्या तोंडातले पान खायला आम्हाला खूप आवडायचे. ऊं उं करत आम्ही तिला सतत तो गोड चोथा खाऊ घालण्याचा हट्ट करायचो. ती जी चव होती ती महागातल्या महाग पानातही पुढे कधीच मिळाली नाही! एकेकाळी उमरग्याजवळ तुरोरी (कर्नाटक बॉर्डर) या गावी नागवेलीच्या पानाचे मळेच्या मळे होते. मुंबई पुण्यात तुरोरी पान म्हणून हे एकेकाळी प्रसिद्ध होते. लहानपणी कित्येकदा या पानमळ्यात जावून ताजे कोवळे पान आम्ही तोडून खाल्ले होते. पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे ही पानमळे आता संपुष्टात आली आहेत.

आता कलकत्ता, बनारस, मघई, कपुरी असे अनेक प्रकारचे पान मिळतात. वेगवेगळे पदार्थ वापरून त्यांची चव वाढली आहे. परंतु आजही पान खातांना जुन्या काळाची आठवण आल्याशिवाय रहात नाही…

नितीन म. कंधारकर
छ. संभाजीनगर.

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..