नवीन लेखन...

पैज

अंतोन चेखॉव्हच्या The Bet या कथेचे मुक्त मुक्त रूपांतर

अंधारी रात्र, थंडी पडली होती. पंधरा वर्षांपूर्वी अशाच एका हिवाळी रात्री आपण दिलेल्या पार्टीची आठवण करत राष्ट्रियीकृत बँकेचा सीनियर मॅनेजर धनानंद शतपावलीच्या येरझाऱ्या घालत होता. बुध्दिमान म्हणून गणले जाणारे बरेच मित्र होते त्या पार्टीत. गप्पागोष्टी, चर्चा होत होत्या त्याही गंमतीदार, लालित्यपूर्ण अशा. मृत्युदंड असावा की नसावा हा एक अहमहमिकेच्या वादविवादाचा विषय होता. बहुसंख्य लोक, ज्यात पत्रकार, बुध्दिवादी विचारवंतांचा समावेश होता, मृत्युदंड रद्द व्हायला हवा या मताचे होते. त्यांच्या मते ही शिक्षा कालबाह्य, अयोग्य, आणि धर्माविरुध्द होती. काही थोडे लोक ‘मृत्युदंडाऐवजी जन्मठेप हीच फक्त मोठ्यात मोठी शिक्षा असावी जगभर’ या मताचे होते. “मला नाही तसं वाटत.” धनानंद म्हणाला. “मी जन्मठेप भोगलेली नाही नि मृत्युदंडही नाही. हसू नका, पण विचार करायचा झाला तर मला तरी मृत्युदंड हा जन्मठेपेपेक्षा जास्त दयाळू, योग्य आणि माणुसकीला धरून असलेला वाटतो. मृत्यू देणं म्हणजे माणसाला एकदाच आणि क्षणात मारणं. पण जन्मठेपेच्या शिक्षेत आपण माणसाला क्षणाक्षणाने, कणाकणाने, परत परत मारतो. मित्रानो, तुम्हीच विचार करा. यातनांची जाणीवही होऊ न देता क्षणार्धात मारणं दयाळूपणाचं? की त्याला वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत ठेवून त्याची जगण्याची उमेदच मारून टाकणं हे?”

“दोन्ही अयोग्यच आहेत,” दुसरा एकजण म्हणाला. “दोन्हींचा उद्देश एकच असतो, जीव घेणं. पण राज्य किंवा न्यायसंस्था म्हणजे परमेश्वर नाही. कुणाचाही जीव घ्यायचा त्याना काहीही अधिकार नाही.”

उपस्थितांमध्ये एक वकीलपेशाचा माणूस होता. विद्याधर नाव त्याचं. तरुण, पंचविशीतला. तो ‘तुला काय वाटतं?’ असं विचारल्यावर म्हणाला:

“मृत्यदंड काय नि जन्मठेप काय, दोन्ही अयोग्यच. पण मला जर त्यापैकी एक निवडायला सांगितलं तर मी जन्मठेप स्वीकारेन. जिवंत नसण्यापेक्षा, आयुष्य कसंही का होईना, जगत राहणं हेच माझ्या मते श्रेयस्कर असेल.”

बरीच उलटसुलट चर्चा झाली. धनानंद आपल्या मतावर ठाम होता आणि विद्याधरही. अचानक धनानंदाचा पारा चढला. टेबलावर हात आपटून त्यानं विद्याधरला आव्हानच दिलं, “काही अर्थ नाही तुझ्या या बोलण्याला. अरे, मी पैज लावतो, एकांतवासात, एका कोठडीत बंदिस्त होऊन तू पाच वर्षं काढून दाखवलीस तर मी २ लाख… नाही, नाही, ५ लाख रुपये तुला देईन. घेतोस आव्हान?”

“तुम्ही हमीपूर्वक बोलत असाल तर स्वीकारलं. हे आव्हान मी आत्ता इथल्या इथे स्वीकारलं. आणि हो, फक्त पाचच नाही तर पुरी पंधरा वर्षं रहायला तयार आहे मी एकटा, एका खोलीत बंदिस्त.”

“पंधरा? बघ हं, या सगळ्यांच्या साक्षीनं मी पैज लावतोय आता,” धनानंद गरजला. “ऐका, सगळे ऐका, पंधरा वर्षांनंतर हा विद्याधर बंदिस्त कोठडीतल्या एकांतवासातून बाहेर येईल तेव्हा मी धनानंद त्याला ५ लाख रुपये देईन. नगद पाच लाख !”

