काळ्या डांबरी रस्त्यावर रिमझिम- रिमझिम पाऊस बरसत होता. थेंबा थेंबानं पाऊस रस्त्यावरच्या लहान मोठ्या खड्ड्यांमध्ये साठत होता.रस्ता चांगला धुवून निघाल्याने रस्त्या लगतच्या विजेच्या खांबांनी रस्ता आणखीच चमकत होता.पाऊस रस्त्यावरून वाहत होता. रस्त्याच्या चौकात उंच विजेचा खांब होता.त्या प्रकाशाच्या उजेडामध्ये रस्त्यावरती लोकं येत जात होती.रस्त्याच्या चौकात डाव्या बाजूच्या कडेला एक वडापावची हातगाडी होती. कढईत उकळी आलेल्या तेलात एकेएक समोसा सोडल्यावर तड-तड चर-चर आवाज वातावरणात रंजकता आणत होता. दोघं मध्यमवयीन पती-पत्नी एकमेकांच्या मदतीने गरमागरम पदार्थ तळात होते. पत्नी समोसे बांधून द्यायची व पती ते कढईतील उकळत्या तेलात तळत होता. दोन-दोन तीन-तीन लोकं त्या हातगाडीवर छत्री सावरीत येत. कढईतील समोसा कधी एकदा बाहेर निघतो नि कधी एकदा तो तोंडात जातो असा भाव त्या बहुतेकांच्या चेहऱ्यावर होता.कागदी प्लेटमध्ये चिमूटभर चटणी एक दोन हिरव्या मिरच्या देऊन त्यासोबत कुणी वडापाव खाई ,कोणी भजी खाई, तर कुणी समोसा खाई.
वातावरणात चांगलाच गारवा होता. अशा या पावसाळी गारव्यात तोंडात गरमागरम पदार्थ जाणे ही मोठी पर्वणी असावी. लोकं येत त्यांना जे जे हवं ते ते घेऊन जात. तर कुणी तिथेच उभे राहून खात असत.
रात्रीचे नऊ वाजून चालले होते. आता लोकांचं येणं-जाणं जरा मंदावत होतं. पंधरा-वीस मिनिटं हातगाडीवर कुणी आलं नाही. हातगाडी पासून थोड्या दूर अंतरावर अंदाजे पंधरा-वीस पावलांच्या अंतरावर एक रिक्षा टूर-टूर-टूर टूर करून येऊन थांबली होती. रिक्षा चालवणारी पुरुष व्यक्ती खाली उतरून रिक्षाला लावलेले पावसाळी पडदे बाजूला सरकवून मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीशी रिक्षा आत डोकं घालून काहीतरी कुजबूज करीत होती. त्यांची कुजबूज संपल्यावर ती व्यक्ती हळूहळू पावलांनी त्या वडापावच्या हातगाडीच्या दिशेने चालत आली. समोसे तळत असलेल्याच्या पत्नीला म्हणाला दोन समोसे द्या. त्या स्त्रीने कागदी प्लेटमध्ये दोन समोसे ठेवून बाजूला लाल चटणी दिली. वडे समोसे तळतांना त्याच्या अतिरिक्त चुऱ्याला कुस्करून थोडे तिखट-मीठ घालून ही विशेष चटणी तयार केलेली असते. समोसे घेणाऱ्या त्या रिक्षावाल्याला मात्र हिरव्या तळलेल्या मिरच्याच हव्या होत्या. आता जवळजवळ हातगाडी बंद करण्याची वेळ होत असल्याने त्याच्याकडच्या तळलेल्या मिरच्या संपल्या होत्या. परंतु त्या रिक्षावाल्यास मात्र हिरव्या मिरच्याच हव्या होत्या. त्याशिवाय तो समोसे घ्यायला तयार नव्हता.
इकडेतिकडे – आजूबाजूला त्याने पाहिल्यावर त्याला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक भाजीवाला दिसला. त्याच्याकडे जाऊन त्याने काही पैसे देऊन काही मिरच्या घेतल्या. त्या मिरच्या आपल्या ओंजळीत घेऊन त्या वड्यावाल्याला दिल्या. वडेवाल्याने त्या मिरच्या त्याच्या समोर गरम गरम तेल असलेल्या कढईत टाकल्या. चरचर- तडतड असा आवाज संपूर्ण वातावरण मोहकता आणत होता. वडेवाल्याने तळलेल्या मिरच्या त्याच्या समोसे असलेल्या कागदी प्लेटमध्ये झाऱ्यानेच टाकल्या. दोन्ही हातांच्या ओंजळीत तो समोसे घेऊन रिक्षाकडे गेला. रिक्षा आत डोकावून त्यांने हातातली समोस्यांची प्लेट रिक्षा आत असलेल्या व्यक्तीला दिली. नि काही कुजबूज सुरू झाली. मी हा सारा प्रसंग दूर उभा राहून पाहत होतो. कुणातरी मित्राचं बोलणं फोनवर चालू असल्याने मला समोसे घेण्याची घाई नव्हती.
रिक्षावाल्याचं झाल्यानंतर मी वडेवाल्याच्या गाडीवर गेलो नि समोसे घेऊन मी त्याच पावसाच्या रस्त्यावरून चालत जात असतांना सहज रिक्षाकडे पाहिलं त्या रिक्षाच्या मागच्या सीटवर एक स्त्री व्यक्ती होती. बहुतेक तिची प्रसूत वेळ जवळ आली असावी. परंतु दवाखान्यात प्रसूतीगृहात जाण्याआधी तिच्या शरीरात थोडी शक्ती असावी म्हणून तिचा पती तिला गरमागरम समोसे खाऊ घालत होता.
त्यांच्या कुजबुतीतून एक वाक्य स्पष्ट ऐकू आलं, “बारीश के दिनो में गरमागरम समोसे के साथ हरी मिरची का मजा तो कुछ और ही रेहता हैं”।
हा सारा प्रसंग पाहून कृतज्ञता भाव जागृत झाला नि हे लिहिणं माझ्याकडनं झालं.
— संतोष रामचंद्र जाधव (बोरशेती)
परिस्पर्श स्वप्नोत्सव,
शहापूर ठाणे
7507015488
Leave a Reply