संत एकनाथ महाराजांचे जनार्दन स्वामी हे गुरू. अगदी लहानपणापासून एकनाथ जनार्दन स्वामींच्या आश्रमात राहत होते. गुरूंनी सांगितलेले कोणतेही काम ते अतिशय आवडीने, तातडीने आणि लक्ष देऊन करीत असत. त्यामुळे त्यांना दिलेले कोणतेही काम अगदी बिनबोभाट आणि व्यवस्थित होत होते. एकनाथांचे हे कामावरील प्रेम पाहून जनार्दन स्वामींनी त्यांना आश्रमातील आर्थिक व्यवहाराचा
हिशोब ठेवण्याचे काम दिले होते. एकनाथ महाराज न चुकता रोजच्या रोज आर्थिक हिशोब लिहून ठेवत असत. जेणे करून हा हिशोब केव्हाही उपयोगी पडत असे.
एके दिवशी मात्र एकनाथ असाच खर्चाचा सर्व हिशोब ठेवत असताना त्यांना एक पै ची चूक आढळून आली. त्यांनी पुनः पुन्हा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार केला तरी एका पैचा हिशोब काही केल्या लागेना. त्यामुळे एकनाथ अतिशय अस्वस्थ झाले. त्यांचे कशातच लक्ष लागेना. त्यांनी त्या दिवशी भोजनही केले नाही. त्या ‘पै’ची चूक शोधण्यासाठी त्यांचा हिशोब चालूच होता. रात्र उलटून गेली तरी त्यांचा हा हिशोब काही लागेना.
आश्रमात सर्वत्र निजानीज झाली तरी एकनाथ एकटेच एका कोपऱ्यात बसून तो हिशोब पूर्ण करीत होते. रात्री जनार्दन स्वामींना जाग आली. पाहतात तर एकनाथ एकटेच बसून काहीतरी लिहीत आहेत. त्यांनी चौकशी केली तेव्हा एका पैचा हिशोब लागत नसल्याचे एकनाथानी सांगितले.
तेव्हा जनार्दन स्वामी त्यांना म्हणाले ‘ अरे, एका पै ची किंमत ती काय? जाऊ दे ना हिशोब लागत नसेल तर तिचा नाद सोडून दे. ‘ परंतु एकनाथांनी त्यांचेही ऐकले नाही. ते रात्रभर पुनः पुन्हा हिशोब करीत होते. शेवटी त्यांना एका पै ची चूक उमगली. तोपर्यंत सकाळ उजाडली होती. एकनाथांनी धावत जाऊन आपल्या गुरूंना पै ची चूक सापडल्याचे सांगितले, तेव्हा जनार्दन स्वामींनी त्यांना जवळ घेऊन त्यांच्या अचूक काम होण्यासाठी केलेल्या धडपडीचे कौतुक केले.
Leave a Reply