माझ्या वडिलांनी मला पहिलीसाठी भावे प्राथमिक शाळेत घातले. तेव्हा माझ्या हातात पहिले पुस्तक आले ते ‘बालभारती’चे! त्यावरील दीनानाथ दलाल यांनी काढलेले ‘मुला-मुलीचे पुस्तक वाचताना’चे रंगीत चित्र माझ्या डोक्यात, फिट्ट बसले! त्या छोट्या पुस्तकाच्या आतीलही रंगीत चित्रे, दलालांचीच होती.. मोट चालवणारा शेतकरी.. झाडाखाली बसून भाजी-भाकरी खाणारा शेतकरी.. खेळणारी मुलं.. बाहुली हातात घेतलेली मुलगी.. इथंच माझ्या मनावर त्यांच्या, अप्रतिम चित्रशैलीचा पगडा बसला..
पहिली ते पाचवी पर्यंत त्यांचीच ‘बालभारती’ची चित्रमय पुस्तकं हाताळत, मोठा झालो.. नंतर त्यांच्या चित्रांविषयी आकर्षण वाढल्याने रस्त्यावरील विक्रेत्यांकडून जुनी मासिकं, रद्दीच्या दुकानांतून ‘दीपावली’ मासिकांची, दिवाळी अंकांची खरेदी मी खाऊच्या पैशांतून करु लागलो..
हळूहळू संग्रह वाढत गेला. त्या मासिकांच्या, दिवाळी अंकांच्या वाचनाने माझ्या ज्ञानात भर पडत राहिली. दीनानाथ दलाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराचं काढलेलं भव्य चित्र, प्रत्यक्ष पहाण्याचं भाग्य मला लाभलं!
दलाल गेल्यानंतर, पुण्यातील गोखले हाॅल येथे भरलेलं त्यांच्या मूळ चित्रांचं प्रदर्शन मी पाहिलं.. शिवाजी पार्क येथील कलादालनात व दलालभक्त अनिल उपळेकर यांनी पुण्यात चार वेळा आयोजित केलेली त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं पाहिली..
३० मे १९१६ रोजी दीनानाथ दलाल यांचा जन्म, गोव्यातील मडगाव येथे झाला. १९४४ साली दलाल आर्ट स्टुडिओची स्थापना करुन ‘दीपावली’ या वार्षिक अंकाचा प्रारंभ केला.. दलाल यांना साहित्याची आवड होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात अनेक नामवंत लेखकांची मांदियाळी होती. दीपावली वार्षिक अंकाचे नंतर त्यांनी मासिक सुरु केले.
दीनानाथ दलाल यांची चित्रे ही हिंदुस्थानी मातीशी नाते सांगणारी होती. भारतीय पारंपरिक चित्रशैलीचे संस्कार त्यांच्या चित्रांत दिसून येतात.. तीन दशकांच्या त्यांच्या चित्रसाधनेने असंख्य प्रकाशकांची, हजारो पुस्तके सजलेली आहेत. आपल्या कामाचा व्याप सांभाळून त्यांनी स्वतःच्या आनंदासाठीही चित्रे काढली.. त्याबद्दल त्यांना, तेरा वेळा बाॅम्बे आर्ट सोसायटीची पारितोषिके मिळालेली आहेत.. असे हे थोर चित्रकार, वयाच्या अवघ्या चोपन्नाव्या वर्षी आपल्यातून निघून गेले..
आमची पिढी दलालांची चित्रं, मुखपृष्ठं, मासिकं, दिवाळी अंक, कॅलेंडरं पहात मोठी झाली.. आताच्या पिढीला त्यांच्याविषयी माहिती असण्याची शक्यता फार कमी आहे.. कारण सध्या ‘वास्तवकलेचं’ महत्त्व राहिलेलं नाही. तशी चित्रं काढणाऱ्या चित्रकारांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच शिल्लक राहिलेली आहे..
कलामहाविद्यालयातील प्राध्यापकही दीनानाथ दलालांचा उल्लेख विद्यार्थ्यांपुढे करायला कचरतात.. एखाद्या मोठ्या चित्रकाराविषयी बोलायला, मनही मोठं असावं लागतं.. दलाल आर्ट स्टुडिओमध्ये अनेक मान्यवर चित्रकारांनी उमेदवारी केलेली आहे, त्यांनीही ‘मी दलाल यांचेकडे कलासाधना केली’ हे कधीही अभिमानाने सांगितले नाही..
दीनानाथ दलाल यांचं आयुष्य, देवानं अजून वीस पंचवीस वर्षांनी वाढवून दिलं असतं तर ‘दीपावली वार्षिका’चा सुवर्णमहोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला असता.. पण तसं होणार नव्हतं.. जणू देवांनाही माणसांबद्दल असूया वाटली असावी की, देवादिकांची इतकी सुंदर चित्रे काढणारा चित्रकार आपल्या स्वर्गात कां नसावा? त्याला आपण स्वर्गीय चित्रकार म्हणून पद देऊ व आपणा सर्वांची चित्रमालिका त्यांच्याकडून काढून घेऊ..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३०-५-२२.
Leave a Reply