नमस्कार वाचकहो ,
आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !! येणारी पुढील अनेक वर्षे संपूर्ण विश्वालाच ; उत्तम आरोग्याची , सुरक्षेची आणि संपन्नतेची असू देत , ही परमेश्वराजवळ प्रार्थना …….. !
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लेखन प्रपंचातून आपल्यासमोर येत आहे …. जनपदोद्ध्वंस आणि व्याधिक्षमत्व असा विषय घेऊन .
२०२० हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच , सर्व पिढ्यांसाठीच वेगवेगळ्या अर्थाने स्मरणीय ठरणारे झाले आहे ( ठरलंय ) . दैनंदिन जीवनव्यापारही करणे अतिशय कठीण झाले होते ; असा मागील काही महिन्यांचा काळ आपण सर्वांनी पाहिला , अनुभवला . अजूनही थोड्या फार प्रमाणात त्याची झळ आहेच …. लवकरच तीही निवेल अशा सकारात्मक मुद्यावर येऊन आपण वरील विषय समजून घेऊया .
आयुर्वेदाच्या ग्रंथकर्त्यांनी शास्त्रकारांनी काय सांगितलंय ; किती मूळापासून ; खोलवर याचा विचार करून , सांगून ठेवलंय ते पाहूया.
सर्वात आधी , या दोन मोठ्या शब्दांचा अर्थ जाणून घेऊ .
जनपदोद्ध्वंस म्हणजे काय ? तर संपूर्ण जगभरात सामान्य नैसर्गिक भाव दूषित झाल्याने एकाच वेळी , एकाच समान लक्षणांनी युक्त असे रोग उत्पन्न होऊन, एकाच वेळी जनपदास ( अनेक माणसांना ) नष्ट करते ; ती स्थिती म्हणजे जनपदोद्ध्वंस … !
वायू , जल , देश आणि काल हे चार सामान्य प्राकृतिक भाव दूषित झाल्याने अशी स्थिती ओढावते . ज्यालाच आपण Epidemic ह्या नावाने जाणतो . गेल्या काही महिन्यांपासून आपण सगळेच ह्याला सामोरे जातोय .
शास्त्रकारांनी , ह्या सगळ्याचे मूळ कारण ‘ अधर्म ‘ असे सांगितले आहे . चुकीच्या पद्धतीने , चुकीच्या मार्गाने ज्या ज्या गोष्टी केल्या जातात , त्या अधर्मात मोडतात आणि हे करताना ; ते चुकीचे आहे , हे माहीत असूनही केले जाते त्याला ‘ प्रज्ञापराध ‘ असे म्हणतात . बघा , अतिशय छोट्या वाटणाच्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा भयंकर स्वरूपात समोर येतात .
आता ; व्याधिक्षमत्व ह्याचा अर्थ जाणून घेऊ .
रोगाशी लढण्यासाठी , प्रतिकार करण्यासाठी असलेली शरीराची स्थिती , थोडक्यात immunity म्हणजे व्याधिक्षमत्व ! शरीरातील पेशींच्या स्तरावर तुमचे शरीर त्या विशिष्ट व्याधीशी किती जोरकस प्रतिकार करते यावर व्यक्तीचे व्याधिक्षमत्व उत्तम , मध्यम , हीन (कमी) आहे असे म्हटले जाते .
मग आता , ह्या दोन गोष्टींचा परस्पर संबंध कसा आहे ? किंवा आहे का ?
तर निश्चितच तो संबंध आहे. कसा आहे … ? तर जेव्हा अशा स्वरूपाच्या Epidemic व्याधी येतात , त्यावेळी त्याचा पसरण्याचा वेग जास्त असतो . व्यक्तीचे व्याधिक्षमत्व उत्तम असेल तर अशा साथीस आपण बळी पडत नाही . किंवा एखाद्याला झालाच तर पटकन बरा होतो .
व्याधिक्षमत्व ही काही एकदम ८-१५ दिवसात तयार होणारी शारीरिक , मानसिक स्थिती नाही . तर आयुर्वेदाच्या शास्त्रकारांनी दिनचर्येत , ऋतुचर्येत सांगितलेल्या गोष्टींचे पालन नित्यनेमाने केल्यास , अभ्यासाने प्राप्त होणारी अवस्था आहे.
Epidemics जेव्हा येतात , तेव्हा काही विशेष नियमांचे पालन करण्यासाठीचे आदेश शास्त्रकार , शासन देते . त्यानुसार व्याधिक्षमत्व चांगले घडण्यास , जे आहे ते अधिक चांगले होण्यास निश्चितच मदत होते .
शास्त्रकार काय सांगतात ?
तर … रोगाचे मूळ कारणच दूर करा / दूर ठेवा . सध्याच्या परिस्थितीत आपण ‘ घरी राहाणे ‘ हा नियम जो पाळला , तो याच संदेशात मोडतो .
जास्तीत जास्त काळ ‘ घरात थांबायचे ‘ म्हटल्यावर निश्चितच चलनवलन कमी होऊ लागणार . याचा परिणाम पचनसंस्थेवर होऊन , ती बिघडू नये याचाही विचार आचार्यांनी आधीच केलाय . प्रत्येकाच्या दिनचर्येत व्यायाम आहेच असे गृहीत धरून आचार्य सांगतात , अल्प आहार घ्यावा
याचप्रमाणे आयुर्वेदानुसार पंचकर्म चिकित्सा वैद्यांकडून करवून घ्यावी . तसेच वेगवेगळी रसायन औषधी वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत . उदाहरणार्थ , आत्ताच्या काळात आपल्याला च्यवनप्राश किंवा दूध + गाईचे तूप किंवा हळद + दूध घ्यायला सांगितले गेले , तसेच इतरही रसायन औषधींचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने करावा.
साथीच्या आजारांपासून वाचण्यासाठी , रोगातून मुक्त होण्यासाठी केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक बळही मिळावे / वाढावे म्हणून आपल्या इष्ट देवतांचे पूजन , स्तवन , प्रार्थना करणे , शक्य असेल त्याप्रमाणे समाजाच्या हिताचे कार्य करणे , गरजूंना मदत करणे, तसेच सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून वागणे , यांचाही समावेश शास्त्रकारांनी ‘ औषधींमध्येच ‘ केला आहे .
म्हणजेच , जनपदोद्ध्वंस अशी स्थिती असताना , माणसाने ; आपले बाकीचे व्यवहार , अर्थाजन , छंद इत्यादी गोष्टी बाजूला ठेवून , स्वतःचे आरोग्य सांभाळणे , राखणे , समाजातील इतर व्यक्तींचाही जीव ( प्राण ) वाचेल असे कर्म करणे , हे आद्यकर्तव्य मानावे .
कारण , अर्थातच ; माणसाचे आरोग्य (शारीरिक + मानसिक + बौद्धिक) उत्तम असेल तर आयुष्याला अर्थ आहे ; धर्म , अर्थ , काम , मोक्ष ह्या चार पुरुषार्थांना अर्थ आहे . कुटुंब , समाज , राष्ट्र , विश्व यांना अर्थ आहे आणि म्हणून शास्त्रकार सांगतात ,
‘आयुः कामयमानेन धर्मार्थसुखसाधनम् । आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरः ।। ‘
वैद्य . स्वाती शार्दुल कर्वे
अथर्व आयुर्वेद चिकित्सालय , ठाणे ( प . )
९८१९०९७९६४
Leave a Reply