हिंदू धर्मामध्ये ईश्वराची पूजा-अर्चना करणाऱ्या अनेक पद्धती आपण बघतो. खूप भक्ती-भावनेने त्या केल्या जातात. त्यातलीच एक पद्धत म्हणजे पंचामृताने ईश्वराला स्नान घालणे. दूध, दही, तूप, मध, साखर ह्या सर्वांनी त्याला स्नान घातले जाते व त्याचबरोबर आपली भावना अर्पित केली जाते. ह्या भावनांचा तसेच आपला नमस्कार स्वीकारावा हा त्या मागचा उद्देश्य. ईश्वराला खूष करण्याची ही एक सुंदर पद्धती भक्तिमध्ये दिसून येते. ह्या ईशप्रीती सोबत जर आपण पाच गुण जीवनात आणले तर ईश्वराचे प्रेम आपल्याला जास्त मिळू शकेल.
दूध :- प्रत्येक पूजेमध्ये दुधाचा वाटा जास्त दिसतो. दूध हे पवित्रतेचे आणि संपन्नतेचे प्रतिक आहे. गृहप्रवेश करतो तेव्हा सुद्धा दुधाला उकळवून ते सांडू दिले जाते. म्हणजेच हे घर नेहमी संपन्न आणि भरपूर रहावे ही त्या पाठीमागची शुभभावना. दूध शरीरासाठी सुद्धा चांगले मानले जाते. दुधासारखी शुभ्रता आपल्या चरित्रात तसेच, त्याचे पावित्र्य आपल्या विचारात आणले तर ईशकृपा नक्कीच आपल्यावर होईल.
दही :- दह्यामध्ये परिवर्तन शक्ति आहे. एक मण दुधामध्ये एक चमचा दही टाकले तर त्याचे रूपांतर दह्यामध्ये होते. दह्यामध्ये दुसऱ्यांना स्वतःसारखे बनवण्याची शक्ति आहे. आज मनुष्य दुसऱ्यांना लवकर कॉपी करतो. रस्त्यामध्ये कोणी ओळखीचे भेटले, हाय-हॅलो केले तर आपण ही करतो. जर त्यांनी नाही केले तर आपण ही करत नाही. एखाद्याने रागाने काही बोलले तर त्याचे उत्तर आपण ही रागावून देतो. जसे समोरचा वागतो तसेच आपण वागतो. पण कोणी कसे ही वागले तरी मला कसे वागायचे आहे याची समज नक्कीच ठेवावी. वाईटाचा मार्ग न निवडता समोरच्याला आपल्या सारखे बनवण्याची कला आपण आपल्यामध्ये आणावी. दह्यासारखे स्वतःला बनवावे.
तूप :- तुपामध्ये स्निग्धता आहे. त्याचबरोबर त्याला पौष्टिक ही मानले जाते. तूप बनवण्यासाठी दुधाचे दही, दह्याचे ताक, ताकाचे लोणी मग लोण्याचे तूप बनवले जाते. पूजेमध्ये तुपाचा दिवा लावला जातो. तूप जळून ज्योतीचा प्रकाश सर्वांना मिळत राहतो. व्यावहारिक जीवनात ही संबंधांना टिकवण्यासाठी तुपासारखे बनावे लागते. स्नेहाची स्निग्धता प्रत्येकाला द्यावी लागते. आज प्रत्येक जण प्रेमाचा भुका आहे. स्नेहाची छाया जिथे मिळते तिथे सर्वांना विसावा मिळतो. आपला स्वभाव ही स्नेहमय बनवावा जिथे सर्वांना सहानुभूती, शक्ति मिळत राहावी.
मध :- मध हे शक्तिवर्धक मानले जाते. मधाची प्राप्ती सहज होत नाही म्हणून ते महाग मिळते. ते कधी खराब ही होत नाही. आपण स्वतःला ज्ञानाच्या, अनुभवाच्या आधारावर मजबूत, शक्तिशाली बनवावे. ज्ञानाला प्रकाश ही म्हटले जाते. कोणते ही ज्ञान आत्मसात केले तर ते कधीच संपत नाही. जीवनामध्ये जे पण चांगले-वाईट अनुभव आपण घेतले त्यातून काहीतरी आपल्याला शिकवण मिळाली. ती शिकवण घेऊन पुढे चालत राहणे हा जिवनाचा नियम आहे. तो आनंदाने स्वीकारावा तर आपण जीवनामध्ये मधासारखे मधुर आणि शक्तिशाली राहू शकतो.
साखर :- तोंड गोड करण्यासाठी एक चमचा साखर ही खूप होते. घरात काही गोड पदार्थ नसेल तर आपण साखर खाऊन ही तृप्त होतो. तसेच संबंधांमध्ये गोडवा हा हवाच. एखाद्या संबंधांमध्ये जिव्हाळा, प्रेम, सदभावना असेल तर ते संबंध गोड वाटतात. नाहीतर तेच संबंध दुःख देणारे अनुभव होतात. म्हणून प्रत्येक संबंधांमध्ये हा गोडवा आपण जरूर आणावा. जे कोणी आपल्या सम्पर्कामध्ये येतात त्यांना शब्दांचा गोडवा जरी दिला तरी ते तृप्त होऊ शकतात.
ह्या पंच अमृतांचा वापर आपण मन, वचन, कर्म, संबंध आणि संपर्कामध्ये सुद्धा करावा. पंचामृताचे हे पाच गुण आपण आपल्यात आणले तर नक्कीच प्रभुप्रिय आपण बनू शकतो.
मन हे विचारांना निर्माण करते. हे विचार दुधासारखे पवित्र ठेवण्याची आवश्यकता आहे. जसे दुधामध्ये लिंबूचा एक थेंब पडला तर ते नासते तसेच विचारांमध्ये एखादा नकारात्मक संकल्प आला तर सगळेच विचार नकारात्मक बनतात. जसे दुधाचा सांभाळ करतात तसेच आपण आपल्या विचारांची पवित्रता ही सांभाळायला हवी.
बोल हे व्यक्तीची ओळख करून देतात म्हणून ते नेहमीच साखरेसारखे गोड, मधुर असावेत. कर्म हे मधासारखे शक्तिशाली असावेत कारण कर्माचे फळ मिळते. चांगले किंवा वाईट जे कर्म आपण करतो. त्याचाच परिणाम जीवनामध्ये सुख किंवा दुःख मिळते. संबंध हे तुपासारखे असावेत. शरीराने दूर गेले तरी मनाने नेहमी जवळ राहणारे. संबंधामध्ये प्रेम असणे गरजेचे आहे आणि संपर्क दह्यासारखे असावेत. आज विदेशामध्ये जाणारा युवक आपली संस्कृती सोडून पाश्चात्य संस्कृतीला अवलंबित आहे. परंतु दह्यासारखे असावे. आपल्या संस्कृतीचा, गुणांचा, संस्कारांचा प्रभाव दुसऱ्यावर पाडावा. परिवर्तन करण्याची शक्ति आपल्यामध्ये असावी.
अशाप्रकारे ह्या गुणांचा वापर दैनंदिन व्यवहारात केला तर नक्कीच आपले जीवन श्रेष्ठ व सुंदर बनू शकेल.
— ब्रह्माकुमारी नीता
Leave a Reply