डॉ. विद्याधर ओक म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वच म्हणावं लागेल. त्यांचा जन्म १५ जून १९५२ रोजी झाला. डॉक्टर, शास्त्रज्ञ, हार्मोनियम वादक, लेखक, संगीत संशोधक, ज्योतिषशास्त्रज्ञ असं परिपूर्ण व्यक्तिमत्त्व. गोविंदराव पटवर्धनांच्या या पट्टशिष्याने निष्णात हार्मोनियमवादक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. डॉ. विद्याधर ओक हे कलाक्षेत्राला ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि २२ श्रुतींचं अस्तित्व दाखवणारे संशोधक म्हणून परिचित आहेत. वैद्यकीय क्षेत्राला ते उत्तम फार्माकाॅलॉजिस्ट म्हणून माहीत आहेत.
कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. तर भारतीय, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य ज्योतिषतज्ज्ञ म्हणून चाळीसहून अधिक वर्षांचा त्यांचा व्यासंग आहे. याशिवाय विविध विषयांवर संशोधन आणि लेखन ते करत असतात. घरी संगीताची उत्तम परंपरा असल्याने बालवयातच त्यांनी आईकडून हार्मोनियम शिकायला सुरुवात केली. ज्येष्ठ हार्मोनियमवादक गोविंदराव पटवर्धन यांचं शिष्यत्व घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं. गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ डॉ. ओक हार्मोनियम वादनात रममाण आहेत. बॅडमिंटनच्या अनेक आंतरशालेय ज्युनियर चॅम्पियनशिप त्यांनी जिंकल्या आहेत.
१९६९-७० दरम्यान रुईया कॉलेजमधून विज्ञान शाखेत शिक्षण घेत असताना आणि त्यानंतर जी.एस. मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेताना अनेक चषकांवर त्यांच्या नावाची मोहोर आहे. बुद्धिबळामध्येही ते प्रवीण आहेत. डॉ. विद्याधर ओक आणि ‘२२ श्रुतींची हार्मोनियम’ हे समीकरण रसिकांच्या मनात घट्ट रुजलेलं आहे. त्यांनी केलेल्या संशोधनासाठी विविध ठिकाणी त्यांना गौरवण्यात आलं आहे. २२ श्रुतींच्या विश्लेषणाबरोबरच सतार, सरोद, सारंगी, वीणा, रुद्रवीणा, एकतारी, तंबोरा या वाद्यांवर २२ श्रुतींच्या अचूक जागा कुठे वाजतील याचं तारेचं ‘पर्सेंटेज प्रमाण’ डॉ. ओक यांनी त्यांच्या संशोधनात दिलेलं आहे. ज्येष्ठ मोहनवीणा वादक विश्वमोहन भट्ट यांनी ‘या संशोधनासाठी तुला नोबेल पारितोषिक दिलं पाहिजे’, असे गौरवोद्गार काढले होते.
डॉ. विद्याधर ओक यांच्या संगीत, औषधशास्त्र, संशोधन, लेखन आणि ज्योतिष या क्षेत्रांतल्या योगदानासाठी राज्य सरकारतर्फे दिला जाणारा केशवराव भोसले पुरस्कार, उत्तुंग सांस्कृतिक परिवारातर्फे ‘पु. ल. देशपांडे पुरस्कार’, ठाणे महानगरपालिकेचा ‘ठाणे भूषण पुरस्कार’, सावरकर न्यासतर्फे ‘विनायक दामोदर सावरकर पुरस्कार’, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (नाटक) ज्ञानोबा माझा (म. टा. सन्मान) यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
‘मित्र जिवाचा’, ‘मनोरंजक स्वभावशास्त्र’, गोविंदराव पटवर्धन यांच्या जीवनचित्रावर प्रकाश टाकणारं ‘गोविंद गुणदर्शन’, २२ श्रुती, श्रुती गीता, ‘ताजमहाल’ हे संगीत नाटक, ‘श्रुतीविज्ञान व रागसौंदर्य’ आणि नुकतंच प्रकाशित झालेलं ‘पुनर्जन्म – मिथ्य की तथ्य’ या पुस्तकांचं लेखन डॉ. विद्याधर ओक यांनी केलय. सध्याचे आघाडीचे हामोर्निअम वादक आणि संगीत संयोजक आदित्य ओक हे डॉ. विद्याधर ओक यांचे चिरंजीव. आदित्य ओक यांचा जादूची पेटी हा कार्यक्रम सध्या खूप गाजत आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply