चालत असता संथ गतीने, एका वाटेवरती
संगे माझ्या, माझी छाया, मागून येत होती
वेगामधली बघुनी तीव्रता, ती ही वाढावी वेग
खंड न पडता साथ देणे, हेच तिचे अंग
तळपत असता रवि आकाशी, जवळ ती आली
समरस होण्या माझ्यामध्ये, पायी घुटमळली
ढळू लागला सूर्य हळू हळू, पश्चिम दिशेला
प्रकाशातील तीव्रपणा तो कमी होऊ लागला
पडू लागले पावूल माझे मंद मंद आता
श्रमलो दमलो बसलो खाली, अंधार तो होता
दूर दूर ती जावू लागली, छाया मजला सोडूनी
काळोखाच्या गर्भामघ्ये, गेली ती विरुनी
एकटाच मी होतो तेथे, अंधाऱ्या रात्री
प्रकाश्यातली साथ लाभली, ती छाया नव्हती
सुखामधली सोबत सुटते, दु:खाच्या वेळी
सगेसोयरे साथ सोडती, पडत्या संकट काळी
पहाट होता बघू लागलो, पुनरपि छायेला
सोडून गेली रात्री, त्याचा निषेध नोदविला
छाया म्हणते:
रविकिरणांच्या संगे गेली, मीही त्यांच्या मागे
आठव देण्या रवि उदयाची, त्याला मी सांगे
तुझे नि माझे अतूट नाते, त्याच्या अस्तित्वाने
पुनरपि आले तव सहवासे, त्याचाच साक्षीने
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply