एका संध्याकाळी मी XXX संस्थानातील माझ्या मित्राच्या बंगल्यात पुस्तक वाचण्यात गढलो होतो.
माझे मित्र मधुकरराव महाजन हेही पुस्तक वाचण्यात गुंग होते.
तासभर आम्ही दोघांनी एक शब्दही उच्चारला नव्हता.
मी माझ्यातर्फे सोमनाथ बसु ह्यांचे प्रकरण आणि मिसेस रावचा खून ह्या दोन्ही केसेसचा पूर्ण अभ्यास करून माझ्या मित्राबरोबर चर्चा करायची जय्यत तयारी केली होती.
योगायोगाने त्याच वेळी संस्थानचे कोतवाल श्री हिरवे भेटायला येत आहेत असा निरोप आला व पाठोपाठ कोतवालसाहेब आंत आले सुध्दा.
आम्ही त्यांचे मनापासून स्वागत केले.
कोतवाल हिरवे म्हणजे पन्नास टक्के डोक्याला ताप आणि पन्नास टक्के मनोरंजन असा मामला होता.
जरी कोतवालसाहेब अजून कांही बोलले नव्हते तरी ते कोणत्यातरी कठीण आणि न उलगडलेल्या प्रकरणासंबंधी मधुकररावांचा सल्ला घ्यायला आले होते, हे आमच्या लक्षांत आलं होतं.
मेणबत्ती लावता लावता मधुकरराव म्हणाले, “तुम्ही आणलेला प्रश्न गहन विचार करायला लावणारा असेल तर अंधारच बरा.”
“हा तुमचा आणखी एक विचित्रपणा !” हिरवे म्हणाले.
हिरवेना सर्वच बाबतीत ‘विचित्रपणा’ दिसे व “विचित्र” हा त्यांचा आवडता शब्द होता.
जे जे त्यांना समजत नसे, त्या सर्वाला हिरवे “विचित्र” म्हणतं.
मधुकरराव म्हणाले, “खरं आहे.”
त्यांनी हिरवेंना बसण्यासाठी एक खुर्ची पुढे केली.
ते म्हणाले, “आता कोणती अडचण आली आहे ?
कांही खूनाची वगैरे भानगड नाही ना, हिरवे साहेब !”
हिरवे म्हणाले, “तसलं कांही गंभीर नाही.
हा मामला साधा सरळ आहे आणि आम्ही तो सोडवू शकू पण म्हटले अशी मजेदार गोष्ट तुमच्या कानावर घालावी.
कांही बाबतीत ती गोष्ट कमालीची विचित्र आहे.”
मधुकरराव म्हणाले, “साधी, सरळ आणि विचित्र !”
कोतवाल म्हणाले, “सगळं अगदी उघड आहे. त्यात कांही गुप्त नाही. पण कांहीतरी गोंधळात टाकतयं.”
“कदाचित सोपं असणं हेच तुम्हाला कोड्यात टाकत असेल.” मधुकरराव म्हणाले.
“किती विचित्र उलटसुलट बोलतां तुम्ही !” हिरवे मोठ्याने हंसत म्हणाले.
मधुकररावही हंसत म्हणाले, “बरं ! पण आतां कोणता मामला तुमच्याकडे आलाय ?.”
हिरवे खुर्चीत स्थिरस्थावर होत म्हणाले, “मी थोडक्यात मामला सांगतो तुम्हाला !
पण ही गोष्ट अत्यंत गुप्त आहे आणि गुप्तच राहिली पाहिजे.
मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली हे आमच्या वरिष्ठांना कळलं तर माझी नोकरी जाईल.”
मी म्हणालो, “तुम्ही पुढे बोला.”
हिरवे म्हणाले, “ठीक आहे. मला व्यक्तीश: अशी माहिती मिळाली आहे की एका राजघराण्यातल्या व्यक्तीकडले कांही महत्त्वाचे कागदपत्र राजमहालांतून पळवले गेले आहेत.
ते कोणी पळवले हे माहित आहे.
त्याबद्दल कांही संशय नाही.
त्याने ते घेताना पाहिले आहे.
त्याच्याकडे ते अजून आहेत, हेही माहिती आहे.”
मधुकररावांनी विचारले, “हे सर्व कशावरून ?”
कोतवाल हिरवे म्हणाले, “हा तर्क आहे.
ते कागदपत्र जर त्या व्यक्तीवाचून दुसऱ्यांच्या हातात गेले तर जे परिणाम होण्याची शक्यता आहे, तसे कोणतेही परिणाम अजून दिसून आलेले नाहीत.”
मी म्हणालो, “ह्याबद्दल अधिक स्पष्टता हवी.”
हिरवे म्हणाले, “मी एवढं नक्की म्हणेन कीं संस्थानातील कांहीजणांची ताकद हे कागदपत्र खूप वाढवतील.”
हिरवेंना राजदूतांसारखं गोलगोल बोलणं आवडत असे.
मधुकरराव म्हणाले, “स्पष्ट सांगा.”
हिरवे म्हणाले, “त्या कागदपत्रांतील मजकूर त्रयस्थ व्यक्तीला कळला तर राजघराण्यांतील एका मोठ्या व्यक्तीचा सन्मान धोक्यात येईल.
त्यामुळेच सध्या ज्या व्यक्तीच्या हातांत ते पत्र आहे, ती व्यक्ती राजघराण्यांतील त्या मोठ्या व्यक्तीवर हुकुमत गाजवत आहे.”
मी मधेच म्हणालो, “पण त्यासाठी ते कागदपत्र पळवणारी व्यक्ती व ती राजघराण्यातील व्यक्ती एकमेकांना ओळखत असले पाहिजेत.
अशी कोणाची हिंम्मत आहे की…”
हिरवे म्हणाले, “हा चोर संस्थानातला एक ‘डी’ नांवाचा मंत्री आहे.
त्याचीच अशी अशोभनीय कृत्ये करण्याची हिंम्मत आहे.
त्याची चोरी करण्याची पध्दत धीट आणि चतुराईची होती.
ती कागदपत्रं किंवा स्पष्टच सांगायचं तर तें पत्र राणीसाहेब आपल्या खाजगी महालात असतांना त्यांना मिळालं होतं.
त्या तें पत्र वाचत असतांना महालात अचानक महाराज आले.
राणीसाहेब ते पत्र महाराजांपासून लपवू इच्छित होत्या.
त्यांनी ते एका टेबलाच्या खणात ढकलण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला पण ते न जमल्यामुळे त्यांना ते जसं होतं तसंच टेबलावर उघडपणे ठेवावं लागलं.
त्या स्थितीत त्या पत्रातला मजकूर दिसत नव्हता कारण ते दुमडलेले होते पण वरचा पत्ता सहज दिसत होता.
महाराजांचं कांही त्या पत्राकडे लक्ष गेलं नाही.
त्याच वेळेला ‘डी’ मंत्री तिथे हजर झाला.
आल्याआल्याच त्याची घारीची नजर त्या पत्रावर पडली.
त्याने पत्रावरचा राणीचा पत्ता आणि राणीच्या चेहऱ्यावरचा गोंधळही टिपला.
त्या हस्ताक्षरावरून त्याने राणीचे प्रकरण ओळखले.
महाराजांशी थोडा वेळ नेहमीसारखे जुजबी बोलणे करताना त्याने खिशांतून एक पत्र बाहेर काढले.
ते पत्र वरवर दिसायला त्या टेबलावरील पत्रासारखेच होते.
त्याने दोन क्षण हातातले पत्र वाचायचे नाटक केले व ते त्या खाजगी पत्राच्या अगदी जवळच टेबलावर ठेवले.
परत पाचएक मिनिटे त्याने महाराजांबरोबर सध्याच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली.
मग त्याने महाराजांची जाण्यासाठी आज्ञा घेतली व जातांना सहजपणे ते खाजगी पत्र खिशात घातले व स्वतःचे तिथेच राहू दिले.
राणीने हे पाहिलं पण ती त्याबद्दल कांही बोलू शकली नाही कारण महाराज बाजूलाच उभे असतांना तिला त्या पत्राचा उल्लेख करणंही शक्य नव्हतं.
मंत्री ‘डी’ आपले बिनमहत्त्वाचे पत्र तिथेच ठेवून निघून गेला.”
मधुकरराव म्हणाले, “अच्छा ! म्हणून चोर मंत्री ‘डी’ राणीवर हुकुमत गाजवू पहात आहे ?”
हिरवे म्हणाले, “होय ! तसंच आहे आणि मंत्री ‘डी’ पत्राचा भीतीदायक प्रकारे राजकारणासाठी उपयोग करून घेईल असे दिसते आहे.
राणीसाहेबांची दिवसेंदिवस खात्री होत चालली आहे की ते पत्र कसंही परत मिळवलंच पाहिजे.
तें काम त्यांनी गुप्तपणे माझ्यावर सोंपवलं आहे.”
मधुकरराव म्हणाले, “योग्यच आहे. संस्थानात तुमच्यापेक्षा विश्वासू आणि सज्जन अधिकारी दुसरा कोण आहे ?”
हिरवे म्हणाले, “तुम्ही मला हरभऱ्याच्या झाडावर चढवतांय !
पण राणीसाहेबांना असे वाटले असेलही.”
मधुकरराव म्हणाले, “तें पत्र हातात आहे, तोपर्यंतच मंत्री “डी” ह्याला फायदा आहे.
त्यांने जर एकदा पत्र उघड केले तर नंतर काही फायदा नाही.”
हिरवे म्हणाले, “अगदी बरोबर.
ह्याच खात्रीने मी प्रथम मंत्री ‘डी’च्या बंगल्याची त्याच्या नकळत पूर्ण झडती घेतली.
मला असा इशारा देण्यात आला होता की जर मंत्री डी ह्याला संशय आला तर त्याचे परिणाम वाईट होतील.”
मधुकरराव म्हणाले, “तुम्ही पोलिस खूप वाकबगार असता.
अशा अनेक गुप्त झडत्या तुम्ही घेतल्या असतील !”
“हो, झडती घेण्यात फारशी अडचण आली नाही.
कारण मंत्री ‘डी’ रोज रात्री बाहेरच असतात.
त्यांचे नोकर कमी आहेत.
ते दारू पिवून मालकाच्या घरापासून दूर गाढ झोपतात.
माझ्याकडच्या मास्टरकीने मी संस्थानातील कोणतंही कुलुप सहज उघडू शकतो.
गेल्या दोन महिन्यात अनेक रात्री मी स्वतः तिथे जाऊन मंत्री ‘डी’च्या घराची झडती घेतली आहे.
मला माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या राणीसाहेबांचा सन्मान जपायचाय आणि बक्षिसंही मोठं आहे.
तो कागद लपवतां येईल असा प्रत्येक कोपरा मी धुंडाळला आणि पत्र तिथे नसल्याची खात्री करून घेतली.”
मी सुचवले, “मंत्र्यांकडे पत्र नक्कीच असणार पण त्यांनी ते स्वतःच्या घरी न लपवतां दुसऱ्या जागी लपवलं असेल.”
मधुकरराव म्हणाले, “अशी शक्यता कमी आहे.
सध्याचे राजदरबारातले एकूण वातावरण पाहिले आणि मंत्री ‘डी’ ज्या प्रकरणात ढवळाढवळ करताहेत ती लक्षांत घेतली तर त्या पत्राची ताकद ते पत्र ताबडतोब दरबारात दाखवता येण्याच्या क्षमतेतच आहे.
तें नुसते जवळ आहे ह्याचा तेवढा फायदा नाही.”
मी विचारले, “दाखवतां येण्याची क्षमता ?”
मधुकरराव म्हणाले, “पटकन दाखवता नाही आले तर उपयोग शून्य.”
मी म्हणालो, “म्हणजे ते पत्र त्यांच्या घरीच असले पाहिजे.
मंत्री ‘डी’ ते पत्र सतत स्वतः बरोबर ठेवून सगळीकडे फिरत असतील अशी शक्यताही कमी आहे.”
ह्यावर कोतवाल हिरवे म्हणाले, “माझ्या माणसांनी दोनदां त्यांचा पाठलाग केला आणि दोनदा ते दारूच्या धुंदीत असतांना त्यांची अंगझडती घेतली.
पण ते पत्र मिळाले नाही.
दोन्ही वेळी मी स्वतः कांही अंतरावरून लक्ष ठेऊन होतो.
माझ्या लोकांची मेहनत फुकट गेली.”
मधुकरराव म्हणाले, “तुम्ही हे श्रम घेण्याची गरज नव्हती.
‘डी’ हा मंत्री मूर्ख नाही.
ह्या सगळ्या शक्यता त्याने आधीच गृहीत धरल्या असणार.”
हिरवे म्हणाले, ‘‘ते मूर्ख नाहीत पण कवी आहेत आणि माझ्या मते कवी हा वेड्याच्या फक्त एक पायरी खाली असतो.”
मधुकरराव म्हणाले, “मीही कांही खराब कविता लिहिल्या असल्या तरी हें खरं आहे !”
मी हिरवेंना म्हणालो, “तुम्ही तुमच्या झडतीचे तपशील सांगाल काय ?”
हिरवे म्हणाले, “आम्ही अगदी नीट झडती घेतली.
सर्व सामान तपासलं.
आम्ही बंगल्यातली खोली न खोली शोधली.
प्रत्येक खोलीतलं फर्निचर प्रथम शोधलं.
प्रत्येक खण उघडून पाहिला.
मी चोरकप्पे कसे शोधायचे तेही शिकलो आहे.
ज्या पोलिसाला चोर-खण शोधून काढता येत नाही, तो पोलिस बुध्दु मानला जातो.
प्रत्येक कपाटाची एकूण जागा बघून त्यांत हिशेबांत न आलेली इंचभर पोकळी सुध्दा आमच्या लक्षांत येते.
आम्हाला प्रशिक्षणात त्यासंबंधीचे बारकावे समजावे म्हणून नियमच सांगतात.
लांबट तीक्ष्ण सुयांनी आम्ही उशा चांचपल्या.
खुर्च्या व टेबलांचीही त्या दृष्टींनी बारकाईने पहाणी केली.”
“ती कां ?” मी विचारले.
हिरवे म्हणाले, “आमचा अनुभव असा आहे की टेबलाचा वरचा भाग किंवा खुर्चीचा बसण्याचा भाग थोडा कापून तिथे असा तुकडा बेमालूम जोडतात की जो आंतून पोकळ असतो.
त्यांत वस्तु ठेवतां येते.”
“अशी पोकळी टेबलावर टकटक करून कळत नाही कां ?” मी विचारले.
“नाही. आम्हाला झडती घेतांना आवाज करून चालणार नव्हतं.” हिरवेंनी स्पष्ट केलं.
मी म्हणालो, “पण पत्राची बारीक घडी किंवा सुरळी लपवायला किती जागा लागणार आहे.
तेवढी जागा टेबल अथवा खुर्चीच्या पायांतही करता येऊ शकते.”
हिरवे म्हणाले, “आम्ही टेबल-खुर्च्यांच्या पायांचीही बारीक पहाणी केली.
एकात जरी अनियमितपणा, डाग, उडालेला रंग, असा कांहीही बदल झाला असता तरी आमच्या तो लक्षांत आला असता.”
मी विचारले, “आरसे, फळे, पलंग, जाजमे, पडदे इ. तुम्ही पाहिलेच असतील.”
हिरवे म्हणाले, “आम्ही कांहीही सोडलं नाही.
बंगल्याबाहेरच्या मैदानांत फरशीचे तुकडे तुकडे बसवलेत.
त्यामधून फटींतून गवत उगवलं आहे.
थोडं जरी गवत कुरतडलेलं असतं तरी ते दिसलं असतं.
आम्ही इंच न इंच तपासला.
कुठेही अलिकडे बदल झालेला असता तरी तो आमच्या नजरेतून सुटला नसता.
आम्ही चक्क दुर्बिण वापरून शोध घेतला.”
मी म्हणालो, “खाजगी वाचनालयाचा तुम्ही शोध घेतलाच असेलच !”
हिरवे म्हणाले, “आम्ही वाचनालयाचा जास्त बारकाईने शोध घेतला.
साधारण पोलिस पुस्तकं हलवून कांही पडतयं कां म्हणून पहातात तसं न करतां पान न पान चाळून काढलं.
पुठ्ठे तपासून पाहिले.
पडलेली पार्सले, पाकीटे तपासली.”
मी विचारलं, “भितीवरल्या फोटोफ्रेमस, तळघर ?”
कोतवाल हिरवे म्हणाले, “हे सुध्दा सर्व पाहिलं.”
मी म्हणालो, “मग तुम्ही म्हणतां तसं ते पत्र त्याच्या जागेत नसावंच !”
हिरवे माझ्याशी सहमत होत म्हणाले, “मधुकरराव, तुमचा काय सल्ला आहे माझ्यासाठी ?
मी पुढे काय करावं ?”
मधुकरराव शांतपणे म्हणाले, “पुन्हा एकदा नीट शोधा.”
हिरवे म्हणाले, “काहीच गरज नाही त्याची ! मला अगदी पूर्ण खात्री आहे.”
मधुकरराव म्हणाले, “ह्यापेक्षा चांगला सल्ला माझ्याकडे नाही.
तुमच्याकडे त्या कागदाचा तपशील असेल, तेवढा मला सांगा.”
हिरवे म्हणाले, “हो, आहे.”
त्यांनी खिशांतील डायरीतून तपशील वाचून दाखवला.
आंतून बाहेरून रंग कसा होता ?
आकार केवढा होता ?
आंत साधारण किती ओळी मजकूर होता ?
असे कांही तपशील त्यांनी वाचले.
मग निराश होऊन निघून गेले.
त्यानंतर एक महिन्याने ते परत आमच्याकडे आले.
पाईप ओढत ते सर्वसाधारण विषयांवर बोलू लागले.
मी विचारले, “त्या पळवलेल्या पत्राचे काय झाले ?”
“मरो तो मंत्री ‘डी’.
मी मधुकररावांच्या सांगण्यावरून पुन्हा झडती घेतली परंतु ते पत्र मिळाले नाही.
आमचे सारे श्रम वायां गेले.
मी आधीच म्हणालो होतो.
मधुकरराव म्हणाले, “त्या पत्रासाठी किती रूपयांचं बक्षिस तुम्हाला मिळणार आहे ?”
हिरवे म्हणाले, “खूप मोठं बक्षिस आहे.
मला जो ते परत मिळवण्यासाठी मदत करेल त्याला मी दोन लाख रूपये द्यायला तयार आहे.”
मधुकरराव म्हणाले, “कोतवालसाहेब, तुम्ही ह्या प्रकरणासाठी पूर्ण प्रयत्न केलेले नाहीत !”
हिरवे म्हणाले, “कां ? मी पूर्ण प्रयत्न केले.”
मधुकरराव म्हणाले, “तुम्ही तुमचा प्रतिनिधी नेमू शकतां ?
तुम्हाला चिकटे नांवाच्या कंजूष श्रीमंताची गोष्ट माहिती आहे ?
त्याला एकदा वैद्यकीय सल्ला फुकट हवा होता. त्याने एका विख्यात डाॅक्टरांशी सहज विषय काढला.
त्याने डाॅक्टरांना आपली लक्षणे काल्पनिक माणसाची म्हणून सांगितली व विचारले, “डाॅक्टर, अशा रोग्याला तुम्ही काय घ्यायला सांगाल ?”
डाॅक्टर म्हणाले, “मी त्याला डाॅक्टरचा सल्ला घ्यायला सांगेन.”
कोतवालसाहेब तुम्ही त्या चिकटेंसारखं करताय !”
हिरवे म्हणाले, “कां ? मी मला मदत करणाऱ्या कोणालाही दोन लाख रूपयांचा चेक लिहून द्यायला तयार आहे.”
मधुकरराव टेबलाचा खण उघडत म्हणाले, “मग लिहा चेक माझ्या नांवाने.
मी तुम्हाला ते पत्र आता देतो.”
मी आश्चर्यचकीत झालो.
हिरवे तर विजेचा धक्का बसावा तसे स्तब्ध झाले.
मग त्यांनी संमोहित असल्याप्रमाणे आपल्या बॅगेतून चेकबुक काढून दोन लाखांचा चेक लिहिला व सही करून मधुकररावांना दिला.
मधुकररावांनी तो पाहिला व खणात ठेवला आणि हातांतले पत्र हिरवेंना दिले.
कोतवाल हिरवेंनी ते पत्र पाहिले व तें खिशांत टाकून सर्व कांही विसरून धांवत निघून गेले.
मधुकररावांचे आभार मानायलाही ते विसरले.
मी म्हणालो, “मधुकरराव, ही जादू कधी आणि कशी केलीत ?”
मधुकरराव म्हणाले, “हिरवेंनी मंत्री ‘डी’ ह्यांना कवी व वेडा म्हटले.
अशी लढाई ही शेवटी दोघांच्या बुध्दीतली लढत असते.
हिरवेंनी त्यांना कमी बुध्दीमान मानण्याची चूक केली.
शेवटी हिरवेंचीच बुध्दी तोकडी पडली.”
मी विचारले, “मी ऐकलं आहे की ह्या मंत्री ‘डी’ यांने कॅलक्युलसवर एक पुस्तकं लिहिलं आहे ?”
मधुकरराव म्हणाले, “तो एकाच वेळी मॅथॅमेटीशियन, कवी आणि राजकारणी आहे.
पण त्याचे हेतु कधीच चांगले नव्हते.
असा माणूस राजकारणात मोठ्या पदावर पोहोचला की सर्वांना त्रासदायक होतो.
सध्याचं संस्थानचं जे राजकारण चालू आहे, त्यातला त्याचा सहभाग मलाही आवडत नव्हता.
म्हणून मी हिरवेंना मदत करायचे ठरवले.”
“पण तुम्हाला ते सहज कसं साध्य झालं ?
तुमच्या व मंत्री ‘डी’च्या बुध्दीच्या सामन्यांत तुम्ही त्याच्यावर कशी मात केलीत ?” मी विचारलं.
मधुकरराव म्हणाले, “लहानपणीचे खेळ आठवा.
लपवलेल्या सागरगोट्यांची किंवा गोट्यांची संख्या ओळखणे, काचपाणीत कांच कुठे लपवली हे शोधणे.
ह्या सर्व खेळांत समोरच्याच्या मनांतल ओळखतां आलं तर तुम्ही सतत जिंकू शकता.
कोतवाल हिरवे पहिल्यांदा इथे हा प्रश्न घेऊन आले, तेव्हा मी म्हणालो की उत्तर फारच सोपे असेल.”
मी म्हणालो, “आठवतंय ! आणि ते मोठ्याने हंसले होते.”
मधुकरराव म्हणाले, “मंत्री ‘डी’ हा हुशार असल्यामुळे त्याने हिरवेंच्या पुढील चाली आधीच ओळखल्या.
मी विचार केला की ह्याने पत्र घरांतच ठेवलेय हे नक्की.
मग तो कुठे ठेवील ? बहुदा तो ते लपवणारच नाही.”
मग मी एका सकाळी मंत्री ‘डी’ ह्यांच्या घरी सहज गेलो.
तुला माहितच आहे की संस्थानातील सर्वच मोठ्या लोकांशी माझा परिचय आहे.
मी गेलो तेव्हां मंत्री महाशय नुकतेच उठले होते.
मी त्यांच्या दिवाणखान्यात बसलो.
मी त्यादिवशी डोळ्यांवर रंगीत चष्मा लावला होता.
मला सध्या डोळ्यांना थोडा त्रास आहे, हे मी त्यांना बोलता बोलतां सांगितलं.
खरं तर मी सर्वत्र पहाता यावं म्हणून डोळ्यांवर चष्मा लावला होता.
मला त्यांतून स्वच्छ दिसत होतं.
मी तिथे ठेवलेल्या एका टेबलावर पाहिलं.
त्यावर कांही पुस्तकं, एक वाद्य, काही कागद आणि अनेक सटरफटर वस्तु पडलेल्या होत्या.
त्यात ते पत्र दिसलं नाही.
इथे तिथे पहातांना माझे लक्ष समोरच्याच भिंतीवर लोंबकळत असलेल्या कार्ड वगैरे ठेवण्याच्या बांबूच्या छोट्या पत्रपेटीवर गेले.
घरात आलेली पत्र आणि भेटकार्ड ठेवायची ती उघडी पेटी होती.
त्यात दोन तीन व्हीजीटींग कार्ड आणि एक चुरगाळलेले पत्र पडलेले होते.
चुरगळलेल्या पत्रावर मंत्री ‘डी’ ह्यांचे मोठे सील होते.
ते दर्शवत होते की हे त्यांना आलेले पत्र आहे.
मी बारकाईने त्या पत्राकडे पाहिलं आणि माझ्या लक्षांत आलं की हे पत्र एकदा सुलट व एकदा उलट गुंडाळी केलेले आहे.
कारण त्याला पडलेल्या घडीवरच्या चुण्या हेच दाखवत होत्या.
माझ्या लक्षांत आले की हे तेच पत्र आहे.
मंत्री ‘डी’ ह्यांना खात्री होती की वरचे ठळक सील पाहून ते जुने वाटणारे समोरच ठेवलेले पत्र बघितले जाणार नाही.
हिरवे गुप्त जागा शोधतील.
हिरवेंनी दोनदा झडती घेऊनही ते पत्र उघडून पहाण्याचाही त्रास घेतला नव्हता.
मी त्यानंतर मंत्र्याशी त्यांच्या आवडत्या विषयावर बोललो व पाच मिनिटांनी तपकिरीची डबी तिथेच विसरून परत आलो.”
मी म्हणालो, “तुम्ही विसरून आलांत ? आश्चर्य आहे.”
मधुकरराव हंसले, “दुसऱ्या दिवशी पुन्हा जायला निमित्त !”
मी ही हंसलो, “अच्छा ! मुद्दाम ठेवून आलात !”
मधुकरराव म्हणाले, “दुसऱ्या दिवशी डबी घ्यायला गेलो तेव्हाही मंत्री घरीच होते.
मी परत त्यांच्या आवडत्या विषयावर गप्पा सुरू केल्या.
डबी खिशांत ठेवली.
आम्ही बोलत असतांना बाहेर रस्त्यावर पिस्तुलाची गोळी उडाल्याचा मोठा आवाज झाला.
पाठोपाठ लोकांचा गलका ऐकू येऊ लागला.
मंत्री ‘डी’ उठून खिडकीकडे गेले व खिडकी उघडून बाहेर पाहू लागले.
मी ही त्यांच्या मागोमाग खिडकीकडे गेलो पण त्यापूर्वी कार्डपेटीतलं ते पत्र माझ्या खिशात घातलं व तिथे तसंच वाटणारं एक पत्र ठेवलं.
त्यावर मी तयार करून घेतलेला ‘डी’ चा शिक्का अगदी तसाच होता.
मंत्री परत येत म्हणाले, “कुणीतरी वेडा दिसतोय.
हवेंत बार काढून पळून गेला.”
मी मान हलवली.
वेड्याचं नाटक करून खोटा बार काढायला मला त्या माणसाला शंभर रूपये द्यावे लागले होते पण त्याने काम चोख आणि वेळेवर केलं होतं.
आणखी पाच मिनिटांतच मी तिथून निघालो.
माझं काम झालं होतं.”
मी म्हणालो, “एवढं सर्व करण्यापेक्षां पहिल्याच दिवशी उघडपणे तें पत्र घेऊन त्याच्या समोरून तुम्हाला येणं अशक्य होतं कां ?”
“डी” हा मंत्री कोणत्याही थराला जाऊ शकतो.
त्याने मला तिथून जिवंत परत जाऊ दिलं नसतं.
त्याचे गुंडच त्याच्याकडे काम करतात.
म्हणून त्याचीच युक्ती वापरून मी ते पत्र बदललं.
आता ते पत्र अजून आपल्या हाती आहे असं समजून तो जे राजकारण करेल त्याने त्याचा सर्वनाश होईल आणि तो तें नकली पत्र जेव्हा उघडून पाहिलं, तेव्हा खरी मजा येईल.”
मधुकररावांनी सांगितलं.
मी म्हणालो, “तें आत कोरंच असेल ना !”
“आतली बाजू कोरी ठेवणं मला बरं वाटलं नाही.
माझं अक्षर डी ओळखेल.
मी त्यावर लिहिलं आहे, “बेत घातक होता. करावं तसं भरावं.”
— अरविंद खानोलकर.
मूळ कथा – परलॉईनड लेटर
मूळ लेखक – एडगर ॲलन पो (१८०९-१८४९)
तळटीपः ही कथा ही इंग्रजीत रहस्यकथांची सुरूवात करणारी पहिली कथा मानली जाते.
Leave a Reply