सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांचा जन्म ७ जु्लै १९६२ रोजी झाला.
ध्येयनिष्ठा, कलाप्रेम, अथक परिश्रम करण्याची वृत्ती, जिद्द, अभ्यासूपणा, नम्रता, सामाजिक जाणीव, आई-वडील-भावंडे आणि गुरू यांच्यावरील प्रेम, निष्ठा, आदर आणि कृतज्ञता इत्यादी गुणांनी माणूस घडतो; मोठा होतो. पद्मजा फेणाणी यांच्या मध्ये हे सारे गुण आहेत.
पद्मजा फेणाणी यांना पं. जसराज, पं. रामनारायण आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारखे दिग्गज गुरू लाभले; स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांकडून प्रोत्साहन लाभले. दुर्गा भागवत आणि ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचा स्नेह व मार्गदर्शन लाभले. पु. ल. देशपांडे व कवी कुसुमाग्रजांसारख्यांचे आशीर्वाद लाभले.
पद्मजा फेणाणी यांच्या योजनापूर्वक, अथक व अभ्यासू परिश्रमांमुळे त्यांचा लाभलेल्या यशाचा आलेख सातत्याने चढत चालला आहे. त्यांनी १९८० साली, एकाच वर्षी गायनाच्या पंचवीस स्पर्धांत भाग घेतला आणि सर्व स्पर्धांत प्रथम क्रमांक मिळवला. आकाशवाणी, केंद्राने तिला लता मंगेशकर, अमजद अली खान, बिस्मिल्ला खाँ, झाकीर हुसेन, पं. भीमसेन जोशी यांच्या मालिकेत बसवणारी ‘टॉप ग्रेड’ दिली होती.
मराठी चित्रपटातील शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांबाबतचा ‘मियाँ तानसेन पुरस्कार’ पद्मजाला १९८८ मध्ये मिळाला. त्याच वर्षी प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘भारत निर्माण’ हा पुरस्कार त्यांना लाभला होता. नोव्हेंबर २००० मध्ये ‘माणिक वर्मा’ पुरस्काराने पद्मजा फेणाणी यांना गौरवले गेले होते. २००१ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने पद्मजा फेणाणी यांना गौरवले.
पद्मजा फेणाणी यांचे शास्त्रीय गायनाचे गझल-भजने आणि भावगीतांचे कार्यक्रम भारतभर व परदेशांतही होतात. फेणाणी यांनी मराठी, बंगाली, हिंदी, गुजराथी, पंजाबी, उर्दू, कन्नड आणि कोकणी यांसारख्या विविध भारतीय भाषांतून गीत गायन केलेले आहे. भालचंद्र दातार निर्मित ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’, ‘रंग बावरा श्रावण’ आणि ‘घर नाचले नाचले’ या तीन आल्बममध्ये पद्मजाने कुसुमाग्रज, इंदिरा संत, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शंकर रामाणी, सुरेश भट, ग्रेस आणि शांता शेळके यांच्या श्रेष्ठ दर्जाच्या कवितांचे गायन अविस्मरणीय स्वरांत केले आहे. ‘भक्तिरंग’ म्हणून सादर होणा-या पद्मजाच्या जाहीर कार्यक्रमात मीरा, कबीर, तुलसी, नानक आणि रहीम इत्यादींच्या रचना त्या सादर करतात. ‘मंगलदीप’ या कार्यक्रमातून मराठी भावगीते, कविता आणि पार्श्वगायिका म्हणून त्य़ांनी गायलेली व त्यांची गाजलेली गाणी त्या गातात. ‘मेहफील ए गझल’ या कार्यक्रमातून नामवंत कवींच्या गझला आणि काही अन्य लोकप्रिय गझलाही त्या सादर करतात. त्या ‘परफेक्शनिस्ट’ आहेत. यमन, भैरवी, शुध्द सारंग, हंसध्वनी आणि रागेश्री यांसारख्या रागांवर त्यांचे विशेष प्रेम आहे. कवी शंकर वैद्य यांच्या शब्दांत सांगायचे तर ‘पद्मजास स्वच्छ पाण्यासारखा नितळ-प्रवाही आणि स्फटिकासारखा पारदर्शक’ स्वर लाभलेला आहे.
‘बहरलेल्या सावल्या’ ही शंकर रामाणींची कविता पद्मजा यांनी गायल्यानंतर कवी ग्रेस तिला म्हणाले होते, “निर्झरी पैंजणांचा आनंद तुम्ही आम्हाला दिलात! मला असे शब्द का सुचले नाहीत? तुम्ही गायलेली ही कविता कुणाची आहे हे तुम्ही मला मुळीच सांगू नका! अगदी ती शंकर रामाणींची असली तरी!”
‘निवडुंग’ चित्रपटातील ‘केंव्हा तरी पहाटे’ आणि ‘लव लव करी पात’ ही गाणी पं. हृदयनाथ मंगेशकरांनी पद्मजा यांच्या ऐन तारूण्यात गायला देऊन विश्वास प्रगट केला होता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. थिंक महाराष्ट्र /अशोक चिटणीस
Leave a Reply