नवीन लेखन...

पायपुसणं

त्या अत्याधुनिक, ऐसपैस पसरलेल्या, संपूर्णपणे वातानुकुलित डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या एका  कोपर्‍यात अनेकविध आकाराची व रंगांची  विलक्षण  आकर्षक  दिसणारी  डोअरमॅट्स  हारीने  मांडून  ठेवली  होती. ती नक्की पाय  पुसण्यासाठी होती की  ड्राॅईंग  रूममधे भिंतीवर  टांगण्यासाठी  तयार   केलेली ’ वॉल हँगींग्ज् ‘ होती  ह्या   विचाराने मी गोंधळलो.

काथ्यापासून  व मऊशार लोकरीपासून  तयार   केलेल्या, मध्यमवर्गीयांच्या अवाक्याबाहेरअसलेल्या  त्या महागड्या  तुकड्यांवर  पाऊल  ठेऊन  त्यांना  खराब  करण्याआधी  शंभरदा विचार करावा लागला असता.  ही  डोअरमॅट्स  खरेदी   करणारी  मंडळी  त्यांना  खरंच  दरवाज्यात  ठेवत  असतील  की त्यांच्या सौंदर्याने प्रभावित  होऊन  त्यांचं  कौतुकाने शो   केसमधे प्रदर्शन मांडत असतील? दैनंदिन जीवनातील एखादी वस्तू इतकी आकर्षक असू नये की तिला वापरण्याची इच्छाच होऊ   नये !

त्या  स्टोअर्समधे  फेरफटका  मारताना  माझ्या  एका मित्राच्या फ्लॅट मधील शो केस माझ्या डोळ्यासमोर तरळू लागली.  घरातल्या  लहान  मुलांच्या चिमुकल्या  बोटांचा थोडासाही  ठसा  न  उमटलेल्या  नव्या कोर्‍या व अत्यंत आकर्षक अशा खेळण्यांनी ती शो केस खच्चून भरली होती. केव्हाही त्याच्याकडे गेलं की एखाद्या नविन खेळण्याची भर त्यात पडलेली असे. कोणत्या देशातून कोणते  खेळणे आणले याचे रसभरीत  वर्णन  त्याच्या  तोंडून  ऐकत असताना  त्या खेळण्यांना हात लावण्यासाठी  आसुसलेल्या त्याच्या  लहान  मुलांचे  केविलवाणे  चेहरे  मला  विलक्षण अस्वस्थ करून सोडत. शो केसची शोभा वाढवण्यासाठी खेळणी लहानग्यांच्या हाती लागू न देणं हा केवढा अघोरीपणा ! खेळणी ही तोडण्यासाठीच असतात. लहान मुलांनी जर खेळणी तोडली नाहीत तर ती पुन्हा जोडण्यासाठी आवश्यक  असलेल्या कल्पकतेचा विकास होणार तरी कसा आणि केव्हा? निर्जीव वस्तुंचा अतिरेकी हव्यास व त्याबद्दलची  काळजी घराचं घरपण व माणसातलं माणूसपण  हिरावून घेत असतं याची जर वेळेतच जाणीव  झाली  तर  प्रत्येकाचं  आयुष्य  किती सुखासमाधानाने भरून जाईल नाही?   त्या डिपार्टमेंटल  स्टोअर्सच्या वातानुकुलित  वातावरणात  थोडंही  न  रमलेल्या माझ्या मनाने भूतकाळात केव्हा उडी       घेतली हे कळलंच नाही.

जेव्हा धान्याची रिकामी झालेली पोती अत्यंत बहुपयोगी होती व त्यांना ’पॅकिंग मटेरियल‘ ही पदवी प्राप्त झाली  नव्हती तो काळ.  हिवाळ्यातलं हवंहवंसं वाटणारं  अत्यंत सुखद ऊन अंगावर घेत अभ्यास करण्यासाठी पोत्यासारखं हुकमी आसन नव्हतं. शाईचे कितीही डाग पोत्यावर पडले तरी ’ओह, शिट्!‘ असा उद्गार  कोणाच्या तोंडून बाहेर पडत नसे.  शाईच्या  अख्ख्या  बाटलीने जरी लोटांगण घातले तरी तप्त  धरतीवर  पहिला  पाऊस पडल्यानंतर ज्या  वेगाने पाणी शोषल्या जातं त्या वेगाने ते कौतुकाचं पोतं शाई शोषून घेत  असे. पोत्यावर  पडलेले शाईचे  गडद  निळे  डाग  आकाराच्या बाबतीत कधी अमेरिकेकडे झुकत तर कधी रशियाकडे. काही  शिष्ठ डाग मात्र इंग्लंडशी जवळीक  साधत  आमच्यासारख्या  पामरांकडे    अत्यंत  तुच्छतेचा  कटाक्ष  टाकत !  धान्य  भरण्यासाठी, अचानक  अवतरणार्‍या  पाव्हण्यांना  दिसू  नये  असा घरातला     पसारा झाकण्यासाठी, सासरी  निघालेल्या  मुलीला प्रेमाने दिलेला आहेर भरण्यासाठी येवढेच  नव्हे तर  कुणाचा मृत्यू        झाल्यास राख सावडण्यासाठी अशी त्या  बहुगुणी पोत्यांची ’ पोतीच्या पोती उड्डाणे ‘ चालत ! पण  हेच  पोतं  जेव्हा           कुणाच्या दरवाज्यात पहुडलेलं असायचं तेव्हा ते अगदी वेगळ्या भूमिकेत शिरायचं !

शेतकर्‍यांच्या उत्कर्षासाठी कार्य करणार्‍या एका विश्वस्त संस्थेचा विश्वस्त या नात्याने ग्रामिण भागातील एका  गावात गेलो असताना शेणाने सारवलेल्या एका छोटयाशा घराच्या  दारात  पायपुसणं  नावाच्या  पोत्यान  माझं स्वागत केलं आणि मी विलक्षण सुखावलो. त्या पायपुसण्याची जवळीक दरवाज्यापेक्षा पायांशी अधिक होती म्हणूनच  त्याला ’डोअरमॅट ’म्हणणं संयुक्तिक ठरलं नसतं ! धान्याच्या रिकाम्या झालेल्या पोत्याची ती घडी म्हणजे साक्षात एक संस्कार वर्ग होता. सगळी  घाण  माझ्याजवळ  सोडून  घरकुलात  शिरताना  लक्ष्मीच्या पावलांनी प्रवेश करा   असं  प्रत्येक  वेळी  आवर्जून बजावणार्‍या त्या पायपुसण्याशी माझ्या बालपणीच्या  अनेक  आठवणी  निगडित झाल्या  होत्या. कडाक्याच्या थंडीत उबदार राहणार्‍या,कडक उन्हाळ्यात कधीही न तापणार्‍या आणि पावसाळ्यात पाय    चिखलाने कितीही  बरबटलेले असले तरी त्यांना अगदी  चाटूनपुसून  स्वच्छ  करणार्‍या   त्या   बहुगुणी स्वागताध्यक्षाची   तुलना  तारेच्या किंवा रबराच्या डोअरमॅट नामक आधुनिक अवताराशी करणं कदापी शक्य  झालं नसतं !   कधीकधी  असं  वाटायचं की या पायपुसण्याला जर जीव असता  तर  वेगवेगळ्या  पावलांच  दर्शन  घेताना आणि  त्यांच्या  स्वच्छतेची  काळजी वाहताना त्याची  काय प्रतिक्रिया झाली असती ? भेगा पडलेली  पावलं  पुसली जात   असताना  त्याने त्या  पावलांच्या  मालकाला  किंवा  मालकिणीला  एखाद्या  असरदार  क्रीमची  टी.व्ही. वरील जाहिरात गुणगुणून दाखवली असती  की  अनैतिक  संबंधांचं  रात्रंदिवस  ओंगळवाणं  प्रदर्शन  करणार्‍या सीरियल्स बघणार्‍या  किशोर-किशोरींना  ’पाय घसरू देऊ  नका‘  असा आपुलकीचा सल्ला दिला असता ?  एखाद्या   मुलीला’ पांढर्‍यापायाची’ असं हिणवून त्याने आपल्या अंधश्रद्धेचं  हिडीस प्रदर्शन  केलं असतं  की वह्यापुस्तकांचं  असह्य ओझं  पाठीवर   वागवत अनवाणी पायांनी रोज काही किलोमिटर पायपीट करणार्‍या गरीब विद्यार्थ्याच्या पोळलेल्या पावलांच्या स्पर्शाने  त्याचं ह्रदय  पिळवटून  गेलं असतं ?

त्या पायपुसण्याला जीव नव्हता म्हणूनच ते कोणत्याही पावलांची निरपेक्षपणे सेवा करत होतं. त्याला जीव असता तर  त्याने एखाद्या तरबेज राजकारण्यासारखी येणार्‍या-जाणार्‍यांची ’कॅलक्युलेटेड’ सेवा केली असती. सारवलेल्या घरकुलाच्या दरवाज्यात  बसून  त्याने आलीशान  बंगल्याची  स्वप्नं बघितली  असती आणि बंगल्यात पोहचताच  सारवलेल्या    भिंतींना   निर्दयतेने   लाथाडून   जमीनदोस्त   करण्यासही   मागेपुढे   बघितलं  नसतं ! कृतघ्नपणाची  परिसीमा  ओलांडणार्‍या  उलट्या  काळजाच्या  माणसांची  गर्दी  वाढत चाललेल्या आजच्या जगात एखाद्या  स्थितप्रज्ञासारखं वागणार्‍या  त्या पायपुसण्याच्या निर्जीवतेचा मला अगदी मनापासून हेवा वाटला !

कॉलेजमध्ये शिकत असताना होस्टेलमधील एका विद्यार्थ्याने त्याच्या घरातील एका स्त्रीला पायपुसण्याची उपमा  दिल्यामुळे माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती व त्याला मी  शिव्यांची  लाखोली वाहिली होती त्याप्रसंगाची आज मला प्रकर्षाने आठवण झाली. स्त्रियांची किंमत पायातल्या चपलेइतकीच  असते  व  त्यांना  एखाद्या पायपुसण्यापेक्षा  जास्त किंमत द्यायची नसते असले संस्कार  पुरुषप्रधान संस्कृतीचे तथाकथित रक्षक ज्या घरांमधे आपल्या  मुलांवर   करण्यात  धन्यता  मानतात  त्या  घरांमधील  कुलदीपक  वयाने  थोडे  मोठे  झाल्यानंतर  अत्यंत गलिच्छ  शिव्या  स्वतःच्या जन्मदात्यांना देण्यासही  कचरत  नाहीत .

एका वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी गेलो असताना तिथे भेटलेल्या एका पश्चात्तापदग्ध वृद्ध दांपत्याने  स्वतःचे अश्रू  आवरत मला सांगितलं ‘‘ मुलांवर  वेळेतच  जर  चांगले  संस्कार केले  असते  तर  त्यांनी  आम्हाला  वापरलेलं पायपुसणं   समजून रस्त्यावर फेकून दिलं नसतं !’’

— श्रीकांत  पोहनकर
98226 98100     

 

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..