“लागली पैज. तुम्ही तुमचे पाच लाख पैजेला लावलेत तसं मी माझं स्वातंत्र्य पैजेला लावतो.” विद्याधरानं आव्हान स्वीकारलं. आणि या विलक्षण, तारतम्य नसलेल्या पैजेला सुरुवात झाली. गडगंज श्रीमंत, जितका थिल्लर तितकाच उतावळ्या स्वभावाचा, अविचारी असलेला धनानंद या पैजेने स्वत:वरच खूप खूष झाला. जेवणाच्या टेबलावर विद्याधराची करता येईल तितकी टिंगल टवाळी करत म्हणाला:

“अजून वेळ आहे, नीट विचार कर. पाच लाख मला जास्त नाहीत. हरलो तरी मला काही कमी पडणार नाही. पण तुझ्या आयुष्यातली तारुण्याची तीन चार वर्षं मात्र तू गमावशील. तीन चारच का म्हणतोय मी? कारण त्यापेक्षा जास्त काळ एकाकी अवस्थेत, लहानशा कोठडीत तू काढू शकणारच नाहीस. स्वेच्छेनं पत्करलेला खडतर एकांतवास सक्तीनं भोगायला लावलेल्या एकांतवासापेक्षा जास्त जीवघेणा असतो. आतल्या आत घुसमटत जगत असताना बाहेर निघायला हवं या विचारानं तुझं मन सतावलं जाईल आणि मग त्याची जी ओढाताण होईल तिनं तुझं उरलेलं आयुष्यही तुला खात राहील. कींव येते मला तुझी.”

****

आणि आज, आत्ता, शतपावली करताना धनानंदाला ते सारं आठवत होतं. आपल्याच मनाला विचारात होता, “कशासाठी तो पैजेचा उपद्व्याप केला होता आपण? विद्याधराच्या आयुष्याची पंधरा वर्षं वाया जाण्यानं आणि मी पाच लाख रुपये उधळल्यानं असं काय साध्य होणार होतं? मृत्युदंड जन्मठेपेपेक्षा चांगला आहे की वाईट आहे हे सिद्ध होणार होतं? नाही. नक्कीच नाही. निव्वळ भंपकपणा होता आपला तो. माझ्यासाठी तो एका लाडावलेल्या पैसेवाल्याचा हट्ट होता तर त्याच्यासाठी केवळ पैशांची हाव….”

मग धनानंदाला पार्टीच्या दिवशीची संध्याकाळ आठवली. त्याच्याच मळ्यातल्या आउटहाउसमध्ये सगळ्या सोयी आतच असलेल्या एका खोलीत विद्याधराला ठेवून खोली बाहेरून कुलुपबंद करण्यात आली. खोलीवर नजर ठेवण्यासाठी एक वॉचमनही नेमला गेला. पंधरा वर्षात त्याला बाहेरचा कुणी माणूस दिसणार नाही की माणसाचा आवाज ऐकू येणार नाही असा बंदोबस्त करण्यात आला. खोलीच्या दाराजवळ, जमिनीच्या पातळीवर एक छोटी झडप बनवली गेली जी फक्त बाहेरून उघडता यायची. तिच्यातून विद्याधराला वाचन करण्यासाठी हवी असतील तितकी पुस्तकं, लेखन करण्यासाठी कागद आणि पेन्स, बासरीसारखी वाद्यं, जेवण, प्यायला पाणी वगैरे गोष्टी पुरवल्या जायच्या. हव्या असलेल्या गोष्टींची यादी करून त्यानं ती न बोलता त्या झडपेतून सरकवायची आणि पहारेकऱ्यानेही दुसऱ्या दिवशी त्या वस्तू न बोलता आत सरकवायच्या. पैजेतल्या अटी अगदी स्पष्टपणे लिहून ठेवण्यात आल्या. १४ नोव्हेंबर १८७० च्या रात्री १२ वाजता सुरु झालेली विद्याधरची बंदिवासाची मुदत १४ नोव्हेंबर १८८५ च्या रात्री १२ वाजता संपायची होती. या वेळेच्या पूर्वी अगदी दोन मिनिटे जरी तो बाहेर आला तर धनानंद ५ लाख रुपये द्यायचं नाकारू शकणार होता.

बंदिवासाच्या पहिल्या वर्षात विद्याधरला एकाकीपणा जाणवत राहिला आणि त्यामुळं त्याचं मनोबलही घसरायला लागलं. दिवस रात्र तो वाजवत असलेल्या बासरीचे सूर खोलीतून ऐकू यायला लागले. वाईन, सिगारेट यापैकी काहीही त्यानं मागवलं नाही. एकदा एका चिठ्ठीत त्यानं लिहिलं होतं, ‘वाईन पिण्यामुळं मनात लालसा निर्माण होते आणि बंदिवासातल्या कैद्याच्या मनात अशी लालसा उत्पन्न होणं बरं नाही. शिवाय वाईन पिताना सोबत मिळायला लागते. वाईन प्यायची पण कोणीच साथीला नसेल तर काय उपयोग? आणि सिगारेटच्या धुरानं छोट्याश्या खोलीतली हवा प्रदूषित होणार. त्यापेक्षा वाईन आणि सिगारेट या दोन्हीपासून दूरच राहिलेलं बरं.’ त्या वर्षात त्यानं हलक्या फुलक्या विषयांवरली पुस्तकं, कादंबऱ्या, प्रेमकथा, रोमांचक कथा असलेली पुस्तकं मागवली.

दुसऱ्या वर्षात विद्याधरचं बासरीवादन थांबलं आणि त्यानं फक्त अभिजात स्वरूपाचं लेखन असलेली पुस्तकं मागवायला सुरुवात केली. पाचव्या वर्षी त्यानं पहिल्यांदा वाईन मागवली. ज्यांनी कोणी त्या वर्षी झडपेतून आत डोकावून पाहिलं त्यांनी त्यांनी हेच सांगितलं की विद्याधर वर्षभर फक्त खाणं, पिणं, कॉटवर पडून जांभया देत स्वत:शीच उद्वेगानं बोलणं या पलिकडं काही करत नसे. वाचनही नाही. रात्री टेबलाशी बसून तासनतास लिहीत असायचा आणि सकाळी ते सगळे कागद फाडायचा. बऱ्याचदा त्याच्या रडण्याचा आवाजही ऐकू यायचा.

सहाव्या वर्षाच्या मध्यावर विद्याधरानं इतिहास, तत्वज्ञान, आणि वेगवेगळ्या भाषा पुस्तके वाचून शिकायला सुरुवात केली. परिस्थितीशी जुळते घेऊन त्यानं जोमानं या साऱ्याचा पाठपुरावा केला. इतका की पुस्तकांच्या त्याच्या मागण्या पुरवता पुरवता धनानंदाची पुरेवाट झाली. सहा ते दहा वर्षे या काळात विद्याधराने सहाशेच्या वर मोठमोठे ग्रंथ मागवून वाचले. याच काळात त्यानं धनानंदाला पत्र लिहिलं:

“प्रिय तुरुंगाधिपती,
हे पत्र मी तुम्हाला सहा भाषांमध्ये लिहून पाठवत आहे. त्या भाषांच्या तज्ञांना तुम्ही हे पत्र वाचायला द्या. त्यांना जर या मजकुरात एकही चूक आढळली नाही तर माझ्या खोलीच्या खिडकीजवळ मोठ्ठयाने आवाज करणारा एक फटाका पेटवा. तो आवाज ऐकून मला खात्री पटेल की माझे अध्ययन वाया गेलेले नाही. वेगवेगळ्या वयाचे आणि वेगवेगळ्या देशांत राहणारे तज्ञ भाषा वेगवेगळ्या बोलत असतील, पण तरीही सगळ्यांच्या अंतरात्म्यात तेवणारी ज्ञानज्योत एकच असते. अरे हो, पण तीच ज्योत माझ्याही आत्म्याला कसा स्वर्गीय आनंद देते ते तुम्हाला कोठून कळणार म्हणा !
तुमचा कैदी,
विद्याधर”

धनानंदानं विद्याधराची इच्छा पूर्ण केली. त्यानं एक नाही, दोन फटाके वाजवले.

दहाव्या वर्षानंतर विद्याधर टेबलाशी अगदी निश्चल बसून तन्मयतेने भगवद्गीतेचे अध्ययन करताना दिसला. धनानंदाला आश्चर्य वाटलं. ज्यानं गेल्या चार वर्षात सहाशे मोठ्ठाले विद्वत्तापूर्ण ग्रंथ वाचून काढले तो या छोट्याश्या पुस्तकात इतक्या गंभीरपणे काय शोधतो आहे? गीतेनंतर वेदांत आणि सर्व धर्मांचा इतिहास या पुस्तकांची पाळी आली.

अखेरच्या दोन वर्षात विद्याधरचा एकांतवास प्रचंड पण विविधतापूर्ण वाचन करण्यात गेला. कधी तो आण्विक संशोधनावर पुस्तकं मागवायचा तर कधी शेक्सपीयर, महाकवी कालिदास, ज्ञानेश्वर, बायरन, जर्मन महाकवी गटे इत्यादींची. एकाच वेळी केमिस्ट्री, मेडिसिन, आयुर्वेद, मध्येच एखादी कादंबरी, सॉक्रेटीस, अरिस्टॉटल, कौटिल्यीय अर्थशास्त्र, तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान अशा पुस्तकांची मागणीही नोंदवायचा. त्याचं असं अफाट वाचन म्हणजे महासागरात जीव वाचवण्यासाठी एखादा माणूस त्याच्याच फुटलेल्या बोटीच्या असंख्य फळकुटांपैकी एकदा एक धरेल तर नंतर दुसरेच अशा स्वरूपाचं होत होतं.

*****

धनानंदाच्या डोळ्यांसमोरून पंधरा वर्षांमधल्या या सगळ्या घटनांचा चित्रपट सरकून गेला. त्याच्या मनात विचार आला:

“उद्या रात्री १२ वाजतां विद्याधर बंदिवासातून मुक्त होईल. आमच्यातल्या करारानुसार मला त्याला पाच लाख रुपये द्यावे लागतील. पण आज माझी परिस्थिती अशी आहे की हे पाच लाख गेले की माझ्याजवळ काहीही उरणार नाही. अन्नान्नदशा होऊन जाईल माझी.”

पंधरा वर्षांपूर्वी कोट्याधीश असलेल्या धनांनदाच्या खिजगणतीतही नसायची दहा पाच लाखांची रक्कम. पण आज बहुधा त्याच्या डोक्यावर असलेलं कर्ज त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त असावं. सट्टा, जुगार, फसलेल्या गुंतवणुकी, ऐषोआराम आणि भंपकपणापोटी केलेली उधळपट्टी यांमुळं धनानंदच्या वैभवाला उतरती कळा लागली होती. एके काळचा बेदरकार, कमालीचा आत्मविश्वास असलेला सिनियर बँक मॅनेजर धनानंद आज छोट्या छोट्या गुंतवणुकीत होणाऱ्या अगदी नगण्य उतार चढावामुळेही घाबरून जाणारा, काडीचाही आत्मविश्वास नसलेला माणूस राहिला होता. “कसली पैज ! माझं वाटोळं करून टाकणार आहे ती,” डोक्यावरचे केस दोन्ही हातांच्या पंजांत धरून ओढत निराशेने तो स्वत:लाच दोष द्यायला लागला. “तो विद्याधर! मेला का नाही अजून? जेमतेम चाळीस वर्षांचा असेल आज. माझ्याजवळची उरलीसुरली सारी संपत्ती, माझे पाच लाख घेऊन आता तो लग्न करेल, आरामात पुढचं आयुष्य कंठेल. मनसोक्त खर्च करेल आणि मी? एखाद्या भिकाऱ्यासारखा असूयेनं त्याच्याकडं नुसता बघत राहीन, रोज त्याच्याकडून कुत्सित उद्गार ऐकत राहीन, ‘धनांनदजी, तुमच्या कृपेनंच मला आज ही सुबत्ता मिळाली आहे. हे मी विसरू शकत नाही. आज तुम्हाला मदतीची गरज आहे, करू द्या मला मदत.’ नाही, हे होता कामा नये. मग? काही इलाज आहे त्यावर? हो, आहे, दिवाळखोरी आणि त्यापायी होणारी बेइज्जत यातून मला वाचायचं असेल तर त्या माणसानं मरायला हवं ! पैजेची मुदत पूर्ण व्हायच्या आधी !”

*****

रात्रीचे आठ वाजले. धनानंदानं कानोसा घेतला. घरातले सगळे झोपले होते. बागेत गारठलेल्या झाडांची पानं सळसळत होती. त्या सळसळीशिवाय दुसरा कसलाच आवाज येत नव्हता. आपल्याही पावलांचा आवाज येणार नाही याची काळजी घेत धनानंद उठून आतल्या खोलीत गेला. तिथली भरभक्कम अग्निरोधक तिजोरी उघडून त्यानं विद्याधराला बंद केलेल्या खोलीची किल्ली काढून घेतली. गेल्या पंधरा वर्षात कधीही ती किल्ली तिजोरीबाहेर निघाली नव्हती. अंगात जाकीट चढवलं आणि तो घराबाहेर पडला.

बागेत अंधार आणि कमालीचा गारठा होता. पाउस पडून गेला होता नुकताच. हुडहुडी भरवत वाहणारा बोचरा वारा झाडांच्या फांद्यांना हालण्यातून उसंत मिळू देत नव्हता. धनानंदानं डोळे ताणून बघितलं. पण गडद अंधारात त्याला बागेत ना फुलझांडाचे आकार दिसत होते ना पायाखालची वाट. आउटहाउस जवळ पोचला आणि त्यानं वॉचमनला हाक मारली, दोन तीनदा. पण काहीच प्रतिसाद आला नाही. बहुधा कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी तो घरात स्टोअररूममध्ये जाऊन गुडुप झोपला असावा.

“माझ्या मनात आत्ता जे आहे ते खरंच अंमलात आणलं तर पहिला संशय वॉचमनवर जाईल.” धनानंदाच्या मनात विचार चमकून गेला.

अंधारातच तो आउटहाउसच्या पायऱ्या चढून आत गेला. खिशातल्या मॅचबॉक्समधून एक काडी पेटवली. तिच्या उजेडात त्याला वॉचमनची कॉट दिसली. तिच्यावर अंथरूण पांघरूण काहीच नव्हतं. कैद्याच्या खोलीत जायच्या दारावरल्या कुलपावर पंधरा वर्षांपूर्वी केलेलं सील जसंच्या तसं होतं.

काडी विझली. धनानंदानं झडप उघडून आत डोकावलं. एक मेणबत्ती मंदपणे तेवत होती टेबलावर आणि विद्याधर टेबलाशी बसलेला होता. पाठमोरा होता. त्यामुळं त्याच्या डोक्यावरचे लांब अस्ताव्यस्त केस आणि टेबलावर कोपर टेकवून ठेवलेले हात एवढंच दिसत होतं. एकदोन उघडी पुस्तकंही होती टेबलावर आणि जवळच्या आरामखुर्चीतही, खाली जमिनीवरही पुस्तकंच पुस्तकं होती.

पाच मिनिटं झाली. विद्याधर हललाही नाही. पंधरा वर्षांचा एकांतवास निश्चल कसं बसायचं ते त्याच्या मनावर ठामपणे बिंबवून गेला होता. झडपेच्या झालेल्या आवाजानंदेखील त्यानं काहीच हालचाल केली नाही. धनानंदानं थरथरत्या हातानं कुलपावरचं सील तोडलं, किल्ली सरकवली आणि कुलूप उघडलं. गंजलेल्या बिजागऱ्यानी कुरकुर केली पण दार उघडलं. धनानंदाला वाटलं विद्याधर आश्चर्यचकित होऊन जोरात ओरडेल पण तसं काहीच झालं नाही. तीन मिनिटं झाली तरी खोलीत आधी जी शांतता होती ती तशीच राहिली. धनानंद आत गेला.

टेबलाशी बसलेल्या विद्याधरची काहीच हालचाल होत नव्हती. तो म्हणजे केवळ एक आकार होता. अस्थींच्या सांगाड्यावर चढवलेली कातडीची खोळ होती. बायकांच्या सारखे लांब केस, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी आणि मिशा, केसांच्या जटांमधल्या अगणित पांढऱ्या रेघा, डोळ्यांच्या आणि गालांच्या खोबणी, दोन हातांच्या काड्यांवर टेकवलेला पिवळा निस्तेज चेहरा… भयानक होतं ते दृश्य. ही व्यक्ति फक्त चाळीस वर्षांची आहे यावर कुणाचाही विश्वास बसला नसता. टेबलावर टेकलेल्या दोन्ही कोपरांच्या मध्ये एक कागद होता. काहीतरी लिहिलेलं होतं त्यावर.

“बिच्चारा!” धनानंदाच्या मनात विचार आला. “झोपलाय. कदाचित उद्या मिळणाऱ्या पाच लाखांची स्वप्न बघत असेल. पण मी याला उचलून बिछान्यावर ठेवून आणि उशी तोंडावर दाबून घुसमटवायचाच अवकाश आहे. ते स्वप्नही संपेल आणि हादेखील. प्रतिकार तर करायच्या अवस्थेतच नाही हा. तेव्हा जगातला कुणीही तज्ञ ‘नैसर्गिक मृत्यू’ या शिवाय दुसरं काहीही निदान करू शकणार नाही. पण आधी या कागदावर काय लिहिलंय यानं ते वाचायला हवं.”

धनानंदानं अलगद कागद उचलून घेतला आणि मेणबत्तीच्या प्रकाशात वाचायला सुरुवात केली.

“आज रात्री १२ वाजता मी पैजेतून मोकळा होईन, त्यानंतर या कैदेतून माझी सुटका होईल. या खोलीबाहेरच्या माणसांशी मी पुन्हा संपर्क साधू शकेन. पण खोलीबाहेर पडून उद्याचा सूर्य बघण्यापूर्वी मला तुम्हाला काही सांगायचंय; माझ्या सदसद्विवेक बुद्धीने आणि माझा सदैव सांभाळ करत असलेल्या परमेश्वराच्या साक्षीने! स्वतंत्र असणं, जिवंत असणं, आरोग्यपूर्ण असणं या आणि तुमची पुस्तकं ‘जगातल्या चांगल्या गोष्टी’ म्हणून ज्यांचं वर्णन करतात त्या सगळया गोष्टींचा मला तिरस्कार वाटतो.

“गेली पंधरा वर्षं मी ऐहिक आयुष्याचा सखोल अभ्यास करत आलोय. अर्थात, या काळात मी ना जग बघितलं ना त्यातली माणसं, पण तुमच्या पुस्तकातलं ज्ञानामृत मी मनसोक्त प्यायलो, त्याच्याबरोबर गायलो, जंगलातल्या मुक्त हरणांच्या, रानटी पशूंच्या शिकारी केल्या, सुंदर स्त्रियांबरोबर रमलो. तुमच्या कवींनी आणि विद्वानांनी म्हटल्याप्रमाणे स्वर्गात विहरणाऱ्या मेघांसारख्या तरल सौंदर्याने नटलेल्या सुंदरी मला रात्री भेटायला यायच्या आणि माझा मेंदू चक्रावेल अशा गोष्टी माझ्या कानात कुजबुजायच्या. तुमच्या पुस्तकांमधून मी हिमालयाच्या, कैलास पर्वताच्या शिखरांवर आरोहण करून आलो. तिथं उभा राहून सूर्योदय बघितला, संध्याकाळच्या सोनेरी जांभळ्या प्रकाशानं भारलेलं आकाश आणि समुद्र बघितला. माझ्या डोक्यावर चमकून जाणारी आणि कडाडत पावसाळी ढगांना चिरून जाणारी विद्युल्लता बघितली. हिरवाईनं नटलेली वनं, शेतं, नद्या, तळी, गावं, सगळं सगळं बघितलं. वाऱ्याची शीळ आणि तरळत येणारे गोपाळांच्या बासरीचे सूर ऐकले; देवांच्या कागाळ्या सांगायला आकाशातून अवगाहन करत माझ्याकडे येणाऱ्या सैतान पऱ्यांच्या तरल पंखाना मी स्पर्श केला….. तुमच्या पुस्तकांतून मी स्वत:ला तळ नसलेल्या गर्तेत झोकून दिलं, जादुगिरी केली, हत्या केल्या, गावं भस्मसात केली, नव्या नव्या धर्मांवर प्रवचने दिली, साम्राज्यंच्या साम्राज्यं पादाक्रांत केली…..

“तुमच्या पुस्तकांनी मला शहाणं बनवलं. युगानुयुगांच्या विचारमंथनातून माणसांनी जे जे काही निर्माण केलं ते ते सर्व माझ्या मेंदूच्या एका छोट्या कप्प्यात ठासून भरलं. आणि म्हणून, मला ठाऊक आहे, मी तुम्हां सर्वांपेक्षा जास्त विद्यावान झालोय.

“आणि तरीही, मी तिरस्कार करतो तुमच्या पुस्तकांचा. मी तिरस्कार करतो विद्वत्तेचा, जगाच्या आशीर्वादांचा. सारं काही क्षुद्र आहे, क्षणभंगुर, मृगजळासारखं फसवं. तुम्हाला गर्व असेल शहाणं, सुसंस्कृत असल्याचा. पण मृत्यू चुटकीसरसा पुसून टाकेल तुम्हाला या जगाच्या पटावरून कारण तुम्ही जमिनीत बीळ करून राहणाऱ्या उंदरापेक्षा वेगळे नाही आहात. तुमचा इतिहास, तुमचा वंश, तुमची तथाकथित अमर विद्वत्ता, सारं काही चुटकीसरशी होत्याचं नव्हतं होईल…. या पृथीच्या गोलासह !

“तुम्ही तुमची बुध्दी हरवून बसला आहात आणि चुकीच्या मार्गावर चालताहात. सत्त्य टाळून असत्त्याची कास धरली आहे तुम्ही, सुंदरता टाकून हिडीस विरूपता स्वीकारली आहे. काही अकल्पित कारणानी सफरचंदाच्या झाडांना बेडूक आणि संत्र्याच्या झाडांना सरडे लागले किंवा गुलाबाला घामट घोड्याचा वास आला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तसंच आश्चर्य तुम्हाला स्वर्गसुख सोडून पृथ्वीवरच्या नश्वर गोष्टींचा पाठपुरावा करताना बघून मला वाटतंय. पण तुम्ही असं का करता आहात याची कारणं शोधण्यात मला यत्किंचित स्वारस्य रस नाही.

“तुमच्या जीवनविषयक दृष्टिकोनाची मला किळस वाटते आहे. हे दाखवून देण्यासाठी तुम्ही मला देऊ केलेले पाच लाख रुपये मी नाकारतोय. कधीकाळी मला त्या पैशांचा मोह होता. जसं काही ते मिळाल्यावर मला नंदनवन मिळणार होतं. पण आता, नाही. आता तिरस्कार करतो मी त्या पैशांचा. आणि पुन्हा त्या मोहाचा माझ्या मनाला स्पर्शही होऊ नये म्हणून पैजेतील नियोजित वेळेच्या आधीच दोन तास इथून निघून जाणार आहे, पैजेतील करार मोडून…..”

धनानंदानं वाचून झाल्यावर तो कागद परत टेबलावर होता तसा ठेवला. विद्याधराच्या मस्तकावर हलकेच आपले ओठ टेकवले आणि डोळ्यात येत असलेल्या अश्रूंना थोपवायचा प्रयत्न न करता तो खोलीच्या बाहेर गेला. जेव्हा जेव्हा शेअरबाजारात जबरदस्त नुकसान सोसावे लागले तेव्हाही त्याला स्वत:च्या व्यवसायपटु असण्याबद्दल शंका आली नव्हती. परंतु आज तो हरला होता. घृणा वाटली त्याला स्वत:चीच. घरी येऊन अंथरुणावर पडला तरी पुढं किती तरी तास अश्रु आणि भावनांच्या कल्लोळामुळं त्याला झोप लागली नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी वॉचमन घाबराघुबरा, पांढऱ्याफटक चेहऱ्याने पळत आला आणि त्यानं धनानंदाला खोलीतला माणूस खिडकीतून बागेत उतरून फाटकाबाहेर निघून जाताना बघितल्याचं सांगितलं. धनानंद पळतच आउटहाउसकडे गेला आणि त्यानं विद्याधर खरोखरच निघून गेल्याची खात्री करून घेतली. पुढं अनावश्यक लोकापवाद टाळण्यासाठी म्हणून त्यानं टेबलावरचं ते पत्र, ज्यात विद्याधरानं स्वेच्छेनं पाच लाखांवर पाणी सोडलं होतं ते, खिशात टाकलं आणि घरी आल्यावर अग्निरोधक तिजोरीत ठेवून दिलं.

— मुकुंद कर्णिक

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..