मध्यंतरी एक चित्रपट टिव्ही वर पाहिला होता. सुरवातीपासून नाही पण बराच भाग पाहिला होता. ऐकू येत नाही पण कथानक समजून घेता येते मला. पण का कुणास ठाऊक कथानक थोडे पटले आणि नाही सुद्धा. परदेशात असलेले जोडपे आणि तिची आई. भारतीय आहेत पण परदेशात राहून विचार सरणी तिकडचीच असावी. भांडत असतात. घटस्फोट घेण्याची वेळ येईपर्यंत. मग मूल जन्माला घालण्याची तयारी मानसिक दृष्ट्या होते. इथून सुरुवात होते त्या दोघांची मानसिकतेची. आईची लुडबुड. यात मला उमगलेले काही मुद्दे..
खर तर हा विषय ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे दृष्टिकोन वेगळा आहे. मातृत्व ही स्रीची एक नैसर्गिक देणगी आहे. त्यामुळे तिला खूप संयमाने आणि शांत पणे हे सगळे सहन करावे लागते. आणि मी आई होणार आहे म्हणून मलाच सगळ्या गोष्टी करायला लागतात. अगदी नवू महिने पोटात ठेवणे. या वेळी होणाऱ्या अनेक तक्रारी. कळा देऊन जन्माला आणणे. पुढे ही संगोपन. संस्कार. त्याची जबाबदारी. हे सगळे आणि इतर गोष्टी मलाच कराव्या लागतात. यात पुरुषांना काहीही नाही असे म्हटले जाते.
आता हे सगळे प्रत्येक पुरुष करतोच की नाही माहित नाही पण मला वाटते की त्यालाही अनेक गोष्टीला सामोरे जावे लागते. घरात असो वा बाहेर तिची काळजी वाटते. चेकअप साठी जावे लागते. आर्थिक मानसिक भार घ्यावा लागतो. तिच्या प्रत्येक गोष्टीत समरस व्हावे लागते. त्यात मोठ्या माणसांच्या बाबतीत काही गोष्टी पटत नाहीत. त्यामुळे तिला आनंदात ठेवून स्वतःला थोडे बाजूला रहावे लागते. आणि ज्या वेळी ती प्रसुतिची वेळ येते तेव्हा त्याची अवस्था फारच विचित्र असते. अनेक विचारांचे थैमान सुरू असतात. कधी कधी अशी परिस्थिती येते की त्याला कठोर निर्णय घ्यावा लागतो. बाळ बाळंतीण सुखरूप आहेत असे समजले की त्याची दुसरी अवस्था तिही वेगळीच..
आता खरी कसोटी इथेच आहे. बाळाचे संगोपन करत असताना त्यालाही आपली जबाबदारी आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. माझे काम कमावणे. घर चालवणे आणि इतर अनेक गोष्टी. असे अलिखित नियम आहेत म्हणून तो नामानिराळा असतो. या चित्रपटात बाळाचे संगोपन कसे करायचे याचे चित्रण पाहून नवल वाटले. पूर्वी एकत्र कुटुंबात मुलांची कामे कुणीही करत असत. त्यामुळे आईवरच जबाबदारी आहे असे नव्हते. पण हल्ली दोघांना नोकरी करावी लागते. बाळाची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याला हे सगळे करणे आवश्यक आहे म्हणून हे शिकले पाहिजे. बालक सांभाळण्याची जबाबदारी फक्त तिचीच नाही. मूल दोघांचे आहे म्हणून दोघांनी ती पार पाडली पाहिजे. पण आपल्या कडे असे दिसत नाही. मुलाचे खाणे पिणे. . शिक्षण. संस्कार. परीक्षा. आणि बऱ्याच गोष्टी तिलाच करायला लागतात. यात तिचीच खूप दमछाक होते. अशा वेळी हे तिचेच काम आहे असे दोघांनीही समजू नये. आणि तिच्या जबाबदारीचे कौतुक करता नसेल तर किमान जाणिव तरी ठेवली तर खऱ्या अर्थाने पालक ठरतील. माझे विचार बरोबर आहेत की नाही माहित नाही पण मला जे वाटलं ते लिहिलं आहे.
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply