बहुतेक कलाकार लहरी व आपल्याच विश्वात मग्न असतात त्याला चित्रकार अपवाद कसे असू शकतील. नावजलेल्या चित्रकारांची विविध वैशिष्ठये व पद्धती आकृत्या व रंगातून दिसतात. काहीना रंग आवडतात तर काहींना आकृत्या. काही चित्रकार रंग व आकृत्या अशा प्रकारे काढतात की त्यातून त्यांना एक स्टोरी किंवा घटनाक्रम सांगावासा
वाटतो. काही चित्रकारांचे मन हळवे आध्यात्मिक तर काहींचे तर्हेव्हाईक असते. माणसांच्या मनातील विचार कृतीतून व्यक्त होतात तसेच प्रत्येक चित्रकाराला त्यांच्या जिवनात आलेल्या अनुभवावरून वेचलेल्या प्रत्येक क्षणाचे प्रतिबिंब त्यांच्या रेखाटनावरून कळते . काही चित्रकारांना टाकाऊतून टिकाऊ करण्याचा नाद असतो आणि असा चित्रकार होऊन गेला त्याचे नाव आहे “पॅबल पिकासो”.
पिकासोचा जन्म २५ ऑक्टोबर १८८१ साली स्पेनमधील मालगा थेथे झाला. हा स्पॅनिश चित्रकार होता. वडिल चित्रकलेचे अध्यापक होते. पिकासोच्या जन्माच्या वेळची घटना फारच वेगळी आहे. साधारणत: ९९ टक्के मुल जन्माला आले की रडते पण पिकासो जन्माला आला तेव्हां तो रडलाच नाही. परंतू त्याला काकांनी घेतले. काका सिगरेट ओढत होते. सिगरेटचा धूर पाहून तो रडू लागला.
पिकासो संबंधात सर्वच गोष्टी अचंबीत करतात. पिकासो स्पॅनिश होता. स्पॅनिश पद्धतीत नावे खूप लांबलचक असतात. आपल्या येथे बघा दाक्षिणात्य नावे किंवा मोगल साम्राटांची नावे कशी लांबलचक असतात तसे होते. नावात आईवडिलांच्या घराण्यातील आडनावे पूर्वजांच्या संतांची नावे त्यामध्ये सामाविष्ट असल्यामुळे खुपच रेल्वेच्या डब्यांसारखी लांबच लांब नावे असतात. पिकासोचे नाव: “पॅबलो दिगो जोसेफ फ्रान्सिस्को द पालजोन नेपोम्युकोनो मरिआदलास रेमिडिऑस क्रिपीअॅनो दला स्तन्तसीमा त्रिनिदाद रूईझ पिकॅसो” मला वाटते एवढे लांबलचक नाव कुठेही नसेल किंबहूना गिनिज रेकोर्ड मोडण्यासाठी एखादी व्यक्ती आपले नाव असे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो. पिकॅसो हे त्याच्या आजोळच्या घराण्याचे आडनाव आहे. पिकॅसोची बुद्धिमत्ता तीव्र होती व प्रतिभा सुद्धा तशीच अलौकिक होती.
पिकासोची चित्रकारीता ही बहूदा नवकला होती. पिकॅसो कुमास व सीझान या चित्रकारांच्या चित्राने प्रभावीत झाला होता. ब्राक नावाच्या चित्रकाराचे पिकॅसोला सान्निध्य लाभले व त्या चित्रकारीतेचा त्यावर परिणाम झाला.
चित्रातील आकार वेगवेगळे करून मांडण्याची एक निराळीच पद्धत त्याने सूरू केली. म्हणजे सध्या जसे संगीतात रिमीक्सचा जमाना आला आहे तसा. पण तरी चित्रातील आकार मोडून तोडून मांडण्याची एक निराळी पद्धत. आपल्या रोजच्या टाकऊ वस्तुंमधून तो शिल्प तयार करीत असे. कागद दोरे लेबले वायर चटया यांचा वापर करून दृकसंवेदनाची व्याप्ती वाढवून कोलाज पद्धतीचे कालशिल्प करायला सुरूवात केली. एकदा एक मोडकी सायकल सापडली त्या मोडक्या साकालीचे हँडल म्हणजे दोन शिंगे. सायकलची सीट म्हणजे बैलाचे मुंडके यांच्या साहयाने पिकॅसोने एक शिल्प तयार केले. हे शिल्प सगळया लोकात एक कुतुहलाचा विषय झाला. पिकॅसोच्या कल्पकतेला काही तोड नाही त्याने गोरिला मादी आणि तिचे मुल हे शिल्प तयार करण्यासाठी मादिचे तोंड म्हणून चक्क खेळातील मोटारच जोडली.
गावाच्या बाजाराचा दिवस होता. आजुबाजूच्या गावांतून बाजाराला आलेल्यांची मोठी गर्दी जमली होती. ते युद्धाचे दिवस होते. आकाशात मोठा आवाज करीत विमाने घिरटया घालत होती. मुलांच्या विमान बघण्याच्या कुतुहलापोटी मुले रत्यावर आली आणि क्षणार्धात त्यांना कळायच्या आधीच विमानातून बॉम्बहल्ला सुरू झाला. धूर आग प्रचंड धुराळा स्फोट यांनी आसमंत भरून गेला. सगळीकडे हाहाकार उडाला आरडाओरडा किंकाळया सुरू झाल्या. ही ऐतिहासीक विध्वंसक घटना होती गुरतिका गावातील २६ एप्रिल १९३७ सालातीली संपूर्ण गाव उध्वस्त झाले होते. स्पेनमधील लोकशाही पक्षाला दहशत बसावी म्हणून हिटलर कडून मिळालेल्या विमानाच्या साहयाने स्पॅनिश फॅसिस्ट विमानदलाने ही बॉम्बफेक केली होती. स्पेनमधील यादवीला गाव बळी पडले होते. स्पेनमधील लोकांना हे कृत्य अजिबात आवडले नाही त्या देशप्रेमी लोकांना या कृत्याची चीड आली.
आपल्याला महित आहेच की या सर्वांचा राजकारण्यांवर समाज सेवकांवर कलाकारांवर प्रभाव पडतो. मनातील उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत आणि त्या प्रमाणेच पिकॅसोला हे आवडले नाही. तो संतप्त झाला आणि त्या निघ्रुण हत्येवर एक चित्र तयार कारायला घेतले. चित्रा आधी त्याने बरीच रेखाटने केली. २५ फूट लांब व ११ फूट उंचीचे तैलरंगातील चित्र करण्यास घेतले. शिडी लावून काम सुरू केले जेथे हात पोहचत नव्हता तेथे काठीला ब्रश बांधून रंगविण्याचे काम पिकासो करीत होता.
चित्रात त्याने त्या विदारक अशा दृष्याचे त्याच्या बुद्धीला पटेल असे चित्र बनविण्यास सुरूवात केली त्यासाठी त्याने जखमी बैल, घोडे हातात दिवा घेतलेली ओणवी स्त्री विविध आकार व भावनांचे प्रतिक त्यामध्ये दाखविले असे. दिवसरात्र एक करून श्रमाची पर्वा न करता एका महिन्यात ते चित्र पूर्ण केले. या चित्रातून युद्धाची भीषणता जगाला सांगायची होती. चित्रं फक्त भिंती सजविण्यासाठी नसतात चित्रकाराची कलाच सादर करण्यासाठी नसतात तर ती युद्धाविरूद्ध आघाडीही उभारू शकतात हे पिकासोने चित्रांमधून दाखवून दिले. दुसर्या महायुद्धातील अनर्थाच्या काहाणीचा पहिला निषेध या थोर चित्रकाराने “गुतिका” या चित्राच्या मथळयाने नोंदविला.तुटकेफुटके विविध बाजूंचे आकार एकत्र करण्याचे तंत्र यामध्ये आहे. क्युबिझमची तंत्रपद्धती वापरलेली आहे. युद्धावर चितारलेले चित्र वास्तववादी पद्धतीचे नाही अनेक प्रतिकांचा त्यात वापर केला आहे. सामुदायिक हत्याकांडाची नवी पद्धत बॉम्बफेकी सारख्या भीषण तंत्रामुळे जन्माला आली. यावर क्युबिझम पद्धतीने घडविलेला अविष्कार प्रभावी ठरला आहे.
नवकलेचा प्रणेता म्हणून पॅबलो पिकॅसोचे जगामधील स्थान एखाद्या उंच शिखरासारखे आहे. आपल्या कलाकृतीत सातत्याने बदलत राहिला. चित्रकलेच्या नवीन वाटा निर्माण केल्या. टिकाकार त्याला रंग बदलणारा सरडा म्हणत असत.
त्याच्या भोवतालचे जग सुद्धा आपसुक बदलत राहायचे.
एका चित्रात त्याने असे दाखविले आहे की चित्राच्या मध्यभागी घोडा उंच मान करून आर्तपणे खिंकाळत आहे. त्याच्यावर सूर्य असून इलेट्रिक बल्बचा डोळा त्या सूर्याला लावलेला आहे. घोडयाच्या पायाशी जखमी योद्धा पडला आहे हातात तुटलेली तलवार दुसरा हात जमिनीवर असहाय्यपणे पडलेला डाव्या बाजूस मस्तीत आलेला मदनोमत्त बैल आहे पायापाशी मेलेल्या बालकासह स्त्री आकाशाकडे शुन्य नजरेने बघत आहे तीन स्त्रीया उजव्या हाताशी दाखविल्या आहेत एक स्त्री पेटलेल्या कपडयानिशी पळत आहे दुसरी ओरडत आहे तिसरी हातात दिवा घेऊन दारातून बाहेर येत आहे. चित्रात सुद्धा युद्ध सादृष्य रंग आहेत म्हणजे काळा तांबडा राखाडी त्यामुळे निराशा व कारूण अधिक प्रभावी झाले आहे.
“बैल माणसातील पशुत्व दाखवितो तर घोडा जनतेच प्रतिक”. हे चित्र त्याने १९४४साली फ्रान्स स्वतंत्र झाला तेव्हा पिकासोची मुलाखत घेतली गेली त्या वेळी त्याने त्या चित्राबद्दल वरील उद्गार काढले. युद्धकाळात चित्र काढण्याकरीता कॅनव्हॉस मिळत नसे रंग व इतर साहित्यही मुश्कील होते.
पिकासो ९२ वर्षे जगला. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्याने पन्नास हजार कलाकृती निर्माण केल्या. पिकासोच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणते पहिला शब्द शिकला तो म्हणजे पेन्सिल व बोलायला लागण्यापूर्वीच तो चित्र काढत असे. त्या थोर चित्रकाराच्या निधना नंतर फ्रान्समध्ये त्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले व प्रदर्शन पहायला रेकॉर्ड ब्रेक ४ महिने प्रेक्षकांच्या रांगा होत्या.
जगदीश पटवर्थन वझिरा बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply