किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पं.फिरोज दस्तूर यांचा जन्म ३० सप्टेंबर १९१९ रोजी झाला.
पं. फिरोज दस्तूर हे एक खूप मोठे पण तसे सर्वसामान्यांसमोर फारसे न आलेले कलावंत. १९३० च्या दरम्यान पं.फिरोज दस्तूर हे भारतीय चित्रपट सृष्टीत अभिनेते म्हणून काम करत होते. त्यांनी काही काळ वाडिया मूव्हीटोन आणि इतर चित्रपट संस्थांबरोबर काम केले.
परंतु शास्त्रीय संगीताकडे त्यांची ओढ सर्वाधिक होती. पारशी समाजात ‘आंग्ल’ प्रभाव जास्त असून सुद्धा ते अभिजात हिंदुस्तानी संगिता कडे वळले, उस्ताद अब्दुल करीमखां ह्या त्यांच्या (किराणा) घराण्याच्या अध्वर्युची आठवण व्हावी असेच फिरोजजींचे गायन होते. सवाई गंधर्व महोत्सवात शेवटच्या दिवशी पहाटे गंगूबाई हनगल, दस्तुरबुवा आणि शेवटी अण्णा हा गाण्याचा क्रम गेली अनेक वर्ष होता. ‘गोपाला मेरी करूना’ ही अब्दुल करिमखा साहेबांची ठुमरी आणि दस्तुरबुवांचं काय अजब नातं होतं देवच जाणे! सवाईगंधर्व महोत्सवात त्यांना दरवर्षी न चुकता ‘गोपाला…’ गाण्याची फर्माईश व्हायची आणि पं.दस्तुरही अगदी आवडीने ते गात! फारच अप्रतीम गायचे! साक्षात अब्दुल करीमखा साहेबच डोळ्यासमोर उभे करायचे!
पं. भीमसेन जोशी आणि दस्तुर! दोघेही सवाई गंधर्वांचे शिष्य. त्या अर्थाने दोघेही एकमेकांचे गुरुबंधू होते. आणि तसंच त्यांचं अगदी सख्ख्या भावासारखंच एकमेकांवर प्रेमही होतं! सवाई महोत्सवात एके वर्षी दस्तुर गुरुजींनी कोमल रिषभ आसावरी तोडी इतका अफाट जमवला की तो ऐकून अण्णा दस्तुरांना म्हणाले, “फ्रेडी, आज मला गाणं मुश्किल आहे. आज तुमचेच सूर कानी साठवून मी घरी जाणार!” पं. भीमसेन जोशी नेहमी प्रेमाने दस्तुरांना ‘फ्रेडी’ या नावाने हाक मारायचे! पं. फिरोज दस्तूर यांचे निधन ९ मे २००८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ तात्या अभ्यंकर
पं फिरोज दस्तूर -। राग मल्हार और ठुमरी
‘गोपाला मेरी करूना’
Leave a Reply