उठतां बसतां भेटे मज सारखा पांडुरंग
माझा सखा पांडुरंग ।।
नेत्र पाहती मूर्ती श्यामल
जिव्हा जपते ‘विठ्ठल विठ्ठल’
गातो हृदयाचा प्रत्येकच ठोका ‘पांडुरंग’ ।।
काम-क्रोध-मद-मोह बांधती
लोभ नि मत्सर हरती शांती
नाशतसे त्या सहा रिपूंचा धोका पांडुरंग ।।
संकटांचिया काट्यांमधुनी
नेई विठ्ठल बोट पकडुनी
दूर करितसे चिंता-भीती-शोका पांडुरंग ।।
अज्ञानाची अवस काज़ळी
विठू न येऊं देतो भाळीं
जीवनआभाळीं पसरी आलोका पांडुरंग ।।
मार्तंडाहुन तेजस दीप्ती
बह्मांडाहुन विस्तृत व्याप्ती
अनंत, उरतो भरुनी साती लोकां पांडुरंग ।।
आनंदाचें पेव विठू हा
चिरहर्षाची ठेव विठू हा
हृदयीं चिन्मय उन्मादाचा झोका पांडुरंग ।।
एकमेव-गणगोत विठ्ठलू
माझी जीवनज्योत विठ्ठलू
जन्ममृत्युच्या पल्याड जाण्यां मोका पांडुरंग ।।
– – –
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